दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

आज (बुधवार) नागपूर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.
Breaking News
Breaking News Sakal
Updated on

मणिपूरचे मुख्यमंत्री घेतली जखमी विद्यार्थ्यांची भेट 

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी इम्फाळ येथील रुग्णालयात नोनी येथील स्कूल बस अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. मणिपूरमधील नोनी जिल्ह्यातील ओल्ड कछर रोडवर आज झालेल्या स्कूल बसच्या अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले.

अनिल देशमुखांच्या जामिनावरील स्थगिती सहा दिवसांनी वाढवली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती वाढवली आहे. सीबीआयने न्यायालयात स्थगिती वाढविण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती न्यायालयाने ६ दिवसांनी वाढवून दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम २७ डिसेंबरपर्यंत वाढला आहे.

सोलापुरात 'नवरदेवांचा' अनोखा मोर्चा

सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे, त्यामुळं सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी (Marriage) मुलीच मिळत नाहीयेत. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक तरुणांनी नवरदेवाचा पेहराव करत डोक्याला बाशिंग बांधून आणि अंगात सलवार घालत मोर्चात सहभाग घेतला होता. नवरदेवाची वेशभूषा परिधान करुन तरुणांनी घोड्यावर स्वार होत अनोखं आंदोलन केलं.

भारत जोडो यात्रेला पाठविलेल्या पत्रावर काँग्रेसचं प्रत्युत्तर

सोलापूर : भारत जोडो यात्रेला मिळणारं यश बघून भाजपच्या पायाखालची जमीन सरकलीये. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक थांबवण्याऐवजी भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी पत्र पाठवलंय. चीनसारख्या देशात कोरोना वाढत असल्याचं दिसतंय, तर सर्वात आधी आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर निर्बंध आणा, असं काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटलंय.

स्वाभिमानीसह उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

राहुरी - अतिवृष्टीमुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज मुळा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

कायद्यानुसार आपल्याला अनुदानित शाळा देता येणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Winter Session : राज्यातील अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या आणि दुसर्‍या हप्त्याची थकबाकी, तसंच तिसरा हप्ता देण्यासाठी अतिरिक्त 2 हजार 135 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे. मात्र, आज हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शाळांबाबत (School) मोठं वक्तव्य केलंय. कायद्यानुसार यापुढं आपल्याला अनुदानित शाळा देता येणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. हा सरकारनं बनवलेला कायदा आहे, त्याच्यामुळं ती अडचण येणार नाही. जसं आपल्याला शिक्षणाचं हित बघायचंय, शिक्षकाचं हित बघायचं आहे. तसंच आपल्याला राज्याचंही हित बघायचं आहे. राज्यतल्या इतर घटकांना देखील सोयी पुरवायच्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

पुण्यातील जैन धर्मियांची 15 हजार दुकानं बंद

पुण्यातील जैन धर्मियांचे १५,००० दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यातील प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेला लक्ष्मी रस्त्यावर आज तुरळक गर्दी पहायला मिळत आहे. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.

पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडाबाबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक

पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी, त्यासोबतच तिथं पुन्हा मुलींची शाळा सुरू करण्यासाठी ही बैठक होणार आहे. छगन भुजबळ यांनी याबाबतचा मुद्दा काल विधानसभेत मांडला होता. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात आंदोलन देखील सुरू केलं आहे.

बारामतीत बंद करून जैन समाजाचा भव्य मोर्चा

जैन धर्मियांचं तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ शहरातील सकल जैन समाजाच्या वतीनं आज बंदचं आयोजन केलं आहे. सर्व जैन बांधव दुकानं दिवसभर बंद ठेवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत म्हणणाऱ्यांनी सरपंच-सदस्यांची यादी जाहीर करावी - संजय राऊत

Gram Panchayat Election Results : राज्यात निवडणूक लागलेल्या 7 हजार 682 ग्रामपंचायतीपैकी भाजपनं एकूण 2 हजार 23 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 हजार 215 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलंय. शिंदे गटानं ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. या निकालावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटव्दारे भाष्य केलंय. एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत, असं म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी, म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं? अशी टीका त्यांनी भाजपवर केलीये.

पुण्यात "काजू कतली" फुकट मिळावी म्हणून तरुणांचा गोळीबाराचा प्रयत्न

पुण्यात चक्क "काजू कतली" फुकट मिळावी, यासाठी तरुणांचा गोळीबारचा प्रयत्न झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या स्वीटमार्टमधील ही घटना आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणी २ तरुणांना अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. सुरज ब्रह्मदेव मुंडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशी आरोपींची नावं आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी आज ठाकरे गटाचे शिवसैनिक विशाळगडाकडे जाणार आहेत. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुदळ फावडे असं साहित्य घेऊन शिवसैनिक विशाळगडाकडं रवाना होणार आहेत.

सीमावादावर सरकारनं जशास तसं उत्तर द्यायला हवं - अजित पवार

सरकारनं सीमावादावर जशास तसं उत्तर द्यायला हवं. सीमाभागातील गावं महाराष्ट्रात कशी येतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी आपल्या सरकारनं आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उत्तर दिलं पाहिजे, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अधिवेशनावर आजही धडकणार मोर्चे

हिवाळी अधिवेशनावर आजही काही मोर्चे धडकणार आहेत. विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि समाजिक संघटनांचे मोर्चे धडकणार असून झिरो मैल इथंच मोर्चे अडवले जाणार आहेत. मोर्चांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

आज (बुधवार) नागपूर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.