Loksabha Election Result : मोदींच्या २० सभांनंतरही राज्यात अपेक्षित यश नाही

लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०६ सभा घेऊन झंझावाती प्रचार करूनही भाजपला तिसऱ्यांदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही.
PM Narendra Modi
PM Narendra Modieskal
Updated on

दिल्ली - लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०६ सभा घेऊन झंझावाती प्रचार करूनही भाजपला तिसऱ्यांदा स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तुलनेने प्रमुख विरोधी पक्षातर्फे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या प्रचारसभांची संख्या मोदींच्या निम्मी असली तरी ‘इंडिया’ आघाडीने मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या २० हून अधिक सभा झाल्या असल्या तरी राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आणणारा पक्ष काँग्रेस बनला आहे.

पंतप्रधान मोदींच्या २०६ सभांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले होते. या व्यतिरिक्त प्रसारमाध्यमांना दिलेल्या ८० मुलाखतींच्या द्वारे देखील पंतप्रधान मोदींनी जनसंपर्क साधला होता.

उत्तर प्रदेशातील मेरठमधून भाजपच्या औपचारिक प्रचाराला सुरवात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी १५ ते १७ मार्च या कालावधीत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगाण, आंध्र प्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या. तर, एकट्या महाराष्ट्रात मोदींच्या २० हून अधिक सभा भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी झाल्या होत्या.

त्यामध्ये कोल्हापूर, रामटेक, परभणी, धाराशीव, कल्याण, अहमदनगर, दिंडोरी, चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणी, सोलापूर, सातारा, पुणे, लातूर या मतदार संघांमधील सभांचा समावेश होता. मात्र महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना २०१९ च्या यशाच्या तुलनेत यावेळी अपेक्षित यश मिळवता आले नाही.

महाराष्ट्रात मोदींच्या प्रचार मोहिमेस चंद्रपूरमधून सुरवात झाली होती. परंतु या मतदार संघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. येथे भाजपचे उमेदवार व राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले. तर नंदुरबारमध्ये आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी प्रचार केला होता. येथेही भाजपच्या हिना गावित यांना पराभव पत्करावा लागला. याखेरीज कोल्हापूरमध्ये पंतप्रधान मोदींनी शिवसेना (शिंदे) उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी देखील प्रचारसभा घेतली होती. कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे निवडून आले.

राहुल, प्रियांकांचा जनसंवाद

दुसरीकडे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा, रोडशो, पत्रकार परिषद या माध्यमातून १०८ वेळा जनसंवाद साधला. राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने प्रमुख मतदारसंघांना स्पर्श केला होता. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिल्लीत इंडिया आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेसोबतच केरळ, मध्यप्रदेश, तेलंगण, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश यासह अन्य राज्यांमध्ये प्रचार केला होता. प्रियांका गांधींनी १०७ वेळा जनसंवाद साधला. तर, प्रियांका गांधींच्या मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात सभा झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com