Jammu Kashmir Loksabha Election Result : जम्मू-काश्‍मीरच्या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का

जम्मू काश्मीर राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झाला.
omar abdullah and mehbooba mufti
omar abdullah and mehbooba muftisakal
Updated on

जम्मू काश्मीरचे निकाल निश्चितच आश्चर्यकारक आणि अनपेक्षित आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झाला असून दोन अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत बाजी मारली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पाच आणि लडाखमधील एक अशा सहा लोकसभा जागांपैकी भाजप, नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत भाजप आणि ‘एनसी’ला प्रत्येकी एक जागा गमवावी लागली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून गेल्या चार वर्षांपासून तिहार कारागृहात असलेले कुपवाडाचे माजी आमदार इंजिनिअर रशीद यांचा विजय हा सर्वात मोठा चमत्कार आहे.

रशीद यांनी उमर अब्दुल्ला यांच्यावर दोन लाख तीन हजार ४० मतांची आघाडी घेतली. दोन लाख ९८ हजार १२५ मतांनी त्यांनी सज्जाद गनी लोन यांना मागे टाकले. मात्र, रशीद यांची सुटका होण्याची फारशी शक्यता नसल्याने संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करताना ते दिसणार नाहीत, हेही त्यांनी संदेशात आवर्जून नमूद केले आहे.

अजून अधिकृतरीत्या निकाल जाहीर झालेला नसला, तरी ‘एनसी’चे उमेदवार आगा सईद रुहुल्लाह आणि मिया अल्ताफ अहमद यांनी अनुक्रमे श्रीनगर आणि अनंतनागच्या जागा जिंकल्याचे चित्र आहे. भाजपचे जुगल किशोर आणि डॉ. जितेंदरसिंह यांनी अनुक्रमे उधमपूर आणि जम्मूचा गड राखला आहे.

लडाखमधील अपक्ष उमेदवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे कारगिलमधील माजी जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद हनीफा जान हे ‘इंडिया’ आघाडीचे अघोषित उमेदवार मानले जात होते. त्यांनी मिळविलेला विजय हा आश्‍चर्यकारक ठरला आहे.

बौद्ध समाजाची मते फोडण्यासाठी काँग्रेसने लेहमधील तेरसिंग नामग्याल या बौद्ध नेत्याला केवळ मैदानात उतरवले, असा एक समज होता. पण प्रदेशातील सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे एकमत असलेले कारगिलमधील जान यांनी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.

पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या अनंतनाग-राजौरीमधून उभ्या होत्या. तेथे काश्मीर आणि जम्मू प्रांतामधील गुज्जर समाजाची मते ‘एनसी’चे उमेदवार मिया अल्ताफ यांना मिळाली. आध्यात्मिक पार्श्‍वभूमी असलेल्या गुज्जर परिवारातील अल्ताफ यांना समाजाची मते मिळवण्यासाठीच उमेदवारी देण्यात आली होती आणि पक्षाची ही राजकीय खेळी यशस्वी ठरली.

श्रीनगरवर मजबूत पकड असलेल्या ‘एनसी’ने शिया नेते आगा सईद रुहुल्लाह यांना उमेदवारी दिली होती. शिया आणि सुन्नी मतदारांकडून पाठबळावर त्यांनी विजयश्री खेचून आणली. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यंदा बारामुल्लातून लढण्यास पसंती दिली होती. पण त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि राजकीय कारकिर्दीतील दुसरा मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ‘पीडीपी’चे लेफ्टनंट काझी अफजल यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. तुरुंगातील इंजिनिअर रशीद यांच्या उमेदवारीने उमर यांचे स्थान आणखी डळमळीत झाले आहे. रशीद यांच्या मुलाने प्रचारधुरा सांभाळली होती. त्यांचा प्रचार प्रभावी नसला तरी सहानुभूतीच्या आधारे कुपवाडा, बारामुल्ला आणि बंदीपोरा जिल्ह्यातील मते मिळवण्यात रशीद यशस्वी ठरले.

‘जेल का बदला व्होट से’

‘जेल का बदला व्होट से’ या नाऱ्यामुळे आपण काश्मिरींच्या हक्कासाठी लढताना कारागृहात गेल्याची प्रतिमा तयार करण्यात इंजिनिअर रशीद यांना यश मिळाले. रशीद यांच्या करिष्‍म्यामुळे सज्जाद लोन यांची मते फुटणार, याची कल्पना ‘एनसी’ला होतीच.

तथापि, संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यामुळे रशीद यांच्यावर जणू मतांचा पाऊसच पडला. रशीद यांना एकहाती विजय मिळणारच अशी खात्री असल्याची भावना त्यांचे समर्थक शोएब लोन यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.