Kargil Vijay Diwas : अभियंत्यांच्या प्रयत्नांची अभेद्य ‘तटबंदी’

कारगिल युद्धात आम्हाला या अत्यंत बिकट डोंगरांवर रसद घेऊन जाण्यासाठी वाट तयार करणे आवश्यक असे. पायदळाच्या सैनिकांना त्यांचे रेशन आणि दारूगोळा, तसेच संरक्षण सामग्री मिळेल याची खात्री करण्यासाठी आमच्या अभियंता तुकड्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अती जलद गतीने अनेक ट्रॅक, पायवाटा व खच्चर चढू शकतील अशा वाटा, तयार केल्या.
Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwassakal
Updated on

लेफ्टनंट जनरल

एस. एस. हसबनीस

(निवृत्त)

कारगिल युद्धात आम्हाला या अत्यंत बिकट डोंगरांवर रसद घेऊन जाण्यासाठी वाट तयार करणे आवश्यक असे. पायदळाच्या सैनिकांना त्यांचे रेशन आणि दारूगोळा, तसेच संरक्षण सामग्री मिळेल याची खात्री करण्यासाठी आमच्या अभियंता तुकड्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अती जलद गतीने अनेक ट्रॅक, पायवाटा व खच्चर चढू शकतील अशा वाटा, तयार केल्या.

पॅराशूट अभियंता कंपनीचे कमांडिंग अधिकारी म्हणून दीर्घ खडतर कार्यकाळानंतर माझी खडकीच्या बॉम्बे सॅपर्स (बीईजी) येथे नियुक्ती झाली. १९९९च्या मे महिन्याच्या मध्यापर्यंत पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा भारताला आश्चर्यचकित करून कारगिल सेक्टरमध्ये खोलवर घुसखोरी केल्याचे मोठ्या प्रमाणावर स्पष्ट होत होते. या अतिक्रमणांमध्ये घुसखोरीची खोली आणि शत्रूचे सामर्थ्य स्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या गस्ती पथकांसोबत चकमकी सुरू झाल्या होत्या.

१०८ इंजिनिअर रेजिमेंट, माझे युनिट-ज्याची मी नंतर कमांड करणार होतो, तेव्हा ८ माउंटन डिव्हिजनबरोबर काश्मीर खोऱ्यात बंडखोरीविरोधी ऑपरेशन्सवर तैनात होते. मेच्या २९ तारखेला रेजिमेंटला लडाख सेक्टरमध्ये पुढे जाण्याचे आदेश देण्यात आले. मी रेजिमेंटच्या सतत संपर्कात होतो. मला माहीत होते, की रेजिमेंटमध्ये उपकमान अधिकारी पोस्टिंग नव्हते. ही कमतरता युनिटच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल. म्हणून मी ‘बीईजी’च्या कमांडंट साहेबांकडे गेलो आणि मला तातडीने रेजिमेंटमध्ये परत पाठवण्याची विनंती केली. माझी पत्नी आणि इतर कुटुंबातील सदस्य काळजीत असले, तरी माझ्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देत होते. मला पुण्यातून पोस्ट आउट होण्यास किमान एक वर्ष बाकी होते, पण आमच्या परिवाराच्या परंपरेनुसार माझे स्थान युद्धात माझ्या सैनिकांसोबतच होते. खरे तर आमच्या पूर्वजांनी पेशव्यांच्या मराठा सैन्यात युद्धातील पराक्रम आणि बलिदानासाठी प्रशंसा मिळवली होती. आमच्या वडिलांनीही १९६५ आणि १९७१मध्ये पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भाग घेतला होता. ते आताच्या प्रसिद्ध गलवान पोस्टचे मूळ नायक होते. त्यांनी आणि त्यांच्या मूठभर सैनिकांनी शेवटच्या गोळीपर्यंत, १९६२मध्ये चीनच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून गलवानचा बचाव केला होता. पुढे सात महिने ते चीनचे युद्धकैदी होते.

भारतीय सैन्याने घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढाई सुरू केल्यानंतर मी रेजिमेंटमध्ये जाण्यासाठी अतिशय आतुर होतो. शेवटी माझी रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली आणि मी तातडीने श्रीनगरला निघालो. दुसऱ्याच दिवशी मी मटायन येथील आमच्या रेजिमेंट मुख्यालयात पोहोचावे यासाठी मी लवकर निघालो. जोझिला खिंड ओलांडताच मला रस्त्याच्या दोन्ही बाजू सैन्याने व्यापलेल्या दिसल्या. सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांसाठी उघड्यावर टाकलेला दारुगोळा पाहणे हे एक अद्भुत दृश्य होते. मी तंबूंमध्ये लावलेले फिल्ड हॉस्पिटल पार केले. लढाईच्या आघाडीवरून जखमींना घेऊन हेलिकॉप्टर नियमित अंतराने उतरत होते. नंतर मी आमच्या एका जखमी जवानाला भेटायला गेलो, तेव्हा मला कळले की अतिशय मूलभूत सोयींनी सज्ज हॉस्पिटलने जखमींवर उपचार करताना डॉक्टरांना खूप अडचणी आल्या होत्या. तथापि, येथे आणलेल्या प्रत्येक जखमी शिपायाला वाचवले गेले, याचे श्रेय आपल्या डॉक्टरांना जाते. त्यांनी आमच्या आतडे आणि पोटाचा बराचसा भाग स्वतःच्या हातात धरलेल्या सैनिकाला वाचवले, तेव्हा मला मला त्यांच्या समर्पणाचा साक्षात्कार झाला!

युद्धात अभियंत्यांची जबाबदारी असते की आपल्या सैन्याला योजनेनुसार भ्रमंती करता आली पाहिजे. यासाठी आम्हाला रस्ते, पूल बांधणे आणि शत्रूने आमच्या हालचालींच्या मार्गावर लावलेल्या सुरुंगांना काढणे व रस्ता मोकळा करणे. कारगिलमध्ये आपल्या सैन्याला टायगर हिल, टोलोलिंगसारखी खूप उंच शिखरे काबीज करायची होती. पायदळ अतिशय अवघड मार्ग वापरून डोंगर माथ्यावरच्या गनिमाला नेस्तनाबूत करत होते. मग आम्हाला या अत्यंत बिकट डोंगरांवर रसद घेऊन जाण्यासाठी वाट तयार करणे आवश्यक असे. शत्रूच्या तोफा अजून सुद्धा अचूक मारा करत होत्या, पण न थांबता पायवाट बनवण्याचे काम आमचे अधिकारी व शिपाई करत राहायचे. पायदळाच्या सैनिकांना त्यांचे रेशन आणि दारूगोळा, तसेच संरक्षण सामग्री मिळेल याची खात्री करण्यासाठी आमच्या अभियंता तुकड्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अती जलद गतीने अनेक ट्रॅक, पायवाटा व खच्चर चढू शकतील अशा वाटा, तयार केल्या.

पाकिस्तानी इंजिनिअर्सने बिकट उतारावर अतिशय कौशल्याने माइनफिल्ड आणि इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) लावले होते. पाकिस्तानने स्वतःच्या मृतांनाही सोडले नव्हते. बऱ्याच वेळा आमच्या जवानांना पाकिस्तानी मृतदेहाशी जोडलेले IED आढळले. आमच्या शिकवणीनुसार आम्ही त्यांचे मृत शरीर खाली आणून ते पाकिस्तानी लोकांना परत द्यायचे व सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करायचो.

आमच्या सैन्याने जोखीम पत्करली, परंतु शत्रूला अंतिम संस्कार करण्यापूर्वी IED वेगळी करून त्याची विल्हेवाट लावत असू. एका ५३५३ मिटर (१७००० फूट) उंचीच्या शिखरावर सुरुंग काढायला गेलेल्या आमच्या टोळीला ते शिखर आपल्या ताब्यात घेऊन तेथेच संरक्षण घ्यायचे आदेश देण्यात आले. आमच्या तरुण ऑफिसरने ते ठाणे पुढे १५ दिवस लढवले. आम्ही अभियंते स्वतःचे काम संपल्यावर पायदळाची मदत सर्व प्रकारे करत असतो. आमच्या १०८ इंजिनिअर रेजिमेंटला कारगिल युद्धातल्या कामगिरीबद्दल बॅटल ऑनर कारगिल-द्रास व सेनाप्रमुखांचे प्रशस्तिपत्र देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com