नवी दिल्ली : शांघाय येथील एका कंपनीच्या मदतीने काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश वादग्रस्त असल्याचा कथानके (नरेटिव्ह) पसरविण्याचे कारस्थान न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांनी आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रचल्याचा आरोप बुधवारी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केला. संकेतस्थळावर त्यांनी भारताच्या नकाशात ही दोन्ही राज्ये देशात न दाखविण्याचा अजेंडा जागतिक पातळीवर राबविला आणि तसे पुरावेही मिळाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
दिल्ली पोलिसांनी या दोघांना पंधरा दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने प्रबीर पुरकायस्थ व मनुष्यबळ प्रमुख अमित चक्रवर्ती यांना बुधवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिल्लीतील न्यूजक्लिकच्या कार्यालयाला सील ठोकले असून ४६ संशयितांची चौकशी केली. त्यांची डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
पतियाळा न्यायालयात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रबीर पुरकायस्थ, नेव्हिल रॉय सिंघम (चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रचार विभागाचे सक्रिय सदस्य) व सिंघम यांच्या मालकीची शांघाय येथील स्टारस्ट्रिम नावाची कंपनी यांच्यात ई-मेल्सची देवाणघेवाण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यात भारताचा नकाशा कसा तयार करावा व त्यात काश्मीर व अरुणाचल प्रदेश वादग्रस्त कसा दाखविता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काश्मीर व अरुणाचल प्रदेश हे वादग्रस्त भाग म्हणून कथानके पेरत ते जागतिक व देश पातळीवर पसरविण्याचे प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते.
उत्तरेकडील राज्यांच्या सीमेत फेरफार करणे व भारताच्या नकाशात काश्मीर व अरुणाचल प्रदेशचा भाग न दाखविण्याचा प्रयत्न हा देशाच्या ऐक्याला व अखंडतेला धोका निर्माण करण्याच्या हेतूने केला. परदेशातून मिळणाऱ्या निधीच्या मदतीने देशात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात व सेवेत अडथळा आणणे, शेतकरी आंदोलन रेंगाळत ठेवत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे कारस्थानही रचल्याचे म्हटले आहे.
पोलिसांच्या मते, प्रबीर पुरकायस्थ याने २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात निवडणुकीत अडथळा आणण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रॅसी ॲड सेक्युलरिझ्म नावाच्या संघटनेच्या मदतीने कारस्थान रचले होते.
अभिसार शर्मा यांची चौकशी
न्यूजक्लिक प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार अभिसार शर्मा यांची पुन्हा चौकशी केली. यापूर्वी अभिसार यांची मंगळवारी चौकशी केली होती. त्याचवेळी प्रबीर पूरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकेचे कागदपत्रे मागितली.
यावर सरकारी वकिलाने प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले आणि एकदम उडी मारू नका, असा सल्ला दिला. एफआयआरची प्रत देण्याची मागणी आरोपीच्या वकिलाने केली असता त्यास सरकारी वकिलाने विरोध केला.
देशात ९५ ठिकाणी छापेमारी
न्यूजक्लिक प्रकरणी दिल्लीत ८८ ठिकाणी आणि अन्य सात ठिकाणी असे एकूण ९५ भागात छापे घालण्यात आले. विशेष विभागाच्या कार्यालयातील ३७ पुरुष आणि ९ महिलांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.