Karnataka HC: कर्नाटक उच्च न्यायालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर एका व्यक्तीने गळा कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. म्हैसूर येथील एका ५१ वर्षीय व्यक्तीने कोर्टात चाकूने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात अचानक गोंधळ उडाला. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास न्यायालय क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती एचबी प्रभाकर शास्त्री यांच्या खंडपीठासमोर संबधित प्रकरणाची सुनावणी सुरू होती.
म्हैसूरमधील विजयनगरातील एस चिन्नम श्रीनिवास या व्यक्तीला आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बॉरिंग हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास नावाचा व्यक्ती कोर्ट रूममध्ये गेला आणि त्याने काही फाईल्स कोर्टाच्या अधिकाऱ्याला दिल्या. त्याने खंडपीठात काही शब्द बोलले आणि अधिकाऱ्यांनी त्याला कामकाजात अडथळा आणण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने चाकू काढला आणि स्वतःचाच गळा चिरला. या घटनेने हादरलेल्या खंडपीठाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या कक्षाबाहेर कर्तव्यावर उपस्थित असलेल्या पोलिसांना माहिती देण्यास सांगितले.
श्रीनिवासच्या प्रकृतीचे कारण देत डॉक्टरांनी पोलिसांना त्याचा जबाब घेण्यापासून रोखले. त्या व्यक्तीची पत्नी उमा देवी हिने पोलिसांना सांगितले की, तिचा पती एवढं कठोर पाऊल उचलेल याची तिला अपेक्षा नव्हती.
2021 मध्ये म्हैसूर येथे हैदराबादस्थित बांधकाम कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला न्यायालयाने फेटाळून लावला तेव्हा श्रीनिवास नाराज झाला आणि त्याच्या व्यवस्थापनाने 93 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. जुलै 2023 मध्ये एफआयआर रद्द केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलीस सूत्राने सांगितले की, 2021 च्या एफआयआरनुसार, बिल्डर्सनी श्रीनिवाससोबत करार केला होता. त्यांनी त्याला हैदराबादमध्ये बांधल्या जाणाऱ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भागभांडवल देण्याचे आश्वासन दिले होते. श्रीनिवासने दावा केला की, कंपनीने आपले वचन पूर्ण केले नाही त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. न्यायालयाने एफआयआर रद्द करून ही दिवाणी बाब असल्याचे सांगितले आणि तक्रारदाराला हे प्रकरण सोडवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.