पाटणा (बिहार) : बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व चाळीस जागा जिंकण्याचा केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) प्रयत्न आहे. मात्र, मतदारसंघनिहाय जातींचा प्रभाव लक्षात घेऊन उमेदवार देण्याच्या राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) नेते लालूप्रसाद यादव यांच्या खेळीने ‘एनडीए’च्या रणनीतीपुढे चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात नसूनही बिहारच्या निवडणुकांवर लालूंची छाप असल्याचेही चित्र तयार झाले आहे.
बिहारमध्ये २०२३ च्या जातिनिहाय जनगणनेनुसार २१५ जाती राज्यात आहेत. मात्र, निवडणुकीच्या मैदानात केवळ पंधरा जाती आहेत. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल २६ जागांवर, काँग्रेस नऊ तर पाच जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार लढत आहेत. मिसा भारती, रोहिणी आचार्य या दोन कन्यांना अनुक्रमे पाटलीपुत्र आणि वैशाली मतदार संघांमध्ये दिलेल्या उमेदवारी मुळे लालूंवर घराणेशाहीचा आरोप होत आहे. मात्र, दोन उच्चवर्णीय (भूमिहार व राजपूत), यादव, कुशवाह यासारख्या मागास जातींचा समावेश असलेल्या पिछडा श्रेणीत येणाऱ्या समुदायांमधून बाराहून अधिक उमेदवार तसेच अतिमागास जातीचे तीन, दलित तीन तर मुस्लिम दोन उमेदवार लालूंनी मैदानात उतरविले. तसेच परंपरागत मुस्लिम-यादव समीकरण जपण्याचीही काळजी घेतली. यामुळे बिहारची निवडणूक ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ ऐवजी भाजपविरुद्ध ‘आरजेडी’ अशी बनल्याचे निरीक्षण पाटण्यातील ज्येष्ठ पत्रकार अजयकुमार यांनी नोंदवले.
बिहारमध्ये पिछडा (मागास) म्हणविल्या जाणाऱ्या ओबीसी समूहात यादव जातीच्या खालोखाल कुशवाह (किंवा कोयरी) या जातीची लोकसंख्या ४.२ टक्के आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार प्रतिनिधित्व करत असलेल्या कुर्मी समुदायाची बिहारमध्ये २.८७ लोकसंख्या टक्के आहे.
आपली कुशवाह मतपेढी तयार करण्यासाठी भाजपने सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष बनविले. तर, सत्ताधारी संयुक्त जनता दलाने तीन आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाने एक कुशवाह उमेदवार दिला. यातून हा समूह एकतर्फी भाजपकडे जाऊ नये यासाठी महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दलाने तीन तर काँग्रेस, व्हीआयपी, भाकप-माले आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी प्रत्येकी एक असे सात कुशवाह उमेदवार मैदानात उतरवले. यामुळे एकूण ११ कुशवाह उमेदवार मैदानात उतरल्याचे दिसते आहे.
लालूंचे ‘सोशल इंजिनिअरिंग
हे लालूंचे योजनाबद्ध ‘सोशल इंजिनिअरिंग असल्याचे पाटण्यातील पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अमरनाथ तिवारी यांनी सांगितले. लालूंनी कुठे कुशवाह तर कुठे उच्चवर्णीय, कुठे अतिमागास यासारखे उमेदवार देऊन ‘एनडीए’ला आपली रणनीती बदलण्यासाठी भाग पाडले आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी लालूंचा हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
तर, बिहारमधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे अभ्यासक बी. एन. पटनाईक हे देखील यंदाची लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रीय जनता दल असल्याचे मान्य करतात. मात्र उमेदवार निवडीतून लालूंनी जातींचे समीकरण बांधले असले तरी उमेदवाराला त्या जातीतील मतदारांचा सरसकट पाठिंबा मिळेल, असे वाटत नाही असेही स्पष्टपणे नमूद करतात. एकीकडे मोदींची लोकप्रियता, मोफत धान्य वाटप योजना त्याचप्रमाणे लालूंच्या सत्ताकाळातील जंगलराज हे मुद्दे यादवेतर ओबीसी आणि अतिमागास समुदायातील मतदारांसाठी महत्त्वाचे असल्याने आरजेडीच्या मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही पटनाईक म्हणत.
नवादा भागातील कुशवाह बाहुबली अशोक महातो यांच्या पत्नीला राष्ट्रीय जनता दलातर्फे मुंगेरमध्ये उमेदवारी दिली. त्यातून लालूंनी मुंगेरसह मगध भागातील नवादा आणि नालंदामध्ये संयुक्त जनता दलाच्या कुशवाह मतपेढीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रकारे उजियारपूरमध्ये देखील भाजपचे केंद्रातले मंत्री आणि यादव समुदायाचे प्रतिनिधित्व उमेदवार नित्यानंद राय यांच्याविरुद्ध कुशवाह समाजाचे अलोक मेहता यांना उमेदवारी देऊन लालूप्रसाद यादव यांनी उजियारपूरच्या निवडणुकीत रंगत आणली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.