मणिपूर गेल्या जवळपास ८३ दिवसांपासून हिंसेच्या आगीमध्ये होरपळत आहे. इथल्या बिगर आदिवासी म्हणजे मैतेई आणि आदिवासी कुकी आणि नागा या समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे. मैतेई हा मणिपूरमधला सर्वात मोठा आणि प्रमुख जातीय समाज आहे. मणिपूरमध्ये ५३ टक्क्यांहून अधिक लोक हे मैतेई समुदायातले आहेत.
यामधले बहुतांश लोक इम्फाळच्या भागामध्ये राहतात तर ४० टक्के आदिवासी लोकसंख्येमध्ये कुकी आणि नागा समुदायाचा समावेश आहे. हे समुदाय प्रामुख्याने डोंगराळ भागामध्ये राहतात. फक्त मणिपूरच नव्हे तर पूर्वोत्तर भागातल्या आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय आणि मिझोरममध्येही मैतेई समुदायाचे लोक राहतात. या शिवाय म्यानमार आणि बांग्लादेशातही हा समुदाय दिसून येतो.
मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या केंद्रस्थानी हा मैतेई समुदाय आहे. मैतेई समाजाचा प्रदीर्घ काळापासून अनुसुचित जाती म्हणजे एसटी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा अशी त्यांची मागणी आहे. मणिपूर उच्च न्यायालयाने २० एप्रिलला या प्रकरणी एक आदेश दिला होता. या आदेशात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समाजालाही अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करून घेण्याविषयीच्या मागणीबद्दल विचार करण्यास सांगितलं होतं.
कोर्टाच्या याच निर्णयाच्या विरोधात ३ मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूरने आदिवासी एकता मार्च काढला होता. हा मोर्चा मैतेई समाजाला अनुसुचित जातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात काढण्यात आला होता. याच मोर्चाच्या दरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजातल्या लोकांमध्ये वाद झाले आणि त्याचे पर्यावसान पुढे हिंसेमध्ये झालं.
गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.३ मे च्या संध्याकाळपर्यंत परिस्थिती इतकी बिघडली की राज्य सरकारने केंद्राकडून मदत मागितली. त्यानंतर सेना आणि पॅरा मिलिटरी दलाच्या तुकड्या तिथे तैनात करण्यात आल्या.
राजकारणाशी कसा आहे संबंध?
मणिपूरमध्ये मैतेई हा एक मोठा समाज मानला जातो. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही मैतेई समाज बळकट आहे. राज्यातल्या एकूण ६० आमदारांपैकी ४० आमदार याच समाजातले आहेत. एवढंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हेसुद्धा याच समाजातले आहे. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पण ते अजूनही मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी आहेत.
मैतेई समाज का मागत आहे अनुसुचित जातीचा दर्जा?
मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या ५३ टक्क्यांहून अधिक आहे. हा एक खुल्या प्रवर्गात येणारा समुदाय आहे, ज्यातले बहुतांश हिंदू आहेत. तर कुकी आणि नागा समाजाची लोकसंख्या ४० टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यामध्ये इतकं जास्त प्रमाण असूनही ते केवळ दरीखोऱ्याच्या प्रदेशातच राहू शकतात. मणिपूरचा ९० टक्क्यांहून अधिक भाग हा डोंगराळ प्रदेश आहे. फक्त १० टक्के भाग दरीखोऱ्यांचा आहे. या भागामध्ये मैतेई समाज तर डोंगराळ भागामध्ये नागा आणि कुकी समाजाचं प्राबल्य आहे.
मणिपूरमध्ये एक नियम आहे. या नियमांतर्गत दरीखोऱ्यात राहणारे मैतेई समाजाचे लोक डोंगराळ भागामध्ये राहू शकत नाहीत किंवा जमीनही खरेदी करू शकत नाहीत. पण डोंगराळ भागामध्ये राहणारे अनुसुचित जातीमध्ये मोडणारे कुकी आणि नागा लोक दऱ्यांच्या प्रदेशात राहूही शकतात, जमीनही खरेदी करू शकता.
१९४९ च्या आधी मैतेई समाजही अनुसुचित जाती प्रवर्गातच समाविष्ट होता...
मैतेई समुदायाच्या वतीने मणिपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यामध्ये अनुसुचित जातीचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. १९४९ मध्ये मणिपूर भारताचा भाग बनला होता. त्याआधी मैतेई समुदाय अनुसुचित जातीमध्ये गणला जात होता. पण त्यानंतर काही काळाने या समाजाचा हा दर्जा काढून घेण्यात आला होता, असं या याचिकेत म्हटलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.