नवी दिल्ली- सर्वांचे लक्ष ४ जूनच्या निकालाकडे लागले आहे. भाजपकडून 400 पारचा नारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, इंडिया आघाडी देखील विजयी होण्याचा दावा करत आहे. देशातील जनता कोणाच्या पारड्यात मत टाकते हे स्पष्ट होईलच, पण दुसरा एक प्रश्न जनतेला पडत आहे. तो म्हणजे निवडणुकीनंतर राहुल गांधी यांचे भवितव्य काय असेल? आणि 2019 च्या निवडणुकीपेक्षा आताची निवडणूक राहुल गांधी यांच्यासाठी वेगळी का होती?
2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्याकडे पद होते आणि जबाबदारी देखील होती. आता त्यांच्याकडे पद नाही, पण जबाबदारी नक्कीच आहे. 2019 मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला, त्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली आणि त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राहुल गांधी यांनी 2019 ला राफेल विमानांचा मुद्दा, तसेच 'चौकीदार चोर है' असे मुद्दे प्रचारात घेतले होते. पण, त्यांना यश आलं नाही.
राहुल गांधी यांनी पक्षाचे पद सोडले असले तरी काँग्रेस पक्ष त्यांना सोडू शकला नाही. सोनिया गांधी या आता राजकारणात सक्रीय राहणार नाहीत हे समजताच राहुल गांधी यांना पुन्हा आणण्यात आलं. काँग्रेसमधील अनेक नेते राहुल गांधी यांच्याच नेतृत्वात काम करण्यासाठी तयार आहेत. खरगे यांच्याकडे अध्यक्षपद असले तरी राहुल गांधी यांच्याच शब्द अखेरचा मानला जातो.
राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी चांगला जोर लावला. त्यांनी दोन 'न्याय यात्रा' काढून भारतभर भ्रमण केलं. जनतेशी संवाद साधला. एका वेगळ्या रुपात राहुल गांधी लोकांना दिसले. यावेळी त्यांनी काही चांगले मुद्दे भाजपच्या विरोधात प्रचारात आणले. जात जनगणना, संविधान, श्रीमंताचे सरकार अशा काही मुद्द्यांनी त्यांनी केंद्र सरकारला घेरलं.
राहुल गांधींची प्रतिमा 2019 पेक्षा 2024 मध्ये जास्त सुधारली हे मान्य करावं लागेल. पण, असे असले तरी ते जनतेचा विश्वास संपादन करण्यात किती यशस्वी झालेत हे निकालादिवशीच स्पष्ट होईल. पण, समजा काँग्रेसने निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर राहुल गांधी यांना आता कोणते पद सोडावे लागणार नाही. कारण, सध्या त्यांच्याकडे कोणतेही पद नाही.
प्रश्न उरतो की राहुल गांधींची राजकारणाची पद्धत अयशस्वी ठरली तर काँग्रेसमधील नेते त्यांचं नेतृत्व तरीही मान्य करणार का? काँग्रेस नव्या नेतृत्वाचा शोध घेईल की आपल्या राजकारणाची पद्धत बदलेल हे पाहावं लागणार आहे. 2019 नंतर काँग्रेसमधील G-23 गटाने विरोधाचा सूर काढला होता. त्यातील काहींनी पक्ष सोडला तर काहींना शांत करण्यात आले. पण, यावेळी काँग्रेसमध्ये तीव्र स्वरुपाचे बंड पाहायला मिळू शकते. याशिवाय राहुल गांधी राजकारणातील वाटचालीबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.