भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला; ‘शेठजी भटजीं’चा पक्ष हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा घेत ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असला, तरी पुन्हा एकदा सोशल इंजिनीरिंग करत चाळीस वर्षांपूर्वीचा ‘माधव’ फॉर्मुला राबविण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान करण्यात येत आहे.
Madhav formula of forty years ago by doing social engineering during Lok Sabha elections
Madhav formula of forty years ago by doing social engineering during Lok Sabha electionsSakal
Updated on

- पांडुरंग म्हस्के

Mumbai News : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात सुरू झालेले मराठा आंदोलन आणि त्यामुळे भाजपपासून मराठा समाज दुरावला असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. मात्र असे असले तरी मराठा समाजाच्या तुलनेत बहुसंख्य असलेला ओबीसी समाज सोबत राहावा, यासाठी भाजपतर्फे प्रयत्न सुरु केले गेले.

मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा घेत ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असला, तरी पुन्हा एकदा सोशल इंजिनीरिंग करत चाळीस वर्षांपूर्वीचा ‘माधव’ फॉर्मुला राबविण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान करण्यात येत आहे. भाजपने १९८० च्या दशकात हा फॉर्म्युला वापरून ओबीसी समाज आपल्याकडे आकृष्ट करीत आपल्यावरील शेटजी भटजींचा पक्ष हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला होता.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत महायुतीसमोर महाविकास आघाडीने तगडे आव्हान उभे केले आहे.

त्यामुळे ४०० पारचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर राज्यातील बहुसंख्य असलेला ओबीसी समाज सोबत असणे ही भाजपसाठी आवश्यक आहे. ‘माधव’ म्हणजे, माळी, धनगर आणि वंजारी. ओबीसी समुदायातील या प्रबळ जाती आहेत.

संख्येने जास्त असलेल्या या जाती सर्वच मतदार संघांत आहेत. त्यातच आर्थिकदृष्ट्या सधन असलेला हा समाज राजकारणातही सक्रिय आहे. या जातींना आपल्याकडे वळते करून राज्यात सत्ता आणण्याची अशी भाजपची खेळी आहे. अहमदनगरचे नाव बदलून आहिल्यानगर करणे हा त्याच खेळीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. राज्यातील जवळपास शंभर विधानसभा मतदारसंघांत आणि सुमारे १५-१६ लोकसभा मतदार संघांवर या समाजाचा प्रभाव आहे.

त्यामुळे या समाजाच्या मतांवरच या मतदार संघातील गणित ठरू शकते. याच ‘माधव’ फॉर्मुल्याचा भाग म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कोट्यातून परभणीतून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने जानकर यांना माढा लोकसभेतून उमेदवारी देण्याची तयारी दाखवताच महायुतीने त्यांना परभणीतून उमेदवारी दिली.

गेले अनेक दिवस विजनवासात गेलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. बीड मतदार संघात वंजारी समाज बहुसंख्य असल्याने, या समाजाची मते येथे निर्णायक ठरू शकतात.

त्याचबरोबर परभणीतील गंगाखेड व पूर्णा, लातुरातील अहमदपूर व उदगीर, नाशिक जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी व इतर काही भागात वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.

पंकजा मुंडे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला उमेदवारी देऊन पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयोग हा वंजारी समाज महायुतीकडे खेचण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे बोलले जाते. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीचा फायदा बीड व्यतिरिक्त अन्य मतदार संघातही होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधून माळी समाजाचा उमेदवार दिल्यास ‘माधव३ फॉर्म्युला परिपूर्ण सक्रिय होईल आणि त्याचा फायदा अन्य मतदार संघांमध्ये करून घेता येणार आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र सदनासंदर्भातील प्रकरण नव्याने ऐरणीवर आल्यामुळे त्यात काही बदल होतो का पाहावे लागेल, परंतु भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आग्रही आहे.

भाजपने ऐंशीच्या दशकात ‘माधव’ फॉर्म्युला स्वीकारला होता. २०१४ मध्ये धनगर, माळी आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले होते. निवडणुकीत भाजपला त्याचा फायदाही झाला.

त्यातच भाजपने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन देऊन या समाजाला खेचण्यात यश मिळवले होते. त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे सातत्याने भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे. रासप नेते महादेव जानकर यांना २०१४ मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देऊन या समाजाची चांगलीच सहानुभूती मिळवली होती.

पुन्हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग

भाजपने माळी, धनगर आणि वंजारी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला, तरी मधल्या काळात भाजपमध्ये मराठा नेत्यांनी प्रवेश केला. त्यामुळे पक्षाचा चेहरा मराठा होतोय की काय, अशी शंका भाजपच्या नेतृत्वाला येऊ लागली. त्यामुळेच महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘माधव’ फॉर्म्युला राबविण्याचा प्रयत्न असल्याचे जाणवते.

भाजपची प्रतिमा बदलण्यासाठी भाजपचे नेते दिवंगत वसंतराव भागवत यांनी चांगलेच प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, अण्णा डांगे, ना. स. फरांदे, महादेव शिवणकर यांच्यासारख्या नेत्यांच्या मदतीने त्यांनी सोशल इंजिनीरिंगचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आज भाजपला मिळालेला जनाधार ही त्याचीच फलनिष्पत्ती असल्याचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.