नवी दिल्ली : मान्सूनच्या (India Monsoon Update) आगमनाबरोबरच महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, राजस्थानसह देशातील विविध भागांत संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात 1 जूनपासून आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीत परिस्थिती भयंकर असून (Maharashtra Rain Update) गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, केरळमध्ये मुसळधार पावसामुळे सहा धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे, पूर्व राजस्थानच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (India Rain Update)
महाराष्ट्रात 1 जून ते 16 जुलै दरम्यान 104 जणांचा मृत्यू झाला असून, गेल्या 24 तासांत जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात मुंबई आणि लगतच्या भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद करण्यात आली असून, दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 12.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रूझ वेधशाळेत गेल्या 24 तासांत 23.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 20.1 मिमी पाऊस झाल्याचे हवामाना विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Maharashtra Rain News In Marathi)
केरळमध्ये रेड अलर्ट
केरळच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुल्लापेरियार आणि इडुक्कीसह राज्यातील अनेक धरणांमधील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे KSEB च्या नियंत्रणाखालील सहा धरणांमधील पाणीसाठी रेड अलर्ट स्तरावर आणि एका धरणातील पाण्याची पातळी ऑरेंज अलर्ट स्तरावर आहे.
गुजरात : अरबी समुद्रात वादळ
ओखा येथील गुजरात किनारपट्टीपासून 70 किमी अंतरावर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे ताशी 50 किमीपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत आहेत. हे वादळ ओमानकडे सरकत आहे. येत्या 48 तासांत हे वादळ अरबी समुद्र ओलांडून वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र आणि कच्छ किनार्याजवळील ईशान्य अरबी समुद्रावरील दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत 5 किमी प्रतितास वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकले आहे.
पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस
पूर्व राजस्थानच्या अनेक भागात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. अजमेरचे श्रीनगर, भद्रा आणि सुजानगड, रविवारी सकाळपर्यंत टोंकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची नोंद झाली. पुढील चार-पाच दिवसांत पूर्व राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे प्रादेशिक संचालक राधेश्याम शर्मा यांनी सांगितले आहे. तर, 19 जुलै रोजी जयपूर, भरतपूर, अजमेर आणि कोटा विभागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आसाम: पूरस्थितीत सुधारणा, ९० हजार लोक अजूनही बाधित
ईशान्येकडील आसाम राज्यातील पूरस्थितीत काहिशी सुधारणा झाली असून, अद्यपही सुमारे 90 हजार लोक पुराच्या पाण्यामुळे बाधित आहे. आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 195 जणांना जीव गमवावा लागला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार (ASDMA) बिस्वनाथ, कछार, दिमा हासाओ, मोरीगाव आणि तामुलपूर जिल्ह्यात सुमारे 90,875 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.