कोरोनावर कोवॅक्सिन लस ५० टक्केच प्रभावी

कोरोनावर कोवॅक्सिन लस ५० टक्केच प्रभावी

८० टक्के रुग्ण हे कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराने बाधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
Published on

नवी दिल्ली : कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस केवळ ५० टक्केच प्रभावी असल्याचे लॅन्सेट या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
लॅन्सेट नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून कोवॅक्सिन लसीबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या अभ्यासाच्या कालावधीत भारतात आढळणाऱ्या एकूण करोनाबाधितांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण हे कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराने बाधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हा अभ्यास प्रामुख्याने देशात करोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना करण्यात आला. या काळात दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील करोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने अभ्यासासाठी घेण्यात आले होते. या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते. यातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर या सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले.

मात्र या अभ्यासाला अनेक मर्यादा असल्याचे संशोधकांनी मान्य केले आहे. रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या, अत्यवस्थ असणाऱ्या आणि मृत्युमुखी पडलेल्या करोनाबाधितांवरील लसीच्या प्रभावाबाबत अधिक अभ्यासाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, लसीच्या परिणामकारकतेत कालानुरूप झालेला बदल या अभ्यासात तपासण्यात आला नाही, असे संशोधकांनी सांगितले.

अडीच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास
या अभ्यासासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील एकूण २ हजार ७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना करोनाची लक्षणे जाणवत होती. त्यांनी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये आरटीपीसीआर चाचणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते. अभ्यासासाठी करण्यात आलेल्या चाचण्यांनंतर कोवॅक्सिनचे दोन डोस या कर्मचाऱ्यांवर ५० टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळून आले.

लस कमी प्रभावी ठरण्याची कारणे -
- बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चाचण्या लस घेतल्याच्या पहिल्या २० दिवसांमध्ये
- करोना सर्वात गंभीर स्वरूपात असताना झालेला अभ्यास
- ‘हाय रिस्क’ गटात मोडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास
- दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वोच्च पातळीवर असताना झालेला अभ्यास
- डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत असलेल्या काळातील अभ्यास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.