Latest Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज (ता.१०) संपण्याची चिन्हे आहेत.
Live Update
Live UpdateEsakal
Updated on

Ram Mandir: राम मंदिर सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

Congress Yatra: भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधूनच निघणार; काँग्रेसचा निर्धार

मणिपूरमध्ये भारत जोडो यात्रेसाठी सरकारने सार्वजनिक जागा उपलब्ध करुन देण्यास नकार दिलाय. यावर काँग्रेसचे नेते केसी वेणूगोपाल म्हणालेत की, कोणत्याही परिस्थितीत मणिपूरमधूनच या यात्रेची सुरुवात होईल.

Shisena Disqualification case: निकालानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव; ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यक्रर्ते समोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Ashish Shelar: अपात्रता निकालानंतर आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार

शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरा वार केलाय. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय.

मुख्यमंत्री पद सोडावे लागले

खासदार गमावले...

आमदार, नगरसेवक आणि संपूर्ण पक्ष ही हातून गेला...

आता तर पक्षप्रमुख पदही हाती राहिले नाही...

हे सगळे एका "अहंकाराने" "करुन दाखवले"!

पुराण आणि इतिहासातील अहंकारी पत्रांमधे आज आधुनिक भारतातील एका "मर्द" नावाची भर पडली.

आता बिलकिस बानो वर चर्चा करा... सरकार पडण्याच्या नव्या तारखा द्या...

रिकामटेकडा खूप वेळ आहे!!

पत्रकार पोपटलाल यांच्या तोंडून

अजूनही अहंकाराची वाजवत बसा पुंगी...

मग सुटून जाईल उरली सुरली राजकीय फाटकी लुंगी!!

शिवसेनेचा निकाल लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा - नाना पटोले

शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावलल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनाही यावेळी डावलल्याचे स्पष्ट दिसते. राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल दिल्लीतील गुजरात लॉबीने लिहून दिलेला ड्राफ्ट वाटत असून हा निकाल महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शिवसेनेच्या निकालानंतर संभाजी नगरमध्ये शिंदे-ठाकरे गटाचे नेते एकमेकांना भिडले

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आलेल्या निर्णयानंतर संभाजी नगरमध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. त्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. दोन्ही गटांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.

ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाकडून जलोष

विक्रोळीत शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात शिंदें गटाकडून जलोष सुरू झाला आहे. विक्रोळीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून फटाके फोडून मिठाई वाटप करुन घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला.

केंद्राकडून कर्नाटकबद्दल अनादर- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसंदर्भात कर्नाटकच्या मागणीवर पुनर्विचार करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. ''ते कर्नाटक आणि कन्नडिगांबद्दल अनादर दाखवत आहेत," असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूमध्ये सांगितलं.

काँग्रेस नेते राम मंदिर सोहळ्याला जाणार नाहीत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्ष नेते अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारणार नाही.

अनुराग ठाकूर, पुनीत बालन अन् फडणवीसांमध्ये बैठक

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांनीही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अर्धा तास चर्चा केल्यानंतर अनुराग ठाकूर सागर बंगल्यावरुन रवाना झाले. अनुराग ठाकूर आणि फडणवीस यांच्यात बैठक सुरु असतानाही पुनीत बालन उपस्थित होते.

''हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा हेलिकॉप्टरमधून शेती केलेली चांगली''

हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती कारण चांगलं, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते यवतमाळ येथून बोलत आहेत.

दोन्ही गटाचे वकील सेंट्रल हॉलमध्ये दाखल

शिंदे आणि ठाकरे गटाचे वकील सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे.

आम्ही घेतलेला निर्णय हा कायदेशीर आहे- संजय शिरसाट

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, 'आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे. आम्ही कोणताही गट किंवा पक्ष स्थापन केलेला नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत'

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला

आमदार अपात्रतेच्या निर्णयाआधी हालचालींना वेग आला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.

ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी

थोड्याच वेळात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर निकाल दिला जाणार आहे. दिल्लीतील ठाकरे गटाच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला असून नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच जाण्याची तयारी दाखवली आहे.

निकालाआधी संजय राऊत मातोश्रीवर

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय दिला जाणार आहे. या निकालाआधी संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

पालघर मतदार संघ तिसऱ्यांदाही जिंकायचाच आहे- उद्धव ठाकरे

सध्या उद्धव ठाकरे पालघरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की शिवसेनेने दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. हा मतदार संघ तिसऱ्यांदा जिंकायचाय.

Manipur Govt : मणिपूर सरकारचा काँग्रेसला धक्का; भारत जोडो न्याय यात्रेस परवानगी नाकारली

मणिपूर सरकारने काँग्रेसला धक्का दिला आहे. राज्याच्या एन बिरेन सिंग सरकारने राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रा' लाँच करण्यास परवानगी नाकारलीये. ही यात्रा 14 जानेवारीला इंफाळ पूर्व जिल्ह्यातील कांगजेबुंग येथून सुरू होणार आहे. यानंतर मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीला यात्रा सुरू करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यास भाग पाडले आहे.

दारू घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय सिंह, मनीष सिसोदियांना पुन्हा झटका, सुनावली न्यायालयीन कोठडी

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. न्यायालयाने दोन्ही नेत्यांना 20 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, संजय सिंह यांच्या निकटवर्तीय सर्वेश मिश्रा यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या हुपरीतील सभेकडे मुरलीधर जाधवांसह समर्थकांनी फिरवली पाठ

आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे यांची हुपरी शहरात सभेला सुरवात झाली असून आदित्य ठाकरेंच्या सभेकडे मुरलीधर जाधव यांच्यासह समर्थकांनी पाठ फिरवली आहे. मुरलीधर जाधव यांची काही दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे.

Harishchandra Ghat in Bengaluru : आईने हत्या केलेल्या चार वर्षांच्या मुलावर अंत्यसंस्कार

कर्नाटक : गोव्यात आई सुचना सेठने हत्या केलेल्या चार वर्षांच्या मुलावर बेंगळुरू येथील हरिश्चंद्र घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेत्यांकडून भारत जोडो न्याय यात्रेचा रोड मॅप-पॅम्प्लेट जारी

दिल्ली : काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा रोड मॅप आणि पॅम्प्लेट जारी केले.

PM Narendra Modi : भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था : PM मोदी

भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. १० वर्षांपूर्वी भारत ११ व्या क्रमांकावर होता. येत्या काही वर्षात भारताचा जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थेमध्ये समावेश होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान बोलत होते.

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

✅राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.

✅ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी

✅शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.

✅'सत्यशोधक' मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी

✅जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी

✅पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत वाढ.

✅महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार

✅श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी

✅ राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी

Shivsena MLA Disqualification Case: ठाकरेंचे दोन शिलेदार विधानभवनात उपस्थित राहणार नाहीत

कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थितीत. अनिल देसाई कोल्हापुरात तर अनिल परब मुंबईबाहेर आहेत. अनिल परब आणि अनिल देसाई निकाल वाचनाच्या वेळी विधानभवनात उपस्थित राहणार नाहीत.

Shivsena MLA Disqualification Case: आमदार अपात्रता निकाल लाईव्ह बघता येणार

विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांची बैठक सुरु झाली आहे. विधिमंडळातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रेचा निकाल संध्याकाळी देणार आहे त्याआधी नियोजन कसे आहे याचा आढावा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. तसेच आमदार अपात्रता निकाल लाईव्ह बघता येणार आहे

CM Eknath Shinde: शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने..., एकनाथ शिंदे यांचा दावा

शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडेण. असे मत एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे.

Yashomati Thakur: लोकशाहीला खूप मोठा धक्का असेल: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर

आमदार अपात्रतेवर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, हा संविधानिक निर्णय असायला पाहिजे एवढी आम्हाला अपेक्षा आहे. जे काही खरं असेल ते झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्हाला शंका आहे हा निर्णय पॉलिटिकल असेल.

संविधानिक निर्णय घेणार नाही असा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला.. त्यामुळे लोकशाहीला खूप मोठा धक्का असेल असेही त्या म्हणाल्या.

Aaditya Thackeray: ...तर 40 गद्दार अपात्र होतील: आदित्य ठाकरे

अध्यक्ष महोदय वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात म्हणजेच न्यायमूर्ती आरोपींना भेटल्यासारखं झाला आहे. असा प्रकार महाराष्ट्रात याआधी कधीही झालेला नव्हता. कोणत्याही निमित्ताने बैठक किंवा फोन केला असता तर चाललं असतं त्यांचं फोन कोण टॅपिंग करणार आहे. त्यांचं एकमेकांवर विश्वास नाही त्यांना आपले फोन टॅप होतात असे वाटत असेल. अध्यक्ष महोदय कोणतं संविधान पाळत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे केलं तर 40 गद्दार अपात्र होतील. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

फेलोशिपचा पेपर फुटला, परीक्षार्थी आक्रमक

आज महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटठल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे. नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात पेपर फुटल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केला. विधान परिषद आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा कॉलेजला पोहचले आहेत. विद्यार्थ्यांनी वारंवार होणाऱ्या पेपर फुटी वर संताप व्यक्त केला. पेपर छापील नसून xerox कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Prithviraj Chavan: निकाल वेगळा आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागू -पृथ्वीराज चव्हाण

विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री यांना भेटायला गेलेलं मी कधी याआधी पाहायला मिळालं नव्हतं चुकीचा पायंडा पाडला गेला आहे. जर निकाल वेगळा आला तर आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागू, पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

बार्टीचा पेपर फुटल्याचा संशय असल्याने विद्यार्थ्यांचा नागपुरात गोंधळ

आज बार्टीचा पेपर होता मात्र पेपर फुटल्याचा संशय असल्याने विद्यार्थ्यांनी नागपूर येथे गोंधळ सुरू केला आहे.

Narahari Ziraval: आताचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक, योग्य निर्णय घेणार - नरहरी झिरवळ

आजच्या निर्णयावर भाष्य करणे योग्य वाटत नाही. आताचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक आहे. ते योग्य तोच निर्णय घेणार, असे नरहरी झिरवळ म्हणाले.

Parliament Security Breach Cases: संसद सुरक्षा भंग प्रकरणात आरोपी नीलम आझादच्या जामीन अर्जावरील सुनावणी रद्द

संसद सुरक्षा भंग प्रकरणात आरोपी नीलम आझादच्या जामीन अर्जावरील सुनावणी 16 जानेवारी 2024 रोजी या प्रकरणाचा तपास अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आली.

Pune - Mumbai Deccan Quinn: पुणे - मुंबई डेक्कन क्विनच्या डब्याच्या खालच्या भागातून धूर निघाल्याची घटना

पुणे - मुंबई डेक्कन क्विनच्या डब्याच्या खालच्या भागातून धूर निघाल्याची घटना घडली आहे. कर्जतच्या जवळ अचानक धावत्या रेल्वेतून धूर निघाल्याने रेल्वे 10 मिनिटे थांबवली होती. कोणतीही दुर्घटना झाली नसून रेल्वे पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजून 55 मिनिटांच्या दरम्यान घटना घडली आहे. पण सातत्याने अश्या घटना घडत असल्याचं प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने देखभालीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Sanjay Raut: मुख्यमंत्री शिंदेंची निवड बेकायदेशीर म्हणजे सरकारही बेकायदेशीर- संजय राऊत

मुख्यमंत्री शिंदेंची निवड बेकायदेशीर म्हणजे सरकारही बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे. आजचा निर्णय देणं ही केवळ औपचारीकता आहे, मॅच फिक्सिंग झाली आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. जगविख्यात क्रिकेटचे कोच रमाकांत आचरेकर यांच्या शिवाजी पार्क परिसरात उभारण्या येणाऱ्या पुतळ्यासंदर्भात ही भेट घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसंकल्प अभियान हिंगोली नंतर पुढील अभियान रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसंकल्प अभियान हिंगोलीनंतर पुढील अभियान रद्द करण्यात आले आहे. आज हिंगोलीनंतर धाराशिव येथे सभा होणार होती.

आज १० वाजता राज्य मंत्रीमंडळ बैठक

आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल समोर येईल, त्याआधीच सकाळी १० वाजता मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे.

Vaidyanath Sugar Factory : परळीतील वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस; 25 जानेवारीला होणार ई-लिलाव

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँकने जाहीर केलीये.

शास्त्रींनी अयोध्येपर्यंत केली 7,200 किलोमीटरची पदयात्रा

तेलंगणा : हैदराबाद येथील छल्ला श्रीनिवास शास्त्री या 64 वर्षीय व्यक्तीने राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी 'चरण पादुका' घेऊन अयोध्येपर्यंत 7,200 किलोमीटरची पदयात्रा केली.

Nizamuddin Express : निजामुद्दीन एक्स्प्रेस 16 व 30 जानेवारीला स्थगित

कोल्हापूर : मथुरा (उत्तर प्रदेश) येथे रेल्वे रूळावर तांत्रिक दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या १६ व ३० जानेवारीला दोन दिवस कोल्हापूर ते हसरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (दिल्ली) रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातील शाहू टर्मिनन्सवरून हसरत नजामुद्दीन रेल्वे सुटते. ही रेल्वे कोल्हापूर, पुणे, मनमाड, खांडवा, इटारसी, झांशी, ग्वाल्हेर, मथुरामार्गे आग्रा पुढे हसरत निजामुद्दीन मार्गावर प्रवासी सेवा देते. याच मार्गावरील पलवन व मथुरा येथील रेल्वेरूळात तांत्रिक बिघाड झाला असल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी १६ व ३० जानेवारीला या रेल्वेचा येता-जाताचा प्रवास रद्द केला आहे.

Hatkanangle Nagar Panchayat : हातकणंगले नगरपंचायतीची करवाढ अखेर रद्द

हातकणंगले : नगरपंचायतीने लादलेल्या अन्यायी करवाढीला विरोध करण्यासाठी करवाढविरोधी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला अखेरीस यश आले असून घनकचरा व्यवस्थापन, वृक्ष, शिक्षण, अग्निशामक, दिवाबत्ती कर आदींसह सर्व करवाढ रद्द केले असून केवळ मालमत्तेवरील पाच टक्के मुल्यांकन मान्य करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय नगर पंचायतीने बोलविलेल्या विशेष सभेत मान्य करण्यात आला. चार वर्षांपूर्वी हातकणंगलेसह जिल्ह्यात आजरा, चंदगड, शिरोळ, हुपरी याठिकाणी नगरपंचायती मंजूर झाल्या. याठिकाणी अजूनही पूर्वीचीच कर आकारणी सुरु असताना हातकणंगले नगरपंचायतीने जनतेला विश्वासात न घेता अन्यायी करवाढ लादली. तशा नोटीसा सर्व म्हणजे सुमारे ३२५६ मिळकतधारकांना दिल्या होत्या. या निर्णयाविरोधात वाढीव करविरोधी कृती समितीने सुमारे १३०० हरकती दाखल केल्या. त्यामुळे प्रशासनास अखेरीस नमते घेण्याची वेळ आली.

Aditya Thackeray : भाजपच्या संविधानाप्रमाणे निर्णय घेतल्यास आम्ही बाद होऊ - आदित्य ठाकरे

उजळाईवाडी : आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतात की आपली बदनामी करून घेतात याकडे जगाचे लक्ष असून, डॉ. आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे निर्णय घेतल्यास ४० आमदार अपात्र होतील व भाजपच्या संविधानाप्रमाणे निर्णय घेतल्यास आम्ही बाद होऊ, असा दावा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Live Update
Shiv Sena Politics : 'असा' निर्णय घेतल्यास ते 40 आमदार अपात्र ठरतील; निकालापूर्वीच आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Llyod Austin : अमेरिकेचे संरक्षण सचिव लायड ऑस्टिन यांच्यावर उपचार सुरू

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षण सचिव लायड ऑस्टिन यांच्यावर प्रोस्टेट कर्करोगावर उपचार सुरू आहेत. सीएनएनने याबाबत वृत्त दिले आहे. मंगळवारी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरचा हवाला देऊन सीएनएननं वृत्त दिलंय की, ऑस्टिन यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे ते अजूनही उपचार घेत आहे.

IMD Weather Update : देशातील विविध भागात पुढील 48 तासात पावसाची शक्यता

देशातील हवामानात सध्या मोठा बदल जाणवत आहे. गेल्या 24 तासात देशातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलीये. दक्षिण भारतासह कोकणाला पावसानं झोडपलं आहे. आजही हवामान खात्याने देशातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे पुढील 48 तासात देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे.

Kolhapur : नऊ पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

कोल्हापूर : लोकसभेचे पडघम राजकीय स्थरावर वाजत असतानाच प्रशासकीय पातळीवर बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अकरा पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या इतर जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या बदल्या केल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या उद्‌घाटनदिनी उत्तर प्रदेशात 22 तारखेला सुटी जाहीर

लखनौ : अयोध्येत राममंदिराच्या उद्‌घाटनाच्या दिवशी, म्हणजे २२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. हा ‘राष्ट्रीय महोत्सव’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या दिवशी मद्यविक्री बंद राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

Mumbai Rain : मुंबईच्या काही भागात पावसाने लावली हजेरी

राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबईच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ संपण्याची चिन्हे! शिवसेना आमदार अपात्रतेचा आज महानिकाल

Latest Marathi News Live Update : मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज (ता.१०) संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सायंकाळी चार वाजता करणार आहेत. तसेच अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळा पार पडणार आहे, याची जय्यत तयारी सुरु असून काल मंदिराला पहिला सोन्याचा दरवाजा लागला आहे. त्याचबरोबर वातावरणात बदल पहायला मिळत असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. तसेच देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीवर बैठका होत आहेत. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.