नवी दिल्ली - काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नेत्यांमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर सुरू झालेले वादळ दिल्लीत येऊन शांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसची छाननी समितीची बैठक आज दिल्लीत झाल्यानंतर रात्री केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यात ९६ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले असून त्यांची नावे आज (ता. २२) दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मतभेद असलेल्या मतदारसंघांची नावे मात्र जाहीर केली जाणार नसल्याचे स्पष्ट आहे.