गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी शास्त्री सोळा वर्षांचे होते.
भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये उत्तरप्रदेशातील 'मुगलसराय' या ठिकाणी एका कायस्थ कुटुंबात मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव यांच्याकडे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते, त्यासाठी त्यांना सगळे 'मुंशी' म्हणत होते. शास्त्रींच्या आईचं नाव रामदुलारी होतं. हे आपल्या कुटुंबातील सर्वात लहान असल्यामुळे त्यांना 'नन्हें' म्हणायचे. ते फार लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. ते आपल्या आईबरोबर त्यांच्या आजोळी गेले अन् तिथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून शिक्षण घेतलं. काशी विद्यापीठातून त्यांना 'शास्त्री'ची पदवी मिळाली. त्यांनी आपले जातिसंज्ञा असलेले श्रीवास्तव नेहमीसाठी काढून टाकलं अन् आणि शास्त्री उपनाव लावलं. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री नावानं ते ओळखले जावू लागले.
शास्त्रींच्या 'त्या' निर्णयामुळे आईच्या आशा-आकांक्षांना हादरा
लाल बहादूर शास्त्रींचं लग्न मिर्झापूर येथे राहणाऱ्या गणेशप्रसाद यांची मुलगी ललिता यांच्यासोबत 1928 मध्ये झाले. त्यांना 6 अपत्ये झाली. दोन मुली कुसुम, सुमन आणि 4 मुले हरिकृष्ण, अनिल, सुनील आणि अशोक. त्यांच्या चारही मुलांपैकी आता फक्त दोनच हयातीत आहे. संस्कृत भाषेत स्नातक स्तरावरील शिक्षण घेऊन ते भारत सेवा संघाशी जुडले आणि देश सेवा करण्याचे ठरवून राजकीय कारकिर्दी सुरु केली. शास्त्रींना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधींनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले.
त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी शास्त्री सोळा वर्षांचे होते. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशा आकांक्षांना चांगलाच हादरा बसला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, ते प्रयत्न असफल ठरले. लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता.
1965 : युद्धात भारताचा पाकिस्तानावर 'विजय'
शास्त्री हे गांधीवादी होते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. त्यांनी 1921 मध्ये असहकार चळवळीत, 1930 दांडी मार्च आणि 1942 भारत छोडो आंदोलनात प्रामुख्याने भाग घेतला. त्यांनी 'मरो नाही मारो' चा नारा दिला. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना देशाचे पंतप्रधान केले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952 च्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले आणि रेल्वे मंत्री झाले. नंतर 1961 मध्ये ते गृहमंत्री झाले. 9 जून 1964 पासून ते भारताचे पंतप्रधान झाले.
1965 मध्ये भारत आणि पाकच्या युद्धात पाकिस्तानावर भारताने विजय मिळविला. ही शास्त्रीजींच्या कारकिर्दीत देशातील सर्वोच्च कामगिरी होती. तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले.
लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. 11 जानेवारी 1966 रोजी रात्री भारताच्या या वीरपुत्राचे देशाच्या तत्कालीन पंतप्रधानाचे निधन झाले. त्यांच्या कार्याच्या अजोड प्रतिमेमुळे त्यांना 'भारतरत्नाचा' खिताब दिला गेला होता.
शास्त्रींची कारकिर्द : लाल बहादूर शास्त्रींनी 9 जून 1964 रोजी भारताचे दुसरे पंतप्रधान आणि तिसरे परराष्ट्रमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 17 जुलै 1964 रोजी त्यांनी आपल्या परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर सरदार स्वर्णसिंग यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
1965 सालचं भारत-पाक युद्ध : लाल बहादूर शास्त्री यांच्याच कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरं युद्ध झालं होतं. हे 'काश्मीर युद्ध' भारत-पाक दरम्यानचे पहिलं हवाई युद्ध म्हणून ओळखलं जातं. यात भारतानं पाकवर विजय मिळविला होता.
ताश्कंद करार आणि शास्त्रींचा मृत्यू : सन 1960 पर्यंत सोव्हिएत युनियन भारताचा सर्वात मोठा लष्करी सामग्री पुरवणारा देश होता. 1965 च्या युद्धानंतर 10 जानेवारी 1966 रोजी रशियाच्या मध्यस्थीनं भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकचे जनरल अयुब खान यांच्यात ताश्कंदमध्ये (तत्कालीन सोव्हियत संघ, आत्ताचा उझबेकिस्तान) एक बैठक पार पडली. या बैठकीत पाकचा 710 चौकिमीचा प्रदेश भारताला, तर भारताचा 210 चौकिमी प्रदेश पाकला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 11 जानेवारी 1966 रोजी शास्त्रींचा ताश्कंदमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराचे दोन झटके आल्यानं झाल्याचा पहिल्यांदा सांगितलं गेलं.
लाल बहादूर शास्त्रींवरील पुस्तके
गोष्टीरूपी लाल बहादूर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
शांतीदूत लाल बहादूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
लाल बहादूर शास्त्री नावाच्या संस्था
लाल बहादूर शास्त्री झोपडपट्टी नं. 1, 2, 3 : मुंबईतील वांद्रा स्टेशनच्या पश्चिमेला असलेली झोपडपट्टी
लाल बहादूर शास्त्री मार्ग (एल.बी.एस.रोड-मुंबई) : जुने नाव - (सायनपासून ते मुलुंडपर्यंतचा) आग्रा रोड
लाल बहादूर शास्त्री रोड (नवा एटी-फीट रोड, पुणे) : जुने नाव : नवी पेठ; अलका टाॅकीज ते स्वारगेटपर्यंतचा रस्ता
लाल बहादूर राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी, डेहराडून, उत्तराखंड
टीप : या लेखात माहिती संकलनासाठी लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित पुस्तकं व इतर माध्यमांचा संदर्भ घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.