आज २६ जुलै. १९९९ च्या जून-जुलैमध्ये भारतावर लादल्या गेलेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
तोलोलिंग टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर कारगिल विजयाच्या त्या स्मारकात उंच फडकणारा भारताचा तिरंगा पाहताना तेथे उपस्थित प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाभिमान जागृत न झाला तरच नवल. या युद्ध स्मारकातून भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडताना प्रवेशद्वारावरील ओळी प्रत्येकाचं लक्ष वेधतात.
‘‘When you go home, tell them of us. And say that
for your tomorrow, we gave our today.’’
आपणा सर्वांच्या उज्ज्वल व सुरक्षित भविष्यासाठी स्वत:चा वर्तमान अर्पण करणाऱ्या आपल्या जवानांचा विश्वास व त्याग सार्थ ठरेल, असा आदर्श देशभक्त नागरिक होण्यासाठी आजच्या या पवित्रदिनी आपण मनोमन संकल्प करूया, असे आवाहन कारगिल दिनानिमित्त लेखकाने केले आहे.
- संजीवकुमार बर्वे, रत्नागिरी
आज २६ जुलै. १९९९ च्या जून-जुलैमध्ये भारतावर लादल्या गेलेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाने आणि बलिदानाने घडविलेल्या त्या ऐतिहासिक क्षणांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच या युद्धात मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून देशभर गांभीर्याने साजरा करण्यात येतो.
पाकिस्तानने १९४७, १९६५ आणि १९७१ मध्ये भारताविरुद्ध उघडपणे युद्ध छेडलं. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला होता. म्हणूनच १९९९ च्या मार्च-एप्रिलदरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी उभय देशांतील परस्पर सामंजस्य कराराचा भंग करून काश्मिरच्या लडाख प्रांतातील दुर्गम, अति थंड आणि बर्फाच्छादित सीमावर्ती भागातील केवळ हिवाळ्यापुरते तात्पुरते रिकाम्या केलेल्या भारतीय ठाण्यांवर विश्वासघाताने कब्जा मिळवला होता.
लडाखमधील द्रास, कारगिल, तोलोलिंग, काकसर, बटालिक, मुश्को अशा विविध सेक्टर्समधील एकूण ५४ ठिकाणी ही घुसखोरी झाली होती. भारताच्या सुरक्षेला तसेच त्या भागातील लष्करी वाहतुकीला त्यामुळे एकूणच मोठा धोका निर्माण झाला होता. मेमध्ये काही स्थानिक गावकऱ्यांकडून या संबंधीची माहिती मिळताच भारतीय लष्कराने वस्तुस्थितीची खातरजमा केल्यानंतर आपला भूभाग परत मिळविण्यासाठी युद्ध छेडलं गेलं.
सुमारे ४५ दिवस चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानद्वारा बळकावण्यात आलेला सर्व प्रदेश परत मिळविला. या युद्धात भारताच्या ५५० वीरांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांचे कायमस्वरूपी स्मरण राहावे, या हेतूने द्रास येथे कारगिल युद्ध स्मारक उभारण्यात आले असून तेथील ‘वीरभूमी’ या स्थळी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व जवानांची संक्षिप्त माहिती असलेले संगमरवरी शिलालेख उभारले असून बाजूला भारताचा तिरंगा फडकत असतो.
या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक जवानांचा त्याग आणि बलिदानाच्या आठवणींनी नकळत नमस्तक होतो. कारगिल युद्धात दाखवलेल्या शौर्य, साहस, नेतृत्व अशा गुणांकरीता अनेक जवानांना विविध शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मेजर विक्रम बात्रा, लेफ्ट. मनोजकुमार पांडे, ग्रेनेडिअर योगिंदरसिंग यादव आणि रायफल मॅन संजयकुमार या चार वाघांना सर्वोच्च पुरस्कार परमवीरचक्र प्रदान करण्यात आला.
बात्रा आणि पांडे यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्राप्त झाला तर उर्वरित दोघांना त्यांच्या हयातीत पुरस्कार मिळण्याचं भाग्य लाभलं. आजमितीस ते दोघंही लष्करात कार्यरत आहेत. युद्ध स्मारकाच्या प्रांगणातील तेवणारी अमर जवान ज्योत तसेच कारगिल युद्धाविषयी माहितीचे संग्रहालय या वास्तुंमुळे एकंदरीतच स्मारकाला भारलेपणं प्राप्त झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.