नवी दिल्ली : काही दिवसांवरच देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमीळनाडू या राज्यांचा तर पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ आणि सी वोटरने ओपिनियन पोल जारी केला आहे. यानुसार, या पाचही ठिकाणच्या निवडणुकांच्या विजयाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपची कामगिरी समाधानकारक असली तरीही एका राज्यांत मात्र भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी मागे टाकलं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावापेक्षा राहुल गांधी यांच्या नावाला या राज्याने पसंती दिली आहे. आणि हे राज्य आहे केरळ. या सर्व्हेनुसार, 55.84 टक्के केरळमधील लोक पंतप्रधान पदी राहुल गांधींना पाहू इच्छितात तर 31.95 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
केरळमध्ये असा आहे ओपिनियन पोल
केरळमध्ये 140 जागांसाठी निवडणूक होणार असून 82 जागांवर LDF अर्थात लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट विजयी होणार असल्याचा अंदाज टाइम्स नाऊ-सी-व्होटर सर्व्हेने दिला आहे. तर UDF म्हणजेच युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट 56 जागांवर विजयी होईल. तर भाजपला फक्त एकच जागा कशीबशी जिंकता येईल, असं हा सर्व्हे सांगतो. या सर्व्हेनुसार, LDF 78 ते 86 जागा जिंकू शकतो. UDF 52 ते 60 जागा तर भाजप 0 ते 2 जागा जिंकू शकतो. LDF च्या मतांची टक्केवारी 0.6 टक्क्यांनी घसरुन 43.5 वरुन 42.9 टक्क्यांवर येऊ शकते. तर UDF च्या मतांची टक्केवारी 38.8 वरुन 37.6 वर येऊ शकते. केरळचे सध्याचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन् यांच्या कामगिरीने केरळ राज्य समाधानी असून त्यांना 42.34 टक्के लोकांनी पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शवली आहे. केरळमधील 36.36 टक्के लोक या सरकारच्या कामगिरीने खूपच समाधानी असून 39.66 टक्के लोक हे समाधानी आहेत, असं हा सर्व्हे सांगतो.
इतर राज्यांमध्ये असा असू शकतो निकाल
या सर्व्हेमध्ये पुद्दुचेरीत (Puducherry) एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री म्हणून डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. इथेही 38 टक्के लोकांनी स्टॅलिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यात एआयडीएमकेसह भाजपला धक्का बसू शकतो. राज्यातील 234 जागांपैकी युपीएला 158 जागा मिळण्याची शक्यता आहे तर एआयडीएमके आणि भाजपच्या युतीला 65 जागा मिळतील असा अंदाज आहे. आसाममध्ये भाजपसाठी चांगलं वातावरण दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार येऊ शकतं. इथं 126 पैकी 67 जागी भाजप जिंकण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.