इंदापूर : उजनी धरणाच्या पात्रात कळाशी ते कुगाव अशी वाहतूक करणारी एक लॉन्च आज सायंकाळीच्या वेळी नदी पात्रता उलटल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या घटनेत काहीजण बुडाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला मोटार वापरण्यास दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ‘ब्रह्मा रियल्टी’चे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून मंगळवारी (ता. २१) अटक केली. त्यांना बुधवारी (ता. २२) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे अग्रवाल यांना मंगळवारची संपूर्ण रात्र पोलिस कोठडीत घालवावी लागणार आहे.
संग्रामपूर (बुलढाणा) : खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेऊन सातबारावर नाव घेण्यासाठी व शेती खरेदीचा मोबदला म्हणून लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ता. २१)अटक केली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तलाठी पंजाबराव जाधव यांनी वाटिका चौक कौलखेड रोड शेगांव येथे तक्रारदार यांच्याकडे ८ हजार रुपयांची मागणी केली होती.
पुणे : शहरातील अनधिकृत पब, बार रात्री उशिरापर्यंत सुरु राहत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेची रुफ टॉप हॉटेलविरोधातील थंडावलेली कारवाई पुन्हा एकदा सुरु झाली आहे. आज (ता. २१) खराडी भागातील दोन रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करून शेड काढून टाकले.
मोहोळ : एका नवविवाहितेने राहत्या घराच्या पत्र्याच्या पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना सावळेश्वर (ता. मोहोळ) येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. संध्या महेश उराडे (वय 20 रा. सावळेश्वर) असे गळफास घेतलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा शहरात शनिवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास अनोळखी व्यक्तींकडून जवळपास २० ते २५ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्यानंतर शहरात वेगळ्या अर्थाने चर्चा सुरु होती. पोलिसांनी वाहनांसह काही घरांवरही दगडफेक करुन दशहत निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन सोमवारी (ता. २०) रात्री दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या.
विश्रांतवाडी : येरवडा येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
नाशिक : इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भावली धरणावर फिरण्यासाठी गेलेले असताना ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश आहे.
उल्हासनगर : घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर उल्हासनगरातील अनधिकृत होर्डिंग्ज महानगरपालिकेच्या (Ulhasnagar Municipal Corporation) रडारवर आले आहेत. 47 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 21 तारखेला विनापरवाना होर्डिंग गॅस कटरने कापून काढण्यात आले आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम, तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावासह बंद केलेत.
सांगलीतील कोकरूडमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सातारा : राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुंडी यांनी पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी ६ वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी रामबाई बैस यांचेही आगमन झाले.
धुळे : शहरापासून दक्षिणेला आठ किलोमीटरवर असलेल्या शासकीय अनुदानातील एका गोदामाला मंगळवारी (ता. २१) सकाळी अकराला भीषण आग लागली. त्यात फटाके, तसेच हल्दीरामचे प्रॉडक्ट खाक झाले. घटनेत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. आता उद्या बुधवारीही या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला घेऊन पोलिस पुण्यात दाखल
विशाल अगरवाल यांना घेऊन पुणे पोलीस पुण्यात दाखल झाले आहेत. विशाल अगरवाल यांना संभाजीनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. थोड्या वेळात अगरवाल यांना पोलीस आयुक्तालयात आणले जाणार आहे, विशाल अगरवाल हा पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील असून त्यांना पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
पुणे : सोलापूर रस्त्यावर रामटेकडीतील मुख्य चौकात सिग्नल बंद असून या चौकात एकही वाहतूक पोलीस कर्मचारी अथवा वाहतूक स्वयंसेवक उपलब्ध नाही. हडपसरहून पुण्याकडे येणारी वाहतुक अतिशय संत चालू असून, मुख्य चौकात वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिक स्वतः गाडीतून उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जर इंडिया आघाडीने निवडणूक जिंकली तर त्यांचे सर्व सहकारी बसून पंतप्रधानांच्या नावावर निर्णय घेतील अशी माहिती चंदीगड येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रमुख खर्गे यांनी दिली.
पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या आपघाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे आयुक्तांसोबत आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील ३ तास विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली यासोबतच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, बीड तर वाशिम, यवतमाळ येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लंडनहून निघालेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने मंगळवारी बँकॉकमध्ये भीषण टर्ब्युलन्समुळे आपत्कालीन लँडिंग केले, एअरलाइनने सांगितले की, विमानातील एक प्रवासी यादरम्यान मृत्यूमुखी पडला तसेच अनेक प्रवासी जखमी झाले. 211 प्रवासी आणि 18 कर्मचारी असलेले बोइंग 777-300ER विमान सिंगापूरला जात होते जेव्हा त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, एअरलाइनने एका निवेदनात याबद्दल माहिती दिली आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांना कोर्टात आणले जाणार आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पबचे मालक आणि व्यवस्थापक यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता जॅकी श्रॉफचे सिंगम अगेनसाठी काश्मीरमध्ये शुटिंग केले. यावेळी तो म्हणाला की, 'येथील लोक हे मदत करणारे आहेत.'
बारामती, ता. 25 इयत्ता बारावीचा निकाल यंदा उत्तम लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यंदा बारामती तालुक्याचा निकाल 96.32 टक्के जाहीर झाला आहे. बारामती तालुक्यात 7754 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. या पैकी 7469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून 98.39 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारामती तालुकयात 3762 मुले या परिक्षेसाठी बसलेली होती त्या पैकी 3541 उत्तीर्ण झाली असून ही टक्केवारी 94.12 इतकी आहे. तर 3992 मुलींपैकी 3928 मुली उत्तीर्ण झाल्या. ही टककेवारी 98.39 इतकी आहे. केवळ 64 मुली अनुत्तिर्ण झाल्या आहेत.
ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्ह्याचा निकाल 92.08 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
मुंबईच्या घाटकोपर येथे ४० फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढलले आहेत. अरब एअरक्राफ्टला धढकल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. पक्षांना पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
माझा कोणीही उत्तराधिकारी नाही. देशाचे नागरिकच माझे उत्तराधिकारी आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते बिहार येथील सभेत बोलत होते.
राज्यातील पाचव्या टप्यात मतादानाची टक्केवारी घटली त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली.
मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळं मतदानावर झालेला परिणाम याचाही तपास केला जाणार आहे.
पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनानं पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
पुणे पोलीस अमितेश कुमार -
- कोणाचे काही आक्षेप असतील, आरोप असतील त्यावर माझी कोणाशीही जाहीर चर्चा करण्याची तयारी आहे.
- पुण्यातील पब संर्दभात दोन दीवसात नवीन धोरण तयार करणार. त्यावर आम्ही काम करत आहोत.
- पोलीसांकडून पुण्यातील पब ला वेसन घालण्यासाठी हलचाली सुरु
पोलीस आयुक्त अमितेश कुमार -
- पबचे मालक आणि व्यवस्थापक या अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोर्टात हजर करणार.
- आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार.
- दुसऱ्या गुन्ह्यातील चौथा आरोपी जयेश बोनकर याला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यालाही उद्या कोर्टात हजर करणार.
- मृतांचे नातेवाईक आणि मित्रांना वाईट वागणूक देण्याचे, धमकावण्याचे प्रकार आमच्या कानावर आले आहेत, त्याची आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, नातोवाईकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. नातेवाईकांना वाईट वागणूक आणि आरोपींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- पबचे मालक आणि व्यवस्थापक या अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोर्टात हजर करणार
- मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार.
- दुसऱ्या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला जयेश बोनकर याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ही उद्या कोर्टात हजर करणार
- मृतांचे नातेवाईक आणि मित्रांनी वाईट वागणुक देण्याचे, त्यांना धमकावन्याचा प्रकार आमच्या कानावर आले आहेत. त्यावर आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, नातोवाईकांकडुन कोणतीही तक्रार आलेली नाही. नातेवाईकांना वाईट वागणुक आणि आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार्या पोलीस कर्मचार्यावर अधिकार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
इगो मिडिआ जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक ब्रिजवरील होर्डिंग्स हटवले.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील दोषी आहे इगो जाहिरात कंपनी
महापालिकेने रेल्वेला तीन दिवसात होर्डिंग हटवण्यासाठी दिली होती नोटीस.
त्यानंतर आता होर्डिंग हटवले मात्र होर्डीगाचा ढाचा अद्याप तसाच.
ढाचा देखील लवकर काढण्यात येईल अशी रेल्वेकडून माहिती.
रामेश्वरम् कॅफे स्फोटप्रकरणी NIA नं देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशभरात जवळपास 11 ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळं कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील अनेक होर्डिंग जमीनदोस्त झाले आहेत. कोल्हापुरातील वडणगे फाट्यानजीक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दोन ठिकाणी होर्डिंग्ज कोसळले. मुंबईनंतर आता कोल्हापुरातही होर्डिंग्ज कोसळण्याची घटना, सुदैवानं जीवितहानी नाही.
किर्गिस्थानमधल्या हिंसाचाराचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये आहेत. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती. वैद्यकीय शिक्षणासाठी 500 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातून किर्गिस्थानमध्ये आहेत. संभाजीनगर, धाराशिव आणि बीड जिल्हातीलही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय आहे. परीक्षेनंतर जूनमध्ये सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज. किर्गिस्तानमधील पाकिस्तानी युवक आणि स्थानिक युवकांमध्ये वाद झाल्यानं हिंसाचार झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमास प्रवेशास ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत संपली. मात्र, विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी आणखी २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. त्यासाठी २० एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याची मुदत सोमवारी संपल्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. त्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
नऊ विभागीय मंडळांचा निकाल
पुणे - ९४.४४
नागपूर - ९२.१२
छत्रपती संभाजीनगर - ९४.०८
मुंबई - ९१.९५
कोल्हापूर - ९४.२४
अमरावती - ९३.००
नाशिक - ९४.७१
लातूर - ९२.३६
कोकण - ९७. ५१
बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.
यावर्षी बारावीच्या परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा ९१.६०. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- राज्यात कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- तर मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के असा सर्वात कमी आहे.
154 विषयांसाठी बारावीची परीक्षा पार पडली. यामध्ये एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यी बसले होते, त्यांपैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
12 th maharashtra board result : राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के.
Hsc Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे.
HSC Result: एचएससी बोर्डाचा बारावीचा निकाल तुम्ही hscresult.mkcl.org, results.gov.in या वेबसाईट्सला भेट देऊन पाहू शकता. मागील कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी दिली.(12 th maharashtra board result)
जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कालानी यांनी तब्बल 11 वर्षानंतर कल्याण लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
ईशान्य मुंबईत सरासरी ५३.७५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मुलुंडमध्ये सर्वाधिक मतदान झाले त्याखालोखाल घाटकोपर पुर्व, घाटकोपर पश्चिम,भांडुप पश्चिम या मतदारसंघात मतदानाची नोंद करण्यात आली. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४९.३७ टक्के झाले.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.तीन मुख्य आरोपींना मध्यप्रदेशातून अटक
आषाढी एकादशीसाठी गजानन महाराजांच्या पालखीचे 13 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
निवडणुकी घेण्याची मागणी करत न्यायालयात गेलेल्या सरपंच संघटनेला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने वर्ध्यातील 301 ग्रामपंतयतींमध्ये प्रशासन नियुक्त करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे.
नागपूरमधील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकार नुकताच समोर आला असून, याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. २१) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्य मंडळाच्या ‘mahresult.nic.in’ आणि ‘http://hscresult.mkcl.org’ या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
"सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात 20 मे रोजी रात्री 11:30 वाजता 60.09% मतदान झाले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.