मुंबई : आधीच तीनवेळा बदलण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा इतर परीक्षांशी जुळत आहेत. नव्याने जाहीर झालेल्या तारखांनुसार जेईई मुख्य परीक्षेचे पहिले सत्र २० ते २९ जून दरम्यान आणि दुसरे सत्र २१ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे; मात्र याच कालावधीत खासगी महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षाही असल्याने विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर झालेल्या नाहीत.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी राज्याची प्रवेश परीक्षा म्हणजेच एमएचटी-सीईटी ११ ते २३ जून या कालावधीत होणार आहे. याच कालावधीत जेईईचे पहिले सत्र होणार आहे. तसेच एसआरएम संस्थेच्या महाविद्यालयांसाठी होणारी एसआरएमजेईई परीक्षा २५ आणि २६ जूनला होणार आहे. बिट्स संस्थेच्या महाविद्यालयांसाठी होणारी बिट्ससॅट परीक्षाही जेईई मुख्य परीक्षेच्या दरम्यानच होणार आहे. या परीक्षेचे पहिले सत्र २० ते २६ जून या कालावधीत तर दुसरे सत्र २२ ते २६ जून या काळात होणार आहे.
जेईई मुख्य परीक्षा आधी १६ ते २० एप्रिल या कालावधीत होणार होती. यावेळी बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रांच्या मध्येच जेईई येत असल्याचे सांगत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) विद्यार्थ्यांनी परीक्षेला विरोध केला होता. त्यामुळे जेईईच्या तारखा बदलून २१ एप्रिल ते ४ मे अशा करण्यात आल्या; मात्र याच वेळी नेमकी राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे जेईईच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रांमध्ये काहीच दिवसांचे अंतर शिल्लक राहिले. परिणामी, दुसऱ्या सत्राच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना कमी दिवस मिळत असल्याने त्यांना दुसरी संधी देण्यामागील मूळ हेतूच साध्य होताना दिसत नाही.
आता जेईईच्या तारखा पुन्हा एकदा इतर प्रवेश परीक्षांशी जुळत आहेत. पुन्हा त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे खासगी महाविद्यालयेच आपल्या परीक्षांच्या तारखा बदलण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या तारखाही लवकरच बदलण्याची शक्यता आहे. आयआयटीची प्रवेश परीक्षा ३ जुलै रोजी नियोजित होती; पण जेईई मुख्य दुसऱ्या सत्राची प्रवेश परीक्षा २६ जुलैपर्यंत चालणार आहे.
जेईई अॅडव्हान्स ऑगस्टमध्ये होणे अपेक्षित आहे. जेईई मुख्यमध्ये सर्वोत्तम २.५ लाख क्रमांक मिळवणारेच जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरतील. त्यामुळे जेईई मुख्यच्या दोन्ही प्रयत्नांची निकाल जाहीर होणे आवश्यक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.