सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे या भागाचा झपाट्याने कायापालट होत असून पर्यटकांच्या अखंड ओघाचा लाभ अयोध्येपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर जिल्ह्याला मिळत असताना दिसत आहे. मोदी-योगी सरकारच्या काळात झालेली पायाभूत सुविधांची कामे आणि स्वच्छ प्रतिमा याच्या बळावर या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेनका गांधी यांचा विजय सुकर बनला आहे. महागाई आणि बेरोजगारी या समस्या असल्या तरी मेनका गांधी यांचे काम पाहून आम्ही त्यांना मत देणार आहोत, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.
अमेठी आणि रायबरेली मतदार संघाप्रमाणे सुलतानपूर मतदारसंघाला ग्लॅमर मिळाले नसले तरी राज्याच्या मध्यभागी असलेला हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्मृती इराणी यांचा अमेठी मतदारसंघ येथून केवळ ३० किलोमीटर अंतरावर आहे तर राहुल गांधी मैदानात असलेला रायबरेली मतदारसंघ शंभर किलोमीटरवर आहे. गोमती नदीकाठी असलेल्या सुलतानपूरवर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र मागील काही दशकांत हे चित्र बदलले आहे. आतापर्यंत १७ वेळा झालेल्या निवडणुकांत काँग्रेसने आठवेळा तर भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे. दुसरीकडे बहुजन समाज पक्षाने (बसप) दोनदा तर जनता दल, जनता पक्षाने येथून प्रत्येकी एकदा विजय प्राप्त केला होता. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाला अजूनपर्यंत येथे एकदाही खाते उघडता आलेले नाही.
२०१४ मध्ये मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी येथून विजय मिळवला होता. २०१९ मध्ये मेनका यांनी पिलिभीत मतदारसंघ बदलत सुलतानपूरमधून नशीब आजमावले होते. गत निवडणुकीत मेनका यांना १५ हजार मतांनी विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांनी बसपच्या चंद्रभद्र सिंह सोनू यांचा पराभव केला होता. यावेळी मेनका यांची लढत समाजवादी पक्षाचे (सप) नेते राम भुआल निषाद आणि बसपाच्या उदराज वर्मा यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात २५ मे रोजी मतदान होणार आहे. सुलतानपूरमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण २० टक्के असून अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या २१ टक्क्यांच्या आसपास आहे. ठाकूर, ब्राह्मण आणि ओबीसी मतदारांची संख्याही लक्षणीय प्रमाणात आहे.
मेनका गांधी यांचे त्यांच्या मतदारसंघावर लक्ष असते असे येथील मतदार सांगतात त्याचप्रमाणे योगी सरकार सत्तेत आल्यापासून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती खूप सुधारली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘‘आधी रात्री आठ वाजल्यानंतर घराबाहेर पडायला भीती वाटत असे. पण आता रात्री १२ वाजले तरी आम्ही काम संपवून निर्धास्त घरी जाऊ शकतो,’’ असे प्रतापगड मार्गावर हॉटेल चालविणाऱ्या विपुल पांडे नावाच्या युवकाने सांगितले.
मेनका गांधी यांनी विजय मिळवला तर नवव्यांदा त्या लोकसभेत पोहोचतील. याआधी पिलिभीतमधून त्यांनी सहावेळा तर सुलतानपूर आणि आंवला मतदारसंघातून प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. मेनका यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९८४ मध्ये झाली होती. त्यावेळी त्यांनी पहिली निवडणूक अमेठीमधून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात अपक्ष म्हणून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी व्ही. पी. सिंह यांच्या जनता दलात प्रवेश केला होता. १९८८९ मध्ये त्या पिलिभीतमधून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
‘‘मेनका गांधी सर्वांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुस्लिम मतदारांतही त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.’’
-समशेर खान, सुलतानपूर येथील कापड विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.