भोपाळ - मध्य प्रदेशमधील टिकमगड येथे प्रवासी बसचा मोठा अपघात झाला आहे. दिल्लीहून स्थलांतरित मजूरांना घेऊन जात असलेली एक बस टिकमगड येथे उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली असे सांगण्यात येते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत एक आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगार, मजुरांनी आपापल्या गावी जाण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी सर्व कामगार, मजूरांना हा केवळ एक आठवड्यासाठी लॉकडाऊन असून कोणीही गावी परत जाऊ नका असे आवाहन केले होते. तरीही हजारो लोकांनी पुन्हा गेल्यावर्षीसारखीच गर्दी बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर केली आहे. त्यातच आपल्या घरी निघालेल्या या मजुरांवर काळाने घाला घातला.
ग्वाल्हेर-झांसी महामार्गावर झाला अपघात
ही बस ग्वाल्हेरवरुन टिकमगडकडे जात होती. हा अपघात ग्वाल्हेर-झांसी दरम्यान डबरा मार्गावर झाला. घटनास्थळी प्रशासनाच्या वतीने त्वरीत मदतकार्य सुरु करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस उलटल्यानंतर मिळेल तेथून बसमधून बाहेर पडत असल्याचे दिसत होते. कोणी बसच्या खिडकीतून तर कोणी बसच्या काचा फोडून स्वतःसाठी मार्ग काढत होता. बसमध्ये महिला आणि लहान मुलांचाही मोठ्याप्रमाणात समावेश होता.
हे सर्व मजूर आपल्या घरी जाण्यासाठी दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल येथून निघाले होते. मागील लॉकडाऊनमध्ये आम्ही येथे अडकलो होतो. त्यामुळे आत्ता आम्ही आमच्या घरी जात आहोत. गेल्यावेळेस आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता, असे एका प्रवाशाने सांगितले.
केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र
दरम्यान, दिल्लीमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोठ्यासंख्येने प्रवासी कामगार आपल्या गावी परतत आहेत. या कामगारांवरुन उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थ सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल यांनी मोठ्या घाई-गडबडीत लॉकडाऊन लावला आहे. त्यामुळे लोक घाबरले आहेत. सोमवारी रात्री गाझियाबाद, नोएडा सीमेवर लॉकडाऊनचा प्रभाव आपण पाहिला आहे. दिल्लीतील बसेसनी लोकांना सीमेवर सोडले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरीत या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी काम सुरु केले आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊननंतर घरी परतणाऱ्या मजुरांचे मोठे हाल झाले होते. लाखो मजूर आपल्या गावी शेकडो किमी चालत घरी गेले होते. अनेकजण रस्त्यातच दगावले होते. त्यावेळी मोदी सरकारवर मोठ्याप्रमाणात टीकाही झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.