नवी दिल्ली - कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध आता सत्तारूढ भाजप आमदारांनीच दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्वरित नेतृत्वबदल केला तरच हे राज्य भाजपच्या हातात राहील असा इशारा दिला आहे. यावेळेस केंद्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांना साथ दिली नसल्याचे दिसत असून त्यामुळे त्यांना स्वतःलाच असंतुष्ट आमदारांच्या विरुद्ध लढाई लढावी लागत आहे.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानींपासून सुमित्रा महाजनां पर्यंतच्या वरिष्ठ नेत्यांना लावलेला पंचाहत्तरीचा निकष भाजप नेतृत्वाने खास येडियुरप्पा यांच्यासाठी बाजूला ठेवला होता. मात्र आता बदलत्या परिस्थितीत ७९ वर्षीय येडियुरप्पा यांची घटलेली लोकप्रियता, त्यांची घराणेशाही, त्यांच्याविरुद्ध एका वादग्रस्त सीडीचे प्रकरण आणि त्यांच्याविरुद्धचा पक्ष संघटनेतील असंतोष यामुळे त्यांना बदलणे भाग आहे, असे भाजप आमदारांपैकी बहुसंख्य्यांचे मत आहे.
येडियुरप्पा यांचे वय झालेले असताना त्यांच्या बी. वाय. विजयेंद्र आणि खासदार बी. वाय. राघवेंद्र या दोन मुलांच्या दबावाखाली कर्नाटकमधील भाजप संघटना गुदमरत असल्याचा जाहीर आरोप होत आहे. भाजप आमदारांपैकी किमान निम्म्या आमदारांनी येडियुरप्पा यांच्या घराणेशाहीविरुद्ध भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.
अलीकडे येडियुरप्पा यांचे एक वादग्रस्त सीडी प्रकरण कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. येडियुरप्पा विरोधी गटातील एका भाजप आमदाराने नुकतेच दिल्लीत येऊन येडियुरप्पा यांच्या सीडी आख्यानाचे ‘दर्शन’ पक्षनेतृत्वाला घडविले असे वृत्त आहे. येडियुरप्पा यांच्या दोन्ही मुलांची राज्य सरकार आणि प्रशासनातील वाढती लुडबूड सत्तारूढ आमदारांना चांगलीच खुपू लागली आहे. या नाराजीने आता उग्र रूप धारण केले आहे. केंद्रातील प्रल्हाद जोशी व राज्यातील के. एस इश्वरप्पा, लक्ष्मण सवदी, डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, गोविंद करजोल आदी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या वर्षाअखेर केंद्रीय नेतृत्व कर्नाटकमध्ये भाकरी फिरवेल व केंद्रातील कोणी नेता कर्नाटकात पाठवेल असा विश्वास येडियुरप्पा पुत्रांना आव्हान देणारे आमदार व्यक्त करत आहेत.
लक्षणीय बाब म्हणजे भाजपच्या मातृसंस्थेतील सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष हे दोन वरिष्ठ नेते कर्नाटकातलेच आहेत. केंद्रीय नेतृत्वाकडून या वेळेला येडियुरप्पा यांना अजिबात पाठिंबा न मिळण्याचे तेही ठळक कारण सांगितले जाते.
केंद्रीय नेतृत्त्वाचा पाठिंबा नाही
मोदीयुगात ज्या मोजक्या भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाऐवजी स्वतःचे मत चालविले त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, हिमाचलाचे प्रेमकुमार धूमल यांच्यानंतर येडियुरप्पा यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजप आमदारांना मध्ये असलेला असंतोषाचा वणवा त्यांना एकट्यालाच निस्तरू द्यावा व संधी मिळताच लवकरात लवकर भाकरी उलटावी अशी भूमिका सध्या भाजप नेतृत्वाने घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.