काँग्रेसचे मुख्य प्रतोद सलीम अहमद यांनी पुन्हा निवडणूक लढवल्यास बोम्मई हे भाजपचे उमेदवार असतील, असे सांगण्यात येत आहे.
Bengaluru News : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) अधिक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने भाजपने माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी बोम्मई यांना त्यांचा गृहजिल्हा हावेरीतून निवडणूक लढविण्याची सूचना केली आहे.
त्यामुळे त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती होण्यास उशीर झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत बोम्मई यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.
यावेळी कर्नाटकातून लोकसभेच्या किमान २० जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे हावेरीतून निवडणूक लढवावी लागेल, असे सांगून तातडीने जिल्ह्यातील संघटना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचा सल्ला दिला. हावेरीचे (Haveri Constituency) खासदार शिवकुमार उदासी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितल्याने भाजप एक मजबूत नेत्याच्या शोधात होता.
काँग्रेसचे मुख्य प्रतोद सलीम अहमद यांनी पुन्हा निवडणूक लढवल्यास बोम्मई हे भाजपचे उमेदवार असतील, असे सांगण्यात येत आहे. हावेरी मतदारसंघातून भाजपकडून माजी मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांचे पुत्र के. ई. कांतेश, माजी मंत्री बी. सी. पाटील आणि सर्वोच्च न्यायालयात वकील असलेले संदीप पाटील हे इच्छुक आहेत.
बोम्मई यांना तिकीट दिल्यास सर्वजण एकत्र येऊन भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे भाजप हायकमांडला (BJP High Command) वाटते. गेल्या विधानसभा निवडणुकीत हावेरीतील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी बोम्मई यांनी प्रतिनिधित्व केलेला शिगावी- सावनूर मतदारसंघ वगळता उर्वरित सात मतदारसंघ काँग्रेसकडे गेले आहेत. त्यामुळे बोम्मई हेच योग्य उमेदवार असल्याचे भाजपचे मत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची आघाडी केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यास भाजप बोम्मई यांना केंद्रात मंत्री बनवण्याचा विचार करत आहे. अर्थ खात्याचे त्यांना चांगले ज्ञान असल्याने केंद्रात अर्थमंत्री केले जाणार असल्याची चर्चा होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.