कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पद सिद्धरामय्या यांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. (Karnataka Siddaramaiah named as next CM by Congress say sources)
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी राहुल गांधी अधिकृत मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावाला शिवकुमार यांनीही संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, डीके शिवकुमार कर्नाटक प्रदेशाध्यक्षम्हणून कायम राहतील आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात दोन महत्त्वाची मंत्रालये दिली जातील असेही सांगण्यात आलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाला. नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले.
दरम्यान, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आज दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या खासदार सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ निवासस्थानी भेट दिली. ती कर्नाटकातील निर्णय प्रक्रियेचा भाग असलेल्या काही नेत्यांना भेटेल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.