Mallikarjun Kharge : तब्बल 22 वर्षानंतर काँग्रेसच्या 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना 9385 पैकी 7897 मते मिळून ते निवडून आले. त्याची घोषणा आज निवडणूक प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या विरोधात उभे असलेले शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळून ते पराभूत झाले.
या निवडणुकीने काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही आहे, हे सिद्ध झाले. यापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकात राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली होती. तर 2001 मध्ये झालेल्या निवडणुकात सोनिया गांधी यांची निवड झाली झाली होती. ``काँग्रेसमध्ये गांधी घराण्याची घराणेशाही आहे,’’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या अन्य नेत्यांतर्फे दैनंदिन केला जाणारा आरोप तथ्यहीन झाली आहे. तब्बल 22 वर्षानंतर झालेल्या या निवडणुकांनी कांग्रेसमध्ये गेली अनेक वर्ष आलेली मरगळ दूर होणार, अशी आशा आता कार्यकर्ते व नेत्यांत निर्माण झाली आहे.
या उलट भारतीय जनता पक्षामध्ये मोदी व शाहा यांनी नेमलेले जगतप्रसाद नड्डा हे अध्यक्ष असून, अध्यक्षपदासाठी कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. खर्गे यांना सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा यांचा पाठिंबा होता, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच ते अनधिकृतरित्या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले. त्यांनाच यश मिळणार, यात दुमत नव्हते. खर्गे यांच्याबाबत झालेल्या घोषणेनंतर क्षणाचाही विलंब न लावता भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधी यांनी, ``काँग्रेस चीफ इज सुप्रिम एथाऑरिटी. इट इज ए विन फॉर डेमॅक्रसी,’’ अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली व ``आय विल रिपोर्ट टू द प्रेसिडेन्ट’’ असे जाहीर केले. शशी थरूर यांनी ``निवडणुकीत रिगिंग, गैरव्यवहार झाले,’’ असा आरोप केलाय. त्याची चौकशी होईलही. परंतु, निवडणूक अधिकारी मिस्त्री यांनी खुलासा केल्यामुळे वाद शमेल, अशी चिन्हे आहेत. ते म्हणाले, की कुठल्या राज्यातून किती मते मिळाली, असे न पाहता, सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यांची मोजणी करण्यात आली. ``उत्तर प्रदेशातून आलेल्या सहा पैकी चार दोन मतपेट्यावर सील नव्हते, असे थरूर यांच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.’’ तथापि,`` त्यातील चारशे मते जरी थरूर यांच्या एकूण मतात जोडली, तरी खर्गे यांना मिळालेल्या मतांच्या जवळपासही ते जाऊ शकत नाही.’’ थरूर यांनी खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. सारांश, हा वाद चिघळण्याची शक्यता कमी.
उलट, हिमाचल, कर्नाटक व गुजरात विधानसभांच्या होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला सारे मतभेद मिटवून लढावे लागेल. खर्गे व थरूर या दोघांनाही त्याची जाणीव आहे. काँग्रेसमधील असंतुष्टांचा जी-23 असा जो गट आजवर होता, त्यानेही खर्गे यांना अनुकूलता दर्शविल्याने सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी वद्रा यांच्या वर्चस्वाचे जे वातावरण गेले तीन चार वर्ष निर्माण झाले होते, ते आता बऱ्याच प्रमाणात तणावरहित होईल, असे मानले जाते.
निवडणूक होण्यापूर्वी वरील तीन नेत्यांचा पाठिंबा ज्यांना पाठिंबा होता, ते राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शक्तीप्रदर्शन करीत मुख्यमंत्रीपदी राहून अध्यक्षपदही लाटण्यासाठी जे राजकारण केले, त्याला राहुल गांधी यांनी वेळीच लगाम लावला. `एक व्यक्ती एक पद,’ हा संकेत आहे, असे सांगून त्यांनी गहलोत यांना गप्प केले. मुख्यमंत्रीपद हातून जाऊ नये, यासाठी गहलोत यांनी चिथावणी देऊन समर्थक आमदारांच्या केलेल्या बंडामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी बरेच नाराज आहेत. तथापि, गहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून काढणे पक्षाला महागात पडेल, याची जाणीव ठेऊन त्यांनी कारवाई करण्याचे टाळले आहे.
काँग्रेसमध्ये `एक व्यक्ती दोन पदे’ ही प्रथा इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीपासून सुरू झाली, ती पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव असेपर्यंत चालली. त्यावेळी सोनिया गांधी व राव यांच्याच तीव्र मतभेद झाल्याने सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निव़डणुका घेऊन त्यात खजिनदार सीताराम केसरी यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरूद्ध शरद पवार यांनी निवडणूक लढविली. केसरी हे अधिकृत उमेदवार होते. ते निवडून आले. पवार पराभूत झाले. यावेळीही त्यांनी खर्गेंना पाठिंबा दिला व ते निवडून आले. याचा अर्थ, आजही व येते काही वर्ष त्यांचे व राहुल गांधी यांचे वर्चस्व पक्षावर राहणार, यात शंका नाही. या दोन्ही नेत्यांना मात्र हे ही ध्यानात घ्यावे लागेल, की खर्गे यांच्यावर कोणताही दबाव न लादता त्यांना मुक्त हस्त दिल्यास पक्ष अधिक बळकट होईल. खर्गे यांना काँग्रेस संसदीय मंडळ, कार्यकारीणी यांची फेररचना करावी लागेल. अनेक वर्ष त्यात ठाण मांडून बसलेल्या काही नेत्यांना दूर करावे लागेल. राज्याराज्यातून काँग्रेसचे पुनरूज्जीवन करण्यासाठी प्रादेशिक संघटनांना मजबूत करण्याच्या दिशेने पावले टाकावी लागतील.
ते दलितवर्गाचे नेते आहेत. त्यांना विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, मंत्रालये संभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. कर्नाटकात मंत्रीपदी होते, ते तेव्हा त्यांनी कामगारांचे प्रश्न यशस्वीपणे हाताळले होते. त्यांना हिंदी, कन्नडा व इंग्रजी या तिन्ही भाषा अवगत आहेत. राजकारणाचा तब्बल पन्नास वर्षांचा अनुभव आहे. हे असूनही त्यांच्यात शालीनता आहे. ``सोनिया व राहुल यांच्याबरोबर सल्लामसत करण्यात काही गैर नाही,’’ असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यापुढे महत्वाचे आव्हान आहे, ते स्वतःच्या कर्नाटकात काँग्रेसला निवडून आणण्याचे. त्यासाठी ते जनता दल (यूएफ) बरोबर निवडणूक समझोता करतात काय, हे पाहावे लागेल. तसेच आपण कळसूत्री बाहुली नाही, वा रिमोट कन्ट्रोलने कामकाज करीत नाही, हे ही दाखवून द्यावे लागेल.
खर्गे व तमाम विरोधकांपुढे सर्वात मोठे आव्हान आहे, ते विरोधी अयक्याचे. काँग्रेस पक्ष केवळ दोन राज्यात असला, तरी तो सर्व देशात पसरलेला प्रमुख विरोधी पक्ष आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे, प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन चालण्याची प्रकिया त्यांना करावी लागणार. आम आदमी, तृणमूल कांग्रेस, समाजवादी पक्ष, आदी पक्ष कांग्रेसच्या विरोधात आहेत. विरोधकांत फाटाफूट झाली, तर भाजपचे आयतेच फावणार आहे. ते होऊ नये, म्हणून आगामी विधानसभा व 2024 मध्ये येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला एकास एक असा उमेदवार कांग्रेस व अऩ्य विरोधक देऊ शकतील काय, हा प्रश्न अनुत्तरीत असून, त्या दिशेने खर्गे कोणती शिष्टाई करतात, यावर देशाचे लक्ष लागलेले असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.