Kushinagar Loksabha Election : कुर्मी मतदारांनी वाढविली भाजपची चिंता

कुशीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एक जूनला निवडणूक होणार आहे. येथे भाजपचे मावळते खासदार विजय दुबे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.
pintu sinh saithwar and vijay dube
pintu sinh saithwar and vijay dubesakal
Updated on

कुशीनगर (उत्तर प्रदेश) - भगवान बुद्धांचे परिनिर्वाण स्थळ कुशीनगरमध्ये पंतप्रधान मोदींनी दोन वर्षात केलेल्या तीन दौऱ्यांच्या निमित्ताने भाजपने उत्तर प्रदेशातील आणि देशाच्या अन्य भागातील दलित मतांना साधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, कुशीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये हक्काच्या सैथवार(कुर्मी) मतपेढीमध्ये होणाऱ्या विभाजनाने भाजपची डोकेदुखी वाढविली आहे.

कुशीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एक जूनला निवडणूक होणार आहे. येथे भाजपचे मावळते खासदार विजय दुबे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर ‘इंडिया’ आघाडीतर्फे समाजवादी पक्षाने(सप) पिंटू सिंह सैथवार यांना उमेदवारी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडून राष्ट्रीय शोषित समाज पक्ष (आरएसएसपी) स्थापन केल्यानंतर कुशीनगरमधून स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याने येथील लढत तिरंगी बनली आहे.

कुशीनगर लोकसभा मतदारसंघ ब्राह्मणबहुल असला तरी इथे यादवेतर अन्य मागासवर्गीयांमध्ये सैथवार म्हणजेच कुर्मी तसेच कुशवाह मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. पूर्वांचल भागामध्ये कुर्मी व कुशवाह या दोन्ही समाजाच्या मतदारांची प्रामुख्याने भाजपशी जवळीक असल्याचे मानले जाते.

याच भागातील पडरौना राजघराणे देखील कुर्मी असून या राजघराण्याचे प्रतिनिधी व काँग्रेसमधील तरुण चेहरा राहिलेले आरपीएन सिंह यांनी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिल्यानंतर ‘सप’ने सैथवार यांना उमेदवारी देत भाजपच्या कुर्मी मतपेढीला धक्का दिला आहे.

पंतप्रधानांच्या संपर्क मोहिमा

बौद्ध धर्मस्थळ आणि मागासवर्गीयांचे आकर्षण केंद्र असलेले कुशीनगर हे बहुजन समाज पक्षाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थळ बनले असताना भाजपने उत्तर प्रदेशातील मागासवर्गीयांसाठी सुरू केलेल्या संपर्क मोहिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील दोन वर्षात स्वतः तीन वेळा कुशीनगरला येऊन दलित मतदारांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न केला.

बौद्धस्थळाच्या विकासाची चर्चाच गायब

जगभरातील धम्मप्रेमींसाठी कुशीनगरचे अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या बौद्धस्थळाच्या विकासाचा मुद्दा कुशीनगर लोकसभा निवडणुकीच्या जातकेंद्रीत प्रचारात फारसा चर्चेत नाही. उद्या (ता. २३) बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने होणाऱ्या २५६८ व्या त्रिविध पावनी बुद्ध जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने किमान या पवित्रस्थळाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी आणि ते मार्गी लागावेत, अशी अपेक्षा बौद्ध धर्मगुरूंची आहे.

या ठिकाणी जगभरातून भाविक येतात. जपान, थायलंड, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, ह़ॉंगकॉंग, दक्षिण कोरिया यासारख्या देशांमधून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील उल्लेखनीय आहे. परदेशी भाविकांसाठी पुरेशा सुविधांचा कुशीनगरमध्ये अभाव असल्याचे कुशीनगरच्या भदंत ज्ञानेश्वर बुद्धविहाराचे प्रमुख महाथेरो भंते महेंद्र यांनी व्यक्त केली.

कुशीनगरचे महागुरू भदन्त चंद्रमणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. भदंत ज्ञानेश्वर हे भदंत चंद्रमणी यांचे शिष्य तर महाथेरो भंते महेंद्र हे भदंत ज्ञानेश्वर यांचे शिष्य आहेत. कुशीनगरच्या समस्यांकडे लक्ष वेधताना महाथेरो भंते महेंद्र यांनी सांगितले, की येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करून दीर्घकाळ लोटला तरी या विमानतळावर एखादा अपवाद वगळता एकही आंतरराष्ट्रीय विमान उतरलेले नाही.

एवढेच नव्हे तर मागील सहा महिन्यात येथून देशांतर्गत विमानांची उड्डाणेही थांबली आहेत. इथे लाइट अॅन्ड साउंड शो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मागील दोन वर्षात स्वतः दोन वेळा कुशीनगरला येणे यातून त्यांच्यासाठी या स्थळाचे महत्त्व लक्षात येणारे असले तरीही आपल्या परराष्ट्र धोरणात आंतरराष्ट्रीय पर्यटनाला प्रोत्साहनाचा अपेक्षित प्रमाणात समावेश नाही.

थायलंडसारख्या देशांप्रमाणे आपल्याकडेही व्हिसा प्रक्रिया सुटसुटीत आणि नि:शुल्क करण्याची, धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्यांना आगमनानंतर व्हिसा प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता, भंते महेंद्र यांनी बोलून दाखविली. याच परिसरात मैत्रेय योजनेसाठी १४ गावांमध्ये झालेले २७३ एकर भूसंपादन आणि संपादित झालेली भूमी, मैत्रेय योजना रद्द करून कृषी विद्यापीठासाठी हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला होणारा विरोध यामुळे कुशीनगर भागातील नाराज शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन यासारख्या गोष्टींची स्थानिक पातळीवर चर्चा अधिक असल्याचे जाणवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com