prime minister narendra modi venkaiah naidu
prime minister narendra modi venkaiah naidusakal

भारताच्या सेवेसाठी समर्पित जीवन

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू गारू आज (ता. १ जुलै) पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत. जनतेच्या सेवेप्रती अविचल बांधिलकी असलेल्या व त्यासाठी सतत कार्यरत राहिलेल्या या नेत्याविषयी पंतप्रधानांनी व्यक्त केलेले मनोगत.
Published on

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू गारू आज (ता. १ जुलै) पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत. जनतेच्या सेवेप्रती अविचल बांधिलकी असलेल्या व त्यासाठी सतत कार्यरत राहिलेल्या या नेत्याविषयी पंतप्रधानांनी व्यक्त केलेले मनोगत.

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू गारू यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त दीर्घ व निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व हितचिंतकांना आणि समर्थकांनाही शुभेच्छा देतो. ज्या नेत्याचा जीवनप्रवास समर्पण, अनुकूलता आणि जनतेच्या सेवेप्रती अविचल बांधिलकीचे दर्शन घडवतो, अशा नेत्याचा सन्मान करण्याचा हा एक प्रसंग आहे.

राजकारणातील सुरुवातीच्या काळापासून ते उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळापर्यंत, व्यंकय्या गारू यांची कारकीर्द राजकारणातील गुंतागुंतींना सहजतेने आणि विनम्रतेने हाताळण्याच्या त्यांच्या असामान्य कौशल्याचा दाखला देते. त्यांचे वक्तृत्व, विद्वत्ता आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने असलेला भर यामुळे त्यांना सर्वच पक्षांकडून आदर मिळाला.

त्यांच्याशी अनेक दशकांपासून माझा परिचय आहे. आम्ही एकत्र काम केले आहे आणि मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे. त्यांच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट नेहमीच कायम राहिली असेल, तर ती म्हणजे लोकांविषयीचे प्रेम. आंध्र प्रदेशातील एक विद्यार्थिनेते म्हणून त्यांनी काम सुरू केले.

त्यांची प्रतिभा, वक्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये लक्षात घेता, कोणत्याही राजकीय पक्षात त्यांचे स्वागतच झाले असते, परंतु ते ''राष्ट्र प्रथम'' या दृष्टिकोनातून प्रेरित असल्यामुळे त्यांनी संघ परिवारासोबत काम करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी रा. स्व.संघ, अभाविप या संघटनांबरोबर काम केले आणि त्यानंतर त्यांनी जनसंघ आणि भाजपाला बळकट केले.

सुमारे ५० वर्षांपूर्वी जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा युवा व्यंकय्या गारू यांनी आणीबाणीविरोधी चळवळीत स्वतःला झोकून दिले. त्यांना तुरुंगवास झाला होता आणि तेदेखील का तर त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आंध्र प्रदेशात आमंत्रित केले म्हणून. लोकशाहीप्रतीची ही बांधिलकी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वारंवार दिसते. १९८०च्या दशकाच्या मध्यावर, जेव्हा एनटीआर यांचे सरकार काँग्रेसने कोणताही विधिनिषेध न बाळगता बरखास्त केले, तेव्हा लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते.

प्रतिकूल परिस्थितीच्या महाकाय लाटांमध्येही सहजतेने तरून जाण्यात व्यंकय्या गारू नेहमी यशस्वी ठरले. १९७८ मध्ये आंध्र प्रदेशाने काँग्रेसला मतदान केले; परंतु त्यांनी हा कल बदलून टाकला आणि ते तरुण आमदार म्हणून निवडून आले. पाच वर्षांनंतर, जेव्हा आंध्रात एनटीआर यांची त्सुनामी आली, तेव्हादेखील ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले, ज्यामुळे राज्यभर भाजपच्या वाढीचा मार्ग मोकळा झाला.

शब्दप्रभू अन् कार्यप्रभू

ज्यांनी व्यंकय्या गारू यांना बोलतांना ऐकले असेल त्यांना त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा प्रभाव जाणवला असेल. ते शब्दप्रभू आहेत, तितकेच कार्यप्रभूही आहेत. एक युवा आमदार असण्याच्या दिवसांपासून त्यांनी विधानमंडळातील कामकाजात जे परिश्रम घेतले आणि मतदारसंघातील लोकांच्या समस्यांना आवाज दिला त्याबद्दल ते आदराला पात्र ठरले.

एनटीआर यांच्यासारख्या दिग्गजाने देखील त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली आणि अगदी त्यांना सुद्धा व्यंकय्या त्यांच्या पक्षात यावेत असे वाटत होते, मात्र व्यंकय्या गारू यांनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून विचलित होण्यास नकार दिला. आंध्र प्रदेशात भाजपाला बळकट करण्यात आणि या पक्षाला गावोगावी पोहोचवण्यात आणि सर्व स्तरातील लोकांना यामध्ये सामावून घेण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांनी विधानसभेच्या सदनात पक्षाचे नेतृत्व केले आणि आंध्र प्रदेश भाजपाचे ते अध्यक्ष देखील बनले.

१९९० मध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यंकय्या गारुंच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि १९९३ मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीसपदावर त्यांची नेमणूक केली, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या वाटचालीचा प्रारंभ झाला. जो किशोरवयात अटलजी आणि अडवाणीजींच्या दौऱ्यांसंबंधी लोकांना माहिती देत फिरत असायचा, त्याला त्यांच्यासोबत थेट काम करण्याची संधी मिळाली. हा क्षण निश्चितच महत्त्वाचा होता.

आपल्या पक्षाला सत्तेवर आणून देशाला भाजपाचा पहिला पंतप्रधान मिळावा, यासाठी एक सरचिटणीस म्हणून त्यांनी अथक काम केले. दिल्लीमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी आगेकूच केली.

इसवीसन २००० मध्ये अटलजी व्यंकय्या नायडू यांना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री बनवण्यासाठी आग्रही होते, त्यावेळी व्यंकय्या गारू यांनी तातडीने ग्रामीण विकास मंत्रालयाला त्यांची पसंती असल्याचे कळवले. यामुळे अटलजींसह सगळेच संभ्रमात पडले. पण, व्यंकय्या गारू यांचे विचार स्पष्ट होते. ते किसानपुत्र आहेत आणि त्यांनी आपले सुरुवातीचे दिवस खेड्यात व्यतीत केले असल्याने , त्यांना ग्रामीणविकास क्षेत्र खुणावत होते. मंत्री या नात्याने ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना’ ही संकल्पना आणि त्याच्या कार्यान्वयनाशी ते जवळून जोडले गेले होते.

अनेक वर्षांनंतर, २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांनी नगरविकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्यनिर्मूलन या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळातच आम्ही ‘स्वच्छ भारत मोहीम’ आणि शहरी विकासाशी संबंधित महत्त्वाच्या योजना सुरू केल्या. ग्रामीण आणि शहरी विकासासाठी एवढा मोठा कालावधीत काम करणारे बहुधा ते एकमेव नेते असावेत.

मी २०१४ मध्ये दिल्लीत आलो, तेव्हा दीड दशकांपासून गुजरातमध्ये काम केले होते. मात्र राष्ट्रीय राजधानीत मी बाहेरचा होतो. अशा काळात व्यंकय्या गारू यांचे अंतरंग जाणून घेणे अगदी सुलभ होते. ते एक प्रभावी संसदीयकामकाज मंत्री होते. ते द्विपक्षीयतेचे मूलतत्त्व जाणून होते. मात्र त्याचवेळी संसदीय नियम आणि निकषांच्या बाबतीत त्यांनी एक मर्यादा आखली होती.

आमच्या आघाडीने २०१७ मध्ये त्यांना आमचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले. व्यंकय्या गारू यांचे सरकारमधील महत्त्वाचे स्थान भरून काढणे कसे अशक्य आहे, याचा विचार करतांना आम्हाला पेचप्रसंगाचा सामना करावा लागला. मात्र त्याचवेळी उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणी नाही हेदेखील आम्हाला ज्ञात होते.

मंत्रीपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा देताना त्यांनी केलेले भाषण आपण कधीच विसरू शकत नाही. पक्षाशी असलेला त्यांचा संबंध आणि पक्षाची बांधणी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. यातून त्यांची खोलवर रुजलेली वचनबद्धता आणि उत्कटता याचे ओझरते दर्शन घडले. उपराष्ट्रपतिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध पावले उचलली ज्यामुळे कार्यालयाची प्रतिष्ठाही वृद्धिंगत झाली.

युवा खासदार, महिला खासदार आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्यांना बोलण्याची संधी मिळावी, याची दक्षता घेणारे असे ते राज्यसभेचे उत्कृष्ट सभापती होते. त्यांनी उपस्थितीवर अधिक भर देत समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी केले आणि सभागृहात चर्चेचा स्तरही उंचावला.

भावनिक क्षण

कलम ३७० आणि ३५ (ए) रद्दबातल करण्याचा निर्णय राज्यसभेच्या पटलावर ठेवण्यात आला तेव्हा व्यंकय्या गारू अध्यक्षस्थानी होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अखंड भारताच्या स्वप्नाकडे आकर्षित झालेला हा युवक हे स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात उतरले तेव्हा अध्यक्षस्थानी असल्याने हा त्यांच्यासाठी खूप भावनिक क्षण ठरला असेल याची मला खात्री आहे.

समाजकार्य आणि राजकारणाव्यतिरिक्त, व्यंकय्या गारू हे उत्तम वाचक आणि लेखकही आहेत. वैभवशाली तेलुगू संस्कृती दिल्लीतील लोकांसाठी शहरात आणणारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे उगाडी आणि संक्रांतीचे कार्यक्रम हे नक्कीच शहरातील सर्वांना प्रिय संमेलनांपैकी एक आहेत. व्यंकय्या गारू यांना आपण नेहमीच खाद्यपदार्थांची आवड जोपासणारे आणि लोकांचे आदरातिथ्य करणारे म्हणून ओळखतो.

ते अजूनही बॅडमिंटन खेळतात आणि वेगाने चालण्याच्या आनंदात रममाण होतात. शरीर स्वास्थ्याबाबत ते अतिशय जागरूक आहेत. उपराष्ट्रपतिपदाची धुरा सांभाळल्यानंतरही व्यंकय्या गारू हे सार्वजनिक जीवनात  सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय; तसेच देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींबाबत ते मला फोन करतात आणि त्याविषयी जाणून घेतात.

अगदी अलीकडे आमचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर मी त्यांना भेटलो. ते आनंदित झाले होते आणि त्यांनी मला आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांची कारकीर्द मैलाचा दगड ठरली. मला आशा आहे की युवा कार्यकर्ते, निवडून आलेले प्रतिनिधी आणि सेवा करण्याची आवड असलेले सर्वजण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ती मूल्ये आत्मसात करतील. त्यांच्यासारखे लोकच आपल्या देशाला अधिक चांगले आणि चैतन्यशील बनवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.