जम्मू : पाकव्याप्त काश्मीरमधून चुकून भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या दोन बहिणींना सहिसलामत पुन्हा एकदा त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. लाइबा झबेर(17) आणि सना झबेर (13) अशा या दोन अल्पवयीन बहिणी चुकून भारतीय हद्दीत आल्या होत्या. या दोन्ही सख्ख्या बहिणींना जम्मू-काश्मीरमधील पूँछच्या चाकण दा बाग या ठिकाणी भारताच्या सुरक्षा दलाने या दोघींना पाकिस्तानच्या सुरक्षा दलाकडे सुपुर्द केलं.
या दोघीही घरी जात असताना काळोखात त्यांचा रस्ता चुकला. आणि त्या दोघी चुकून भारतीय हद्दीत आल्या, असं त्यांनी भारतीय जवानांना सांगितलं. नियमानुसार परवानगी शिवाय भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांच्या चौकशीत बोलण्यामध्ये तथ्य आढळल्यानंतर त्या दोघींनाही सुरक्षितरित्या पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्यांची पाठवणी करताना भारताकडून त्यांना मिठाई तसेच भेटवस्तूही देण्यात आल्या. त्यापूर्वी ऐन कडाक्याच्या थंडीत त्यांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ते अन्न, पाणी आणि उबदार कपडे देण्यात आले होते. तसेच त्यांना सुरक्षा दलांच्या बंदोबस्तात सैन्याच्या एका खोलीत ठेवण्यात आलं होतं.
आपला प्रवेश चुकीने भारतात झाल्यानंतर लाइबा आणि सना खूपच घाबरल्या होत्या. आपल्याला आता परत घरी जाताच येणार नाही असं त्यांना वाटलं होतं. मात्र, भारताकडून त्यांना चांगली आणि योग्य वागणूक मिळाली. त्यामुळे त्यांची भीती नाहीशी होऊन त्या आनंदी मनाने घरी जाऊ शकल्या, असं त्या दोघींनी म्हटलंय. जाण्याआधी त्यांनी भारताचे आभारही मानले आहेत. काहुटामध्ये असताना भारताविषयी मनात तयार झालेली प्रतिमा बदलली असून आता भारताविषयी आदर वाटत असल्याचं त्या दोघींनी नमूद केलं.
त्या दोघींची चौकशी झाल्यानंतर त्यांना 24 तासांच्या आतच पाकिस्तानकडे हस्तांतरित करण्यात आलं. ही हस्तांतरणाची प्रक्रिया चाकण दा बाग या ठिकाणी झाली. यावेळी दोन्ही देशांतील सुरक्षा पथकांचे अधिकारी आणि स्थानिक नागरी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. भारत-पाक दरम्यानच्या सीमावर्ती भागात दाट जंगल आहे. या परिसरात अंधारात रस्ता चुकल्याने दुसऱ्या देशाच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या घटना चुकीने घडताना दिसतात. नकळतपणे प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची नियमानुसार चौकशी केली जाते. या चौकशीत जर तथ्ये खरी वाटली तर त्या व्यक्तीला त्याच्या मायदेशात पाठवण्याची प्रक्रिया केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.