VIDEO : केरळ टू काश्मीर - फक्त 170 रुपये घेऊन अवलियाची 'सायकल टूर'

kerala to kashmir
kerala to kashmir
Updated on

पुणे - लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर अनेकांना काय करावं असा प्रश्न पडला? अवघ्या 22 वर्षाच्या निदीनचीसुद्धा हीच अवस्था होती. त्याच्यासमोरसुद्धा आता काय असा प्रश्न होताच. दिग्दर्शक व्हायचं असं स्वप्न घेऊन तो जगत होता. ते स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं आणि त्यातच नोकरी गेली. अशावेळी त्यानं जग पहायचं ठरवलं. ते करतानादेखील स्वत:च्या हिंमतीच्या जोरावर असा निश्चय केला. आता त्यानं एकट्यानं धाडस करून केरळ ते काश्मीर असा प्रवास सुरु केलाय. 1 जानेवारीला सुरु केलेला प्रवास आता गुजरातच्या सुरतमध्ये पोहोचलाय. प्रजासत्ताक दिनी त्याचा मुक्काम सुरतमध्ये होता. 

केरळ ते काश्मीर जाण्यासाठी वाहन म्हणून त्यानं सायकलचा पर्याय निवडलाय. बरं ही लाँग ड्राइव्ह अशी तशी नाहीय तर अख्ख्या भारतात फिरायचा प्लॅन आहे या गड्याचा. देशाच्या दक्षिणेकडचं राज्य केरळमधून तो निघालाय आणि काश्मिरपर्यंत प्रवास करणार आहे. सोबतीला इतर कोणालाही न घेता हा प्रवास करायचा आहे. केरळच्या निदीन रेवीची ही सायकल फेरी भारत जवळून पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आहे. केरळमधील थ्रीस्सुरमधून निदीन निघालाय. या प्रवासासाठी तो चहा विकून पैसे मिळवणार आहे. पैशांची मदत स्वीकारायची नाही असा निश्चय करूनच तो घरातून बाहेर पडलाय.

गेल्या वर्षभरात जगाला कोरोनाने लॉकडाऊन केलं. या लॉकडाऊनमध्ये जी वेळ इतरांवर आली तीच नोकरी जाण्याची वेळ निदीनवरसुद्धा आली. एका हॉटेलमध्ये नोकरी करणारा निदीन बेरोजगार झाला. याकाळात त्याला समजलं की आपल्याला कोणी मदत करणार नाही. आपणच आपल्या पायावर उभा राहिलं पाहिजे. कोणावर अवलंबून नाही रहायचं. याच जाणीवेतून त्यानं मनाशी निश्चय केला आणि घरातून बाहेर पडून देशभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना सायकल हे पर्यावरणपूरक वाहन निवडलं. खरंतर सध्याच्या घडीला परवडणारं असं तो म्हणतो. 

चहा विकून भागवणार खर्च
केरळ ते काश्मीर असा त्याचा प्रवास 3 हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या प्रवासाला निघताना निदीनने फक्त 170 रुपये घेतलेत. मग या प्रवासात राहण्याचा, खाण्या-पिण्याचा खर्च कसा भागवणार असा प्रश्न साहजिकच कोणालाही पडू शकतो. कोणाकडून मदत मागितली का? कोणी स्पॉन्सर शोधलाय का असे अनेक प्रश्न मनात येतील. पण त्यानं असं काहीच केलं नाही आणि वाटेत कोणाकडूनही एक रुपयासुद्धा न घेण्याचं ठरवलं आहे. प्रवासात लागणारे पैसे तो चहा विकून कमावणार आहे. यासाठी त्याने सोबत स्टोव्ह आणि चहा तयार करण्यासाठीचं साहित्यही घेतलं आहे. दिवसभर सायकल चालवल्यानंतर संध्याकाळी तो चहा विकतो. त्यातही जितक्या पैशांची गरज आहे तेवढाच चहा विकायचा आणि पुढच्या मार्गाला जायचं असा त्याचा सध्याचा दिनक्रम आहे. 

'कोणावर अवलंबून राहू नका, कष्ट करा'
तुम्हाला जे हवंय ते स्व:त मिळवा, त्यासाठी कोणावर अवलंबून राहू नका असं निदीन म्हणतो. यासाठीच त्यानं आपला प्रवास करताना जे काही लागेल ते स्व:ताच्या पैशांतून करायचं. त्यासाठी कष्ट करायची तयारी असायला पाहिजे असं निदीन सांगतो. लॉकडाऊनने खूप काही शिकवलं. नोकरी गेल्यानंतर बाहेर पडण्याची प्रेरणाही यातूनच मिळाली असंही त्याने म्हटलं आहे.

आतापर्यंत चार राज्यांमधून प्रवास
गेल्या तीन आठवड्यात त्यानं चार राज्यांमधून प्रवास केला. सायकलला मागे कॅरेजवर मोठ्या बॅगमध्ये साहित्य, पुढे-मागे केरळ टू काश्मिर असा बोर्ड लावलेला हा 22 वर्षांचा मुलगा पाहिल्यावर काहींना संशयानेसुद्धा पाहिलं. पण जेव्हा तो खरंच सायकल प्रवास करून जातोय आणि त्याच्या स्वप्नांच्या दिशेनं प्रवास करतोय असं समजल्यानंतर लोकांनी कौतुक केलं. काहींनी त्याचं स्वागतही केलं आणि त्याची राहण्याची, जेवण्याची सोयसुद्धा केली. पुण्यात पोहोचला तेव्हा त्याचं स्वागत वाङदेवता मल्याळी कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आलं.

सायकलसाठी कॅमेरा विकला
दिग्दर्शक व्हायचं असं निदीनचं स्वप्न आहे. फोटोग्राफीसाठी त्यानं एक कॅमेराही घेतला होता. पण नोकरी गेली आणि त्यानंतर सायकल प्रवास करायचा ठरवलं तेव्हा सायकलीसाठी पैसे नव्हते. भावाची जुनी सायकल दुरुस्त करण्यासाठी त्यानं लहानसा कॅमेरा विकला. आता देशभर फिरून अनुभव घ्यायचा आहे. प्रत्यक्षात भारत पहायचा आहे. कसा आहे, भारतात काय चाललंय, काय घडतंय हे जवळून पहायचं आहे. त्यानंतर एक चित्रपट काढण्याची त्याची इच्छा आहे. 

परतीचा प्रवासही सायकलनेच
रोज 100 किलोमीटर प्रवास करणाऱ्या निदीनला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तरी काश्मीरमध्ये पोहोचायचं आहे. केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असा प्रवास केल्यानंतर तो आता गुजरातमधून राजस्थान, दिल्ली असा प्रवास करून काश्मीरला जाणार आहे. त्यानंतर परतीचा प्रवासदेखील तो सायकलनेच करणार आहे. यामध्ये तो नॉर्थ इंडियासह नेपाळ आणि भूटान या देशात जाण्याचा प्लॅनही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()