नाशिक : बलात्कार ही मानसिक विकृती आहे. बलात्कारामुळे अनेक शारिरिक व मानसिक आघात होतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावला जातो. आजही आपल्याकडे लैगिंक शिक्षणाबाबत खुल्या मनाने चर्चा होत नाही. लैंगिक भावनांचा विचार केला जात नाही. असे का होते? ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मुळात पुरुषांना बलात्कार करावासा का वाटतो? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. याच प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी मधुमिता पांडे ही तरुणी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये गेली. बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या पुरुषांशी बोलायचं आणि त्यांना बलात्कार का करावासा वाटला, हे जाणून घ्यायचं.
बलात्कारी नेमका काय विचार करतो?
'निर्भया' प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्या 100 पेक्षा अधिक बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. हा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा, गैरसमज मोडणारा होता. मधुमिताचा प्रबंध आणि त्यात तिला आलेले अनुभव यांचा विचार नक्की केला पाहिजे. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी ही संशोधन मुलाखत सुरू केली होती. ज्याला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. जवळपास 100 पेक्षा अधिक बलात्कारींची मुलाखत घेणारी मधुमिता पांडे म्हणाली की रेपिस्ट अर्थात नराधम बलात्कारी जो असतो तो नेमका काय विचार करतो? त्याच्या डोक्यात काय सुरू असते. याचे संशोधन मधुमिताने केले आहे. आणि आपले अनुभव शेअर केले आहेत.
निर्भया प्रकरणाने अख्ख्या देशाची झोप उडाली
२०१२ च्या डिसेंबरमध्ये रात्री आपल्या मित्रासोबत सिनेमा बघून घरी परत येत असताना एका तरुणीला चार मुलांनी घेरलं. तिच्या मित्राला बेदम मार दिला. त्या तरुणीला बसमधे नेऊन चौघांनी तिच्यावर हवा तसा अत्याचार केला. दिल्लीतल्या या निर्भया बलात्कार प्रकरणानं सगळ्या देशाची झोप उडवली. याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. निर्भया केस झाली त्या डिसेंबरमध्ये मधुमिता इंग्लडमधल्या एका युनिवर्सिटीत मास्टर्स डिग्री करत होती.
'या मुलांना का असं करावसं वाटलं?'
मास्टर्स झाल्यावर आपल्या पीएचडीसाठी हाच विषय निवडायचा असं मधुमितानं ठरवलं. वॉशिंटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत मधुमिता म्हणते, ‘नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळं पुरुष असं बनतात? त्यांना असं बनवायला कोण कारणीभूत ठरतं? हे मला शोधून काढायचं होतं.' त्यासाठी युकेमधल्या रस्किन युनिवर्सिटीच्या क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंटमधून तिनं संशोधन सुरू केलं.
२२ व्या वर्षी मधुमितानं पहिल्यांदा जेलमधे पाऊल ठेवलं आणि.....
बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या, जेलमधे शिक्षा भोगणाऱ्या पुरुषांशी मधुमिताला संवाद साधायचा होता. त्यासाठी तिनं दिल्लीतल्याच तिहार जेलची निवड केली. वयाच्या २२ व्या वर्षी मधुमितानं पहिल्यांदा जेलमधे पाऊल ठेवलं. एका बलात्काऱ्याशी बोलण्यासाठी, त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ती अनेक आठवडे घालवत असे. जवळपास 150 पुरुषांशी तिने संवाद साधला. त्यांचं म्हणणं मनापासून ऐकून घेतलं.
शंभर पैकी फक्त तिघांनाच पश्चाताप - मधुमिता
मधुमिता सांगते, संपूर्ण शंभर आरोपींपैकी फक्त तीन ते चार आरोपींना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण बाकींच्याना तो झाला नाही. त्याचं कारण काय? मधुमिताच्या मते याचं एकच कारण असू शकतं आणि ते म्हणजे भारतात लैंगिकतेविषयी मोकळा संवाद नसणं. सेक्स, लैंगिकता याकडे बघण्याचा भारतातला दृष्टिकोन अतिशय मागासलेला आहे. शाळेत, कॉलेजमधे लैंगिक शिक्षण देणं म्हणजे पाप आहे. इथल्या परंपरा आणि संस्कृतींना हे शोभत नाही, असं म्हटलं जातं. 'पालक आपल्या मुलांशी बोलताना लिंग, योनी, बलात्कार किंवा सेक्स असे शब्द उच्चारत नाहीत. जर हे विषय एवढे गुप्त ठेवले तर त्याबद्दल मुलांना त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या कशा?' असा सवाल मधुमिता विचारते.
जेलमधून सुटल्यावर मी तिच्याशी लग्न करेन, मधुमिताने सांगितला किस्सा
मुलाखतीत मधुमितानं सांगितलेला एक किस्सा फारच इंटरेस्टींग आहे. जेलमधे एका ४९ वर्षांच्या पुरुषाशी मधुमिता संवाद साधत होती. एका ५ वर्षांच्या मुलीनं 'उत्तेजित' केलं म्हणून त्यानं तिच्यावर बलात्कार केला. आता त्याची शिक्षा तो भोगतोय. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला होता. ‘मी तिचं आयुष्य बर्बाद केलं. मला वाईट वाटतं. आता ती वर्जिन राहिलेली नाही. त्यामुळे कुणी तिच्याशी लग्न करणार नाही. मी जेलमधून सुटलो की मी तिचा स्वीकार करेन. मी तिच्याशी लग्न करेन.’ असं हा माणूस म्हणत होता. आपण नेमके का चुकलोय, हेही त्या आरोपीला कळत नव्हतं. हा प्रसंग वाचल्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना जेलमधे टाकून काय साध्य होतं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
पुरुषत्वाच्या भंपक संकल्पना मनात
या आरोपींबद्दल बोलताना अनेक धक्कादायक गोष्टी मधुमिताला उलगडल्या. त्यातले अनेक पुरुष तिला आपल्या वागण्याची कारणं देत होते. आपण कसं बरोबर होतो हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. तिची कशी सहमती होती, तिने कसे इशारे दिले हेच त्यांना सांगायचं होतं. काहींचं तर आम्ही बलात्कार केलाच नाही, असं म्हणणं होतं. मधुमिता त्या मुलीच्या घरी गेली तेव्हा त्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा झालीय हेही त्या कुटुंबाला माहीत नव्हतं.
बलात्कार ही मानसिक विकृती आहे. बलात्कारामुळे अनेक शारिरिक व मानसिक आघात होतात. त्यामुळे आत्मविश्वास गमावला जातो. आजही आपल्याकडे लैगिंक शिक्षणाबाबत खुल्या मनाने चर्चा होत नाही. लैंगिक भावनांचा विचार केला जात नाही. हे होणे आता काळाची गरज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.