इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील स्थिती पूर्वपदावर येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असून इंफाळमधील संचारबंदी आणखी एका तासाने शिथिल केली आहे. यादरम्यान इंफाळ (पश्चिम) जिल्ह्यात मैतेई समुदायाच्या दोन घरांना आग लावल्याचा प्रकार काल रात्री घडला.
सुदैवाने ते घर रिकामे असल्याने मनुष्यहानी झाली नाही. तसेच ईशान्य भारताचे विद्यार्थी संघटनेचे एक शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर असून ते स्थितीचा आढावा घेणार आहेत. मणिपूर सरकारने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा झाल्याने इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यातील संचारबंदी आणखी एक तासाने शिथिल करत असल्याचे जाहीर केले. यानुसार आता दोन्ही जिल्ह्यांत पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल राहणार आहे.
दोन्ही जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या वेगवेगळ्या आदेशात म्हटले, की कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. सर्वसामान्य जनतेला औषध आणि खाद्यपदार्थासह अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी संचारबंदीचा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. अन्य जिल्ह्यांत थौबल, काकचिंग, विष्णूपूर येथे संचारबंदीत पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्यात एक जखमी
कोम युनियन मणिपूरचे अध्यक्ष सर्टो अहाओ कोम (वय ४५) यांच्यावर मंगळवारी रात्री चुराचांदपूर जिल्ह्यातील चिंगफेई गावाजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्टो यांनी पत्रकारांना सांगितले, की दहशतवाद्यांनी आपल्यावर अरामबाई टेंगोल, मैतेई लीपून आणि कोकोमी सारख्या मैतेई संस्थांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून हल्ला केला. दरम्यान, मणिपूरमध्ये तीन मे पासून हिंसाचार सुरू असून आतापर्यंत १६० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.