Jharkhand Lok Sabha : झारखंडमधील धनबाद मतदारसंघात भाजपच्या दुलू माहतो यांच्यासमोर ३५ वर्षीय तृतीयपंथी सुनयना सिंह यांचे आव्हान आहे. प्राणीशास्त्रातील पदवीधर असलेल्या सुनयना या नकी भारतीय एकता पार्टीकडून (एनबीईपी) रिंगणात उतरल्या आहेत. धनबादचा विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
धनबादमध्ये २५ मे रोजी मतदान आहे. या मतदारसंघात २२.५४ लाख मतदार असून त्यामध्ये ७८ मतदार तृतीयपंथी आहेत. राजकारणात उतरून जनतेची कामे करावी, अशी इच्छा असलेल्या सुनयना यांनी अपक्ष म्हणूनच या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. मात्र, ‘एनबीईपी’ने त्यांना उमेदवारी दिल्याने आता त्यांच्या मागे एका पक्षाचीही ताकद उभी राहिली आहे.
‘‘धनबाद हा कोळसा पुरवठादार जिल्हा असूनही येथे कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. खून आणि अपहरणाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मला या जिल्ह्यात शिक्षणाच्या परिस्थितीत सुधारणा करायची असून रोजगाराच्या संधी वाढवायच्या आहेत. धनबादमध्ये बेरोजगारी प्रचंड आहे, शिकलेल्या युवकांनाही नोकऱ्या नाहीत,’’ असे सुनयना यांनी निवडणूक लढण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. भ्रष्टाचाराविरोधातही लढा देण्याची आपली इच्छा असल्याचे सुनयना यांनी सांगितले.
सुनयना सिंह या ‘किन्नर मा ट्रस्ट’च्या जिल्हा अध्यक्षा आहेत. ‘माझा जन्म होताच माझे आईवडील मला रुग्णालयातच सोडून निघून गेले. त्यानंतर तृतीयपंथी समुदायाच्या राज्य प्रमुखांनी माझा सांभाळ केला. मी दिल्लीत नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र मला अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे पुन्हा धनबादला येऊन लोकांची सेवा करण्याचा मी निर्णय घेतला,’ असे सुनयना यांनी सांगितले. त्यांना स्थानिक जनतेचाही पाठिंबा मिळत आहे. अनेक लोक त्यांच्या प्रचार मोहिमेसाठी देणगी देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.