PM Modi : मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय संबंध बळकट करण्याची अपेक्षा

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’वर पोस्ट करून मोदींचे अभिनंदन केले आहे.
PM Modi
PM Modi Sakal
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ला (एनडीए) लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आदी नेत्यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ‘एक्स’वर पोस्ट करून मोदींचे अभिनंदन केले आहे. मोदी यांच्या विजयाने चीन व भारताचे संबंध सुदृढ आणि स्थिर राहतील, असा विश्‍वास असल्याचे ते म्हणाले. चीनचे भारतातील राजदूत झू फीहोंग यांनीही मोदी आणि ‘एनडीए’चे अभिनंदन केले.

‘‘लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि ‘एनडीए’चे अभिनंदन. दोन्ही देश, प्रदेश आणि जगाचे हितसंबंध आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चीन व भारताच्या मजबूत आणि स्थिर संबंधांसाठी संयुक्त प्रयत्नास करण्यास उत्सुक आहोत,’’ असे फिहोंग म्हणाले.

मेलोनी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, निवडणूक विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि चांगल्या कामासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. इटली आणि भारत यांना जोडणारी मैत्री मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम करीत राहू. आपल्या देशांच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी आपल्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर सहकार्य दृढ करू.

विक्रमसिंघे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारचे अभिनंदन करीत मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकास आणि समृद्धीवर भारतीय नागरिकांनी विश्‍वास दाखविला आहे. जवळचा शेजारी म्हणून श्रीलंका भारताबरोबरची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे, अशी अपेक्षा ‘एक्स’वर व्यक्त केली आहे.

प्रचंड यांनी मोदी यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या निवडणूक यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीतील भाजप आणि ‘एनडीए’च्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. भारतातील लोकांच्या उत्साही सहभागाने जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव यशस्वीपणे झाल्याचा आनंद आम्हाला होत आहे.

५० देशांच्या प्रमुखांनी दिल्या शुभेच्छा

जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, इराण, सेशेल्स, म्यानमार, सिंगापूर, नायजेरिया, केनिया, कोमोरोस, जमैका, बार्बाडोस, गयाना, मलेशिया, लॅटविया, लिथुआनिया असा ५० देशांच्या प्रमुखांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या वेळी ऐतिहासिक विजयी कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली सर्वांत मोठी लोकशाही उल्लेखनीय प्रगती करत राहील. मॉरिशस-भारत संबंध चिरंतन राहो.

-प्रवींद जुगनाथ, पंतप्रधान, मॉरिशस

जगातील सर्वांत मोठ्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक यश मिळाल्याने माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. एका उंचीवर पोहोचलेल्या भारताचे नेतृत्व त्यांच्या हाती कायम राहिले. मी त्यांच्यासह काम करण्यास उत्सुक आहे.

-तेरसिंग टोबगे, पंतप्रधान, भूतान

सलग तिसऱ्यांदा यश मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदी व ‘एनडीए’चे अभिनंदन. दोन्ही देशांची समृद्धी व स्थैर्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपले सामाईक हितसंबंध जपण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.

-डॉ. महंमद मोईझ्झू,अध्यक्ष, मालदिव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.