Karnataka Loksabha Election Result : कर्नाटक : दोन्ही पक्षांचा अपेक्षाभंग

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला भाजपपेक्षा कमी जागा जिंकूनही दिलासा मिळाला आहे.
BJP VS Congress
BJP VS Congressesakal
Updated on

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला भाजपपेक्षा कमी जागा जिंकूनही दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि केंद्रात सत्ता असलेला भाजप या दोन्ही पक्षांचा या निकालाने तसा अपेक्षाभंगच झाला आहे. भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व २८ जागा जिंकण्याचा दावा केला होता, तर काँग्रेसने २८ पैकी १५ ते २० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. परंतु भाजप १७ जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर काँग्रेसने नऊ जागांवर स्पष्ट आघाडी घेतली आहे.

काँग्रेसला पंचहमी योजनांचा, तर भाजपला जेडीएसशी केलेल्या युतीचा फायदा होताना दिसत आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) पक्षाकडे बुडती नौका म्हणून पाहिले जात होते. परंतु भाजपशी केलेल्या युतीचा त्यांना फायदा झाला आणि राज्यातील दोन जागा जिंकण्यात यश आले.

गेल्या २५ वर्षात लोकसभा निवडणुकीत केंद्रातील यूपीए सरकारच्या काळातही काँग्रेसला कधीच दुहेरी आकडा गाठता आला नाही. परंतु निदान यावेळी किमान दुहेरी आकड्याच्या जवळ तरी जाता आले. त्यामुळे विशेषत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची खुर्ची डळमळीत होण्यापासून वाचली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना या निवडणूक निकालामुळे धक्का बसला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गृहजिल्ह्यातील म्हैसूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला असला तरी राज्याचा एकूण निकाल सरकारला पूरकच म्हणता येईल. विशेषत: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या तुलनेत काँग्रेसने मोठी झेप घेतली आहे. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सर्वाधिक १८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला २००४ मध्ये फक्त ८ जागा, २००९ मध्ये सहा जागा, २०१४ मध्ये ९ जागा आणि २०१९ मध्ये फक्त एक जागा जिंकता आली होती.

आता काँग्रेसने राज्यात लोकसभेच्या नऊ जागा जिंकल्या आहेत. टक्केवारी बघितली तर गेल्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसने मोठे यश मिळविले. काँग्रेसच्या हमी योजनांना जनता साथ देईल व भाजपला दारुण पराभव पत्करावा लागेल, अशी भाजप गोटात भीती होती. त्यामुळेच भाजपने अंतर्गत विरोधातही जेडीएसशी हातमिळवणी केली.

त्याचा फायदा भाजपला जुने म्हैसूर व इतर काही भागात झाला नि काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यापासून रोखण्यात त्यांना यश आले. मात्र यावेळी कर्नाटकात मोदी लाटेचा विशेष प्रभाव दिसून आला नाही. मात्र काँग्रेसने मिळविलेल्या या यशात सिद्धरामय्या सरकारच्या कामगिरीला जनतेने दिलेली साथ असे मानण्यास हरकत नाही.

राज्यात भाजपने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी मतदानात सत्ताधारी काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा अंदाजे ०.५० टक्के जास्त मते मिळाली आहेत. जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला ४५.०१ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला ४५.४५ टक्के मते मिळाली. जेडीएसला ६.६७ टक्के मते मिळाली.

दक्षिण कर्नाटकात भाजपने चांगली कामगिरी केली आहे, तर उत्तरेत काँग्रेसची चांगलीच भरपाई झाली आहे. दुसरीकडे, कर्नाटक हे भाजपसाठी दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे भाजपला कर्नाटककडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या वेळेप्रमाणे मोदी लाटेच्या जोरावर २८ पैकी २५ जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत. भाजपने यावेळी राज्यात जेडीएससोबत आघाडी करून जोरदार निवडणूक प्रचार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, एच. डी. कुमारस्वामी यांनी जोरदार प्रचार केला. परंतु राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांना आपल्या जागा टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले नाही. १७ जागा जिंकल्याने भाजपला यावेळी राज्यात सुमारे आठ जागांचे नुकसान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.