तोफखाना आग ओकतो तेव्हा...

कारगिल युद्धाच्या आघाडीवर लष्कराच्या जवानांप्रमाणेच तोफखानाही झुंजला. अभेद्य पर्वतशिखरांच्या आड दडून बसलेल्या शत्रूचा निःपात करण्याची अशक्यप्राय कामगिरी त्याने केली.
Kargil War
Kargil Warsakal
Updated on

- आलोक देव, मेजर जनरल (निवृत्त)

कारगिल युद्धाच्या आघाडीवर लष्कराच्या जवानांप्रमाणेच तोफखानाही झुंजला. अभेद्य पर्वतशिखरांच्या आड दडून बसलेल्या शत्रूचा निःपात करण्याची अशक्यप्राय कामगिरी त्याने केली. अनेकांनी बलिदान दिले, तर काहीजण जखमीही झाले. त्यांचे हे योगदान देश कधीच विसरणार नाही.

भारताच्या ‘ऑपरेशन विजय’ला आता २५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. लडाखच्या पर्वतराजीमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय लष्कराने निःपात केला होता. आपले लष्कर पाकिस्तानविरोधात झुंज देत असताना तेथील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीचे चित्र विविध दूरचित्रवाणीवाहिन्या आणि नभोवाणीवरून देशभर पोचत होते.

टोकदार पर्वतांचे सुळके, अरुंद वाटा, जिथे ऑक्सिजनच काय, पण साधे झुडूपही अपवादानेच दिसायचे त्या रणभूमीवर भारतीय जवान शत्रूच्या विरोधात दोन हात करत होते. भारतीय लष्कराच्या संघर्षशील प्रवृत्तीची ही अग्निपरीक्षा होती.

आमच्या सैनिकांनी या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीबरोबरच पर्वतांमध्ये दडून बसलेल्या शत्रूला यशस्वीरीत्या हुसकावून लावले. इंच इंच लढवून शत्रूच्या ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले. पुढे याच ठाण्यांवर भारताचा तिरंगा फडकला. या संघर्षामध्ये भारतभूमीचे ५५९ शूरपुत्र धारातीर्थी पडले अन् हजारोजण जखमी झाले, त्या सर्वांचे बलिदान हा देश कधीच विसरू शकणार नाही.

या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा प्रत्येक घटक आणि विभागाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यातही लष्कर (पायदळ) आणि तोफखाना यांचे वर्चस्व अधिक होते. आमचा तोफखाना तर थेट शत्रूच्या माऱ्यासमोर उभा होता, शत्रूचे प्रतिहल्ले परतावून लावतानाच त्यांची अनेक ठाणी देखील आमच्या तोफखान्याने नष्ट केली. पायदळाची साथ घेत आमच्या तोफखान्याने शत्रू राष्ट्राच्या अनेक चौक्या नष्ट केल्या.

खरेतर जवानांच्या मदतीमुळेच तोफखान्याला पुढे सरकता आले. आमचा तोफखाना विविध ठिकाणांवरून शत्रूवर अक्षरशः आग ओकत होता, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पाकिस्तानचे लष्कर जायबंदी झाले, त्यांना हालचाल करणेही कठीण होऊन बसले होते.

आमचे लष्कर आणि तोफखान्याने समन्वयाने काम केल्याने कारगिलमध्ये विजय मिळू शकला. हा हल्ला झाल्यावर लडाखमधील परिस्थिती सर्वार्थाने प्रतिकूल होती. पाकिस्तानने घुसखोरी केल्याचे कळताच त्यांना हुसकावून लावण्याची जबाबदारी लष्करावर येऊन पडली.

द्रासमध्ये आव्हानांचा डोंगर

द्रासचा भाग हा झोजिला खिंडीला लागूनच आहे. तिथे प्रत्यक्ष ताबा रेषाही श्रीनगर-लेह रस्त्याला लागून असल्याने शत्रू राष्ट्राला तिथून आपल्यावर हल्ला करणे अधिक सोपे झाले असते. त्यांच्याकडे दीर्घपल्ल्याची मारक क्षमता असणारा तोफखाना देखील होता. त्यामुळे या भागातून शत्रूला बाहेर काढणे खूप गरजेचे होते. तेव्हा माझ्याकडे १९७ फिल्ड रेजिमेंटची सूत्रे होती.

आमच्याकडे १०५ एमएमच्या स्वदेशी बनावटीच्या तोफा होत्या. द्रास सेक्टरमध्ये पहिल्यांदाच आल्याने आमच्यासमोर अनेक आव्हानेही होती. खरे तर आमची जबाबदारी नसतानाही आम्ही काश्मीर खोऱ्यात प्रवेश केला. तिथे आम्हाला जायचे आहे याची माहितीदेखील उशिरा मिळाली होती.

आमच्याकडे जे काही नकाशे होते तेही अपुरे होते. प्रत्यक्ष ताबारेषाही लक्षात येणे अवघड होते, याचे कारण ती स्पष्टपणे आखण्यात आली नव्हती. (काही काळानंतर आम्हाला सुधारित नकाशे मिळाले.) हा सगळा प्रदेशच आमच्यासाठी नवीन होता.

शत्रू नेमका कोठे दडून बसला आहे, हे शोधून काढण्यासाठी आम्हाला त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्याची वाट पाहात बसावी लागत असे. शत्रू हा डोंगरदऱ्यांमध्ये दडून बसलेला असल्याने त्याला टिपणे सोपे नव्हते. आमचे बरेच तोफगोळे या हल्ल्यामध्ये वाया गेले.

यामुळे आम्हाला आमच्याकडे मोठ्या प्रमाणात दारूगोळा बाळगावा लागत असे. यामुळे रणगाड्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवर तैनात करावे लागले. रणगाडे नेण्यासाठी जागाही नसल्याने त्यांची तैनाती हे सर्वांत मोठे आव्हान होते. ज्या ठिकाणावर शत्रू सैनिक आपल्याला सहज पाहू शकणार नाहीत अशा ठिकाणी रणगाडे नेण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.

योग्य ठिकाणी आपला रणगाडा तैनात झाला आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी त्या प्रदेशाचे सर्वेक्षण होणे गरजेचे असते. आमच्याकडे हा सर्व्हेडेटा देखील नव्हता. शत्रू मात्र उंचावर असल्याने तो आम्हाला सहज टिपू शकत होता. भारतीय जवानांना खालून वर जायचे असल्याने त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.

तोफखान्यालाही भौगोलिक मर्यादांमुळे हे काम करताना असंख्य अडथळे येत होते. यामुळे ऐनवेळी रणनीती बदलण्यात आली. लष्कराच्या तुकड्यांना थेट हल्ल्यासाठी नेमण्यात आले, तर तोफखान्यातही नव्याने काही रणगाडे सामील करून घेण्यात आले. कोअर झोनभोवती तैनात करण्यात आलेल्या पोस्ट निरीक्षक अधिकाऱ्यांना द्रासमध्ये यावे लागले. मी त्यांना या सगळ्या मोहिमेची माहिती दिली. त्यांना ऐनवेळी शस्त्रसाठाही उपलब्ध करून दिला.

थेट हल्ल्याची रणनीती

येथील राष्ट्रीय महामार्ग आमच्या लष्करी हालचालींच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता. शत्रू राष्ट्राने त्यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती, त्यामुळे काही करून येथील हल्ला परतवून लावायचा होता. तोफखान्याचे ब्रिगेड कमांडर ब्रिज लखविंदर सिंग (सध्या निवृत्त मेजर जनरल) हे फार कल्पक होते. त्यांनीच मला शत्रू सैनिकांवर थेट हल्ला करण्याचा सल्ला दिला होता.

त्यासाठी ७५/२४ ची माऊंटन गन वापरावी असे त्यांनी सुचविले. या गनचे वैशिष्ट्य हे होते की तिचे आधी वेगवेगळे भाग करता येत असत आणि नंतर एक माणूस ती सहज खांद्यावरून वाहून नेऊ शकत असे. (ही गन वाहून नेण्यासाठी आमच्याकडे तट्टूंचा पर्याय उपलब्ध होता, पण त्याचा वापर करणे आम्ही टाळले.) माझ्या रेजिमेंटमधील ६५ जवान आणि अन्य युनिटच्या ३० जणांनी नायब सुभेदार मोहंमद शरीफ या ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरच्या नेतृत्वाखाली हे काम यशस्वीरीत्या पार पाडले.

त्यांनी शत्रू राष्ट्राच्या आघाडीवर ११४ फैरी झाडण्याचे काम केले. काही संशयित स्थानांना देखील लक्ष्य करण्यात आले. १२ व १३ जून १९९९ रोजीच्या रात्री टोलोलिंगच्या लढाईला तोंड फुटले. माझ्या नेतृत्वाखालील ५६ माऊंटन ब्रिगेड या युनिटकडे या भागाची जबाबदारी होती. १९७ फिल्ड रेजिमेंट तिच्याशी संबंधित होती.

अशाच एका दिवशी ब्रि. लखविंदर सिंग यांचा दूरध्वनी मला आला, ते सांगत होते, ‘आलोक, अवघा देश आपल्याकडे पाहतो आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी व्हायचेच.’ त्याचदिवशी टोलोलिंग ताब्यात घेण्याची रणनीती आम्ही आखली. आमच्या रेजिमेंटचे घोषवाक्य होते ‘निश्चय विजय’.

ती रात्र निर्णायक ठरली. रात्रभर आमचा तोफखाना शत्रूवर आग ओकत होता. ११४ गन्स त्याच्यासोबतीला १२२ एमएम मल्टीबॅरल रॉकेट लाँचरच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले. टोलोलिंगच्या पश्चिमेकडे दडून बसलेल्या शत्रूला लक्ष्य करण्यासाठी १५५ एमएमच्या बोफोर्सचा वापर करण्यात आला. त्यानंतर मुख्य तोफखान्यातून निशाणा साधण्यात आला. १३ जून रोजी २ राजपुताना रायफल्स या लष्कराच्या बटालियनने केलेला हल्ला यशस्वी झाला.

याचवेळी फॉरवर्ड कंपनी कमांडर मेजर विवेक गुप्ता हे हुतात्मा झाले. कॅ. एम. के. सिंग हे माझ्या रेजिमेंटचे ऑब्झर्व्हेशन ऑफिसर होते, त्यांनी आमची कंपनी एकत्र ठेवण्याचे काम केले. दुसऱ्या बाजूला अन्य एका तुकडीसोबत त्यांची आगेकूच सुरूच होती. २ राजपुताना रायफल्सचे कमांडिंग अधिकारी हल्ला करत नाही तोवर त्यांनी ही खिंड लढविली.

त्यांच्या शौर्यामुळेच देशाला पहिला मोठा विजय मिळाला. हाच या युद्धाचा टर्निंग पॉइंट होता. द्रासची अख्खी डोंगररांग हाती आल्यानंतर हम्प, रॉकी नॉब आणि पॉइंट ५१४० हे सर्वांत उंचावरील पॉइंट आमच्या हाती आले. या सगळ्यामध्ये तोफखान्याने खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. रॉकी नॉब हा पॉइंट आम्ही बोफोर्सच्या माध्यमातून दिवसाढवळ्या शत्रूच्या ताब्यातून हिसकावून घेतला.

लढाईचा दुसरा टप्पा

पॉइंट ५१४० ताब्यात घेतल्यानंतर आमची दुसऱ्या टप्प्यातील लढाई सुरू झाली. २४ जून रोजी माझ्या एका रणगाड्यावर शत्रू राष्ट्राचा तोफगोळा आदळला. यामध्ये आम्हाला गनर उद्धव दास यांना गमवावे लागले. आसामच्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या या शूर जवानाने देशासाठी बलिदान दिले. पुढे त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आजही दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर त्यांच्या नावाची पाटी पाहायला मिळते. पुढे जूनच्या अखेरीस ब्लॅक रॉक, नॉल आणि पॉइंट ४७०० येथील रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. २ राजपुताना रायफल्स आणि १८ गढवाल रायफल्स यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.

या दोन्ही बटालियन २९/३० जूनच्या दिवशी यशस्वी झाल्या. या दोन्ही बटालियनमधील अनेक जवान हुतात्मा झाले, तर बरेचजण जखमीही झाले. आमच्या बॅटरी कमांडर आणि ऑब्झर्व्हेशन अधिकाऱ्यांनी शत्रूच्या तोफा नष्ट केल्या. त्यानंतर हा संघर्ष टायगर हिल येथे पोचला.

टायगर हिलचा संघर्ष

टोलोलिंग येथे शत्रूसोबत दोन हात करणाऱ्या १८ ग्रेनेडिअर्सला टायगर हिल ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. मला आजही चांगलेच आठवते, त्यांचे कमांडिंग ऑफिसर हे माझे ऑब्झर्व्हेशन अधिकारी कॅ. अमित शर्मा यांची मागणी करत होते. कारण शर्मा यांनी टोलोलिंग येथे उत्तम कामगिरी केली. शर्मा यांनी येथेही जखमी होईपर्यंत यशस्वीपणे खिंड लढविली.

भारताने टायगर हिल ताब्यात घेतल्यानंतर ११ जुलै १९९९ रोजी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. प्रत्यक्ष मोहिमेमध्ये रेजिमेंटचे नेतृत्व करण्याचा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे जवान माझ्या नेतृत्वाखाली एकदिलाने लढले. आमच्यातील एकजण हुतात्मा झाला तर नऊजण जखमी झाले. त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता.

मेजर मुश्ताक हुसैन (आता निवृत्त ब्रिगेडियर) यांनी आम्हाला कधीच दारूगोळा आणि रेशनपाणी यांची टंचाई भासू दिली नाही. आम्ही शत्रूवर २३ हजार २५९ फैरी झाडल्या. माझ्या रेजिमेंटमधील अधिकारी आघाडीवर लढले. प्रत्येकाने शौर्याने ही झुंज दिली. या युद्धातील विशेष कामगिरीबद्दल लष्करी सन्मानांनी आमचा गौरवही करण्यात आला.

(अनुवाद - गोपाळ कुलकर्णी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.