निजामशाही प्रस्थापित असलेल्या आणि 1947 संपूर्ण भारत स्वतंत्र झाला असता, स्वतंत्र न झालेल्या मराठवाड्यात आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस व सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. लोक ठिकठिकाणी निजामाच्या सैन्याविरुद्ध आणि रझाकारांच्या विरुद्ध बंड करून उठले होते. मराठवाड्यातील असंख्य लोकांनी हाती शस्त्र घेऊन भारताच्या अखंडत्वाचा आणि हैदराबादच्या मुक्तीचा संकल्प केला होता.
अश्या या क्रांती लढ्यात निजामी राजवट उलथवण्यासाठी बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य प्रेरणेतून तसेच अन्य क्रांतिकारकांचे काम पाहून या रखरखत्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली होती. त्याच्या या योगदानामुळे मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सोयगांव येथील लढ्याचा इतिहास अजरामर झाला.
सुरूवातीला दगडाबाईंनी 'बंदूक' आणि 'हातगोळे' चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्या दरम्यान एकदा अचानक त्यांना निजाम सरकारच्या सैनिकांनी शस्त्रासह रंगेहाथ पकडले. त्यामुळे त्यांना काही काळाचा तुरूंगवासही भोगावा लागला होता. दगडाबाईविषयी असे सांगितले जाते की त्यांनी पुरूषी वेष म्हणजे पॅन्ट आणि शर्ट घालून बंदूकीसह घोड्यावर प्रवासही केला आहे. हा संघर्ष करतांना त्यांना आपल्या कौटुंबिक आणि नवऱ्याच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्या या कोणत्याच गोष्टीने डगमगल्या नाही ,खचल्या नाहीत.
त्या या मुक्ती संग्रामाच्या लढयात स्वतःच्या जीवाचे काय होईल हे माहित नसल्याने त्यांनी आपला नवरा देवराव यांचा मैनाबाईंशी स्वतःहून दुसरा विवाह सुध्दा लावून दिला होता. दगडाबाई शेळके यांची स्वातंत्र्य सैनिक बाबुराव जाधव यांनी एक मुलाखत घेतली होती. त्यामध्ये दगडाबाई आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील आठवणी सांगतात. सुरुवातीला गावोगावी बैठका घेणं, पत्रक वाटणं, फेऱ्या काढणं, तिरंगे झेंडे लावणं असे काम त्यांनी केले.
एकदा दगडाबाई यांनी आपल्या घरावर आणि गावाच्या वेशीवर तिरंगा झेंडा फडकवला होता. त्याची माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलीस आले आणि झेंडे काढून घेऊन गेले. दगडाबाई गावाहून परतल्या तेव्हा त्यांना याचा संताप आला व त्या थेट तहसीलदार व पोलीसाला जाब विचारायला चार मैल पायी प्रवास करत निघाल्या. त्यांचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत गावातून नागरिकांचा जमावसुद्धा सोबत निघाला. तेव्हा पोलिसात तक्रार करून त्यांनी जाब विचारला व मोठं आंदोलन घडवून स्वत:च्या घरावरील झेंडा पुन्हा परत मिळवला.
15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु, तो आनंद हैदराबाद संस्थानातील लोकांना अनुभवता आला नाही. कारण निजाम भारतात हैदराबाद राज्य विलीन करत नव्हता. त्यामुळे हा लढा अधिक तीव्र होऊन सत्याग्रह सुरू झाले. स्वामी 'रामानंद तीर्थ की जय', भारत माता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा दिल्या की पोलीस, रझाकार सत्याग्रहींना पकडून जेल मध्ये टाकत व प्रचंड छळ करत. दगडाबाई यांनी अश्या जेलमधील सत्याग्रहींना गुप्त बातम्या पाठवण्याचेही काम केले.
एकदा तर त्यांनी मुरमुऱ्याच्या पिशवीतून सत्याग्रहींना तेजाबच्या बाटल्या पोहचवल्या. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांना संशय निर्माण झाला व वॉरंट काढले गेले. याची चाहूल लागताच दगडाबाई आपल्या गावी पुन्हा जाऊन तिकडेच स्वातंत्र्य सैनिकांसोबत सीमेवरील कॅम्पवर काम करु लागल्या. या दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना दारुगोळा, बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या तसेच अन्य सामान पोहचवण्यासाठी खूप धाडसी कामे केली. त्यांच्यासोबत ‘कुलकर्णी’ म्हणून अतिशय कमी वयाचा एक कार्यकर्ता होता. त्याचं नाव मुद्दाम 'बुटे खां' ठेवले होते. दगडाबाई सांगतात, की रझाकार सारखा पोशाख घालून तो त्यांच्या गुप्त बातम्या काढून आणत होता.
दगडाबाई आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकडीबरोबर रझाकार व पोलिसांचे दफ़्तर जाळण्याच्या कारवाया करत होत्या. अश्याच कारवाई दरम्यान काही दफ्तर कोलते टाकळी, गेवराई, मारसावळी, कोलते पिंपळगाव, सोयगांव आदी ठिकाणी जाळली. सोयगांव येथे झालेल्या कारवाईत बाबुराव काळे व स्वतः दगडाबाई उपस्थित असल्याचं त्या सांगतात. शेंदुर्णीमार्गे सोयगावला येऊन तेथील ठाण्याला त्यांनी आग लावली होती. या ठिकाणी झालेल्या लढाईत श्री राजहंस यांना हौतात्म्य आले होते. असे नानाविध मार्गांनी अलौकिक, धाडसी व पराक्रमी कार्य दगडाबाई शेळके यांनी करून दाखवले होते.
इथल्या मातीत देशभक्तांचे रक्त मिसळून ती अधिकच पवित्र झाली आहे. देशातील सर्वात मोठे असे हे हैदराबाद संस्थान होते. असंख्य देशभक्तांनी आपले बलिदान दिले, कित्येकांनी सजा भोगली, रझाकारांचा अत्याचार सहन केला, परंतु हार पत्करली नाही व भारताचे अखंडत्व अबाधित ठेवले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या दगडाबाई शेळके यांच्याही योगदानाचा उल्लेख यावेळी आता मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.