गंभीररित्या भाजलेल्या 51 जणांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जोधपूर : जोधपूरच्या भुंगरा गावात लग्न समारंभात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळं आनंदाचं रूपांतर काही क्षणातच शोकात झालं. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत लग्नाच्या वरातीत सहभागी होण्यासाठी आलेले 63 हून अधिक जण होरपळले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
गंभीर भाजलेल्या 51 जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं उपचारादरम्यान दोन निष्पापांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या दुर्घटनेत 10 हून अधिक लोक 80 टक्क्यांहून अधिक भाजले असून आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
या दुर्घटनेतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता, ग्रामीण एसपी अनिल कयाल शेरगडच्या भुंगरा गावात पोहोचले. त्यानंतर जोधपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व भाजलेल्या लोकांची विचारपूस केली. शेरगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं 2 सिलिंडरचा स्फोट झाल्याची पुष्टी केलीय. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी संपूर्ण व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानिक पातळीवरुन मिळालेल्या माहितीनुसार, भुंगरा येथील रहिवासी सगतसिंग गोगादेव यांच्या मुलाचं गुरुवारी लग्न होणार होतं. यातील वऱ्हाडीमंडळी गावातून वरात काढण्यासाठी एकत्र जमले होते, तिथं जेवणापूर्वी गॅस गळतीमुळं स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घराचं छतही कोसळलं. सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांसह उपस्थित 60 हून अधिक लोक जागीच होरपळले. त्यानंतर जखमींना तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.