मतभेद विसरून विरोधकांनी एकत्र यावे; शरद पवार

शरद पवारांचे आवाहन; ‘आप’च्या कोंडीबद्दल काँग्रेसला कानपिचक्या
loksabha election bjp Opponents come together Sharad Pawar aap cbi ed politics
loksabha election bjp Opponents come together Sharad Pawar aap cbi ed politics esakal
Updated on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. या एकजुटीसाठी भाजपेतर राजकीय पक्षांशी बातचीत करण्याचे सूतोवाच पवार यांनी आज दिल्लीत केले. मात्र, यासाठी विरोधकांनी आपसांतील मतभेद विसरावे आणि एकत्र येऊन लढण्याची तयारी करावी, असे खडे बोलही सुनावले. दिल्लीतील सीबीआय कारवाईवरून ‘आप’ची कोंडी करू पाहणाऱ्या काँग्रेसला यानिमित्ताने पवार यांनी कानपिचक्या दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी सिराज मेहंदी यांच्या नियुक्तीनंतर या विभागाची कार्यकारिणी बैठक पक्ष कार्यालयात झाली. या बैठकीत बोलताना पवार यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून प्रहार केला. ‘‘भाजपकडे खरे बहुमत नसून केरळ, तमिळनाडू, तेलंगण, आंध्रप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही.

तर कर्नाटक, मध्यप्रदेशात काँग्रेसचे तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार फोडून भाजपने सत्ता मिळवली. भाजपची सत्ता केवळ गुजरात आणि उत्तर प्रदेशात आली. देशातील ७० ते ७५ टक्के भूभागामध्ये भाजपची सत्ता नाही. केवळ तोडफोड करून या पक्षाने सत्ता मिळवली आहे. याला जनतेचा पाठिंबा नाही,’’ असा दावाही पवार यांनी केला.

विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्नांचे सूतोवाच करताना पवार म्हणाले, की भाजपेतर राजकीय पक्षांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, त्यांनी आपसांतील मतभेद विसरायला हवेत आणि एकत्र येऊन लढण्याची तयारी केली पाहिजे. दिल्लीत आप विरोधातील सीबीआय कारवाईच्या पाठिंब्यावरून पवार यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या. पवार म्हणाले, ‘‘दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांविषयी षडयंत्र होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. कोणाच्या चुकीच्या वर्तनाला माझा पाठिंबा नाही. पण लोकांचा पाठिंबा असलेल्यांना, पक्षांना नमविण्यासाठी केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर आज दिल्लीमध्ये सुरू आहे. अशा काळात आपला खरा संघर्ष कोणाशी आहे हे लक्षात घेण्याचे काँग्रेसचे कर्तव्य होते. आपला वाद केजरीवाल यांच्याशी असू शकतो. परंतु खरी लढाई भाजपशी आहे. जातीयवादी शक्तींशी आहे. या लढतीत जातीयवादी शक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असे वर्तन करू नये ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.’’

लज्जास्पद निर्णय

पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून महिला सन्मानाबद्दल भाषण केले. मात्र, बिल्कीस बानो प्रकरणात अत्याचार करणाऱ्या दोषींना गुजरात सरकारने सोडून दिले, या निर्णयाची लाज वाटते. एका महिलेच्या सन्मानाबद्दल असा निर्णय होत असेल तर यातून कोणता संदेश जातो अशी खंत पवार यांनी बोलून दाखविली. सोबतच, हा निर्णय सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा मुक्तहस्ते गैरवापर केला जात असल्याचा आरोप करताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांची उदाहरणेही दिली. तुरुंगामध्ये संजय राऊत यांना कोरोना काळात उपचारावर किती खर्च झाला एवढीच विचारणा सुरू असल्याचेही पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत देताना पवार यांनी आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या सत्तांतराचा दाखला दिला. त्यावेळी फारसे परिचित नसलेले लोक भरघोस मतांनी विजयी झाले होते. राजकीय नेत्यांच्या तुलनेत जनतेला अधिक अक्कल असते आणि जनता धडा शिकवते. सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ २०२४ मध्ये येईल असा विश्वासही पवार यांनी बोलून दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()