Himachal Pradesh : राज्य लहान, वलयांकित उमेदवारांमुळे प्रचारात जान!

निसर्गरम्य हिमाचल प्रदेश या छोट्याशा राज्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजे एक जून रोजी लोकसभेसाठीच्या चार जागांसाठी मतदान होत आहे.
Narendra Modi
Narendra Modisakal
Updated on

निसर्गरम्य हिमाचल प्रदेश या छोट्याशा राज्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजे एक जून रोजी लोकसभेसाठीच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध राज्यातील मंत्री विक्रमादित्यसिंह तसेच कॉँग्रेसचे नेते आनंद शर्मा, केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर आदींच्या उमेदवारींने या राज्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

देशात लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता संपत आला आहे. येत्या एक जून रोजी शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील ५७ मतदारसंघासाठीचे मतदान होईल. म्हणजेच आतापर्यंत देशातील एकूण ४८६ मतदारसंघांचे मतदान पार पडले आहे. उर्वरित ५७ मतदारसंघात हिमाचल प्रदेशातील चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

या टप्प्यासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर इंडिया आघाडीकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या प्रचाराचा धुरळा आजपासून पाच दिवस हिमाचल प्रदेशात उडणार आहे.

हिमाचलात एकूण चार लोकसभा मतदारसंघ. राजधानी सिमला, मंडी, हमीरपूर आणि कांगडा. मंडीत भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावत व काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्यसिंह, हमीरपूरमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर व काँग्रेसचे सतपालसिंह रायजादा, कांगडात भाजपचे डॉ. राजीव भारद्वाज व काँग्रेसचे नेते आनंद शर्मा तर सिमल्यात भाजपकडून सुरेशकुमार कश्यप व काँग्रेसचे विनोद सुलतानपुरी यांच्यात काट्याची लढत होत आहे.

हिमाचल प्रदेशात लोकसभेनंतर दोन वर्षांपूर्वी (२०२२) झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा विजय झाला आणि मुख्यमंत्री सुखविदरसिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. उत्तर भारतात कॉँग्रेसची पीछेहाट होत असताना भाजपचा प्रभाव असलेले राज्य हातात आल्याने कॉँग्रेससाठी ही आनंदाची बाब होती.

मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या राज्यातून एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव होऊन भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले होते. कॉँग्रेसची सहा मते फुटल्याने हा पराभव झाला होता.

पुढे या सहाही आमदारांना अपात्र घोषित करण्यात आल्याने या सहा जागी लोकसभेबरोबरच विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. राज्यसभेतील मानहानीकारक पराभवानंतर मुख्यमंत्री सुक्खू यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दर्शवून निवडणुकांना सामोरे जायचे ठरवले.

आपल्या वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कंगना राणावत यांनीही आपल्या बेधडक वक्तव्ये व शैलीने निवडणुकीत रंग भरले. कंगनांच्या तिखट आरोपांनी घायाळ झालेल्या कॉँग्रेसने त्यांची तक्रार आयोगाकडे तर केलीच मात्र विक्रमादित्य यांनी वकिलामार्फतही बदनामीची नोटीसही धाडली.

जराशीही उसंत न घेता अविरतपणे प्रचारसभा घेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कालच हिमाचलचा दौरा केला आणि सोशल मिडियावर या राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दलचे प्रेमही व्यक्त केले. नाहनच्या सभेत कंगनांच्या उमेदवारीचे कौतुक करत समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्धार केला.

तसेच हिमाचलसारख्या राज्यात प्रबळ सरकार व प्रबळ लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची गरजही व्यक्त केली. गृहमंत्री अमित शहा यांनीही आज दोन ठिकाणी प्रचारसभा घेत ‘डंके की चोट पे कहता हूँ ‘पीओके’ भारत का है’, असे सांगत युवा मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसही लावणार जोर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी २६ मे रोजी उना व नाहन येथे प्रचार सभा घेणार आहेत. तर प्रियांका गांधी २९ व ३० मेदरम्यान तीन ठिकाणी प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल, राजीव शुक्ला, राजबब्बर, प्रतिभासिंह, सचिन पायलट, भुपेश बघेल आदी स्टार प्रचारकही या टप्प्यात प्रचाराला येणार आहेत.

तर मुख्यमंत्री सुक्खू यांनीही व त्यांच्या मंत्रिमंडळाने तर लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची कमान आधीपासूनच सांभाळली आहे. लोकसभेत भाजपला सलग तीन ते चार निवडणुकीत सातत्याने यश मिळत आहे. त्यामुळे लोकसभेसाठी खरी परीक्षा काँग्रेसचीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.