लोकसभेच्या रणधुमाळीची सांगता लवकरच होणार आहे. २०२४ च्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघाले आहेत. सध्या ते तामिळनाडूतील कन्याकुमारीला भेट देणार असून तिथे ते काहीवेळ ध्यानधारणा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी ३० मे आणि १ जून असे दोन दिवस कन्याकुमारीत असणार आहेत. या काळात ते कन्याकुमारीमध्ये समुद्राच्या मध्यभागी उभ्या असलेल्या एखा विशाल खडकावर बसून ध्यान करतील. या खडकाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्या खडकावर स्वामी विवेकानंद यांनीही ध्यान केले होते.
नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच ध्यान करणार आहेत असे नाही. तर याआधीही त्यांनी भारतातील विविध ठिकाणी ध्यानधारणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे १ जून रोजी मतदान होणार आहे. ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार संपत आहे. पीएम मोदी पंजाबमधील होशियारपूर येथे आपली शेवटची सभा घेणार असून त्यानंतर ते तामिळनाडूतील कन्याकुमारीला रवाना होतील.
पंतप्रधान तेथून विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पोहोचतील आणि ३१ मे ते १ जून संध्याकाळी ध्यान मंडपममध्ये ध्यान करतील. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
मोदींनी याआधी 2014 मध्ये निवडणूक प्रचार संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडला भेट दिली होती. हा तोच किल्ला होता जिथे महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. पंतप्रधान मोदी कधी उंच पर्वतांची शांतता, कधी समुद्राच्या लाटांचा आवाज तर कधी ऐतिहासिक महत्त्व असलेले किल्ल्यांवर ध्यानाला बसतात.
१३२ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनीही येथे तपश्चर्या केली होती
विवेकानंद रॉक मेमोरियल हे तेच ठिकाण आहे जिथे १३२ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस ध्यान केले होते. २५,२६,२७ डिसेंबर १८९२ रोजी स्वामीजींनी येथे तपश्चर्या केली. इथेच त्यांना भारतमातेची दैवी संकल्पना जाणवली असे म्हणतात. इतकेच नाही तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही येथे दोन तास ध्यान केले.
हा रॉक (खडक) महत्त्वाचा का आहे?
या आध्यात्मिक प्रवासाचा स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. लोकांचा असा विश्वास आहे की जसे गौतम बुद्धांच्या जीवनात सारनाथ या ठिकाणाला विशेष स्थान आहे, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातही या स्थानाला विशेष स्थान आहे.
देशभर फिरून स्वामी विवेकानंद यांनी तीन दिवस तपश्चर्या केली आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले. त्याच ठिकाणी ध्यान केल्याने स्वामीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनला जिवंत करण्याची पंतप्रधान मोदींची वचनबद्धता दिसून येते.
कन्याकुमारीतील समुद्राच्या खोलातून वर आलेल्या या खडकाचे महत्त्व केवळ ऐतिहासिकच नाही तर पौराणिकही आहे. देवी पार्वतीनेही या ठिकाणी एका पायावर उभे राहून भगवान शंकराची पूजा केली होती, असे पुराणात सांगितले जाते.
भारताच्या या दक्षिणेकडील टोकाचे आणखी एक महत्त्व म्हणजे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या सीमाही येथेच मिळतात. हा खडक हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात स्थित आहे.
बलाढ्य अशा समुद्राचा खळखळाट आणि उसळणाऱ्या लाटांमध्ये हा खडक अतिशय सुंदर दिसतो. ही स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी या भूमीतील आध्यात्मिक प्रतिभा जगासमोर आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.