नवी दिल्ली : काही देशांमध्ये मंकीपॉक्सच्या वाढत्या रूग्णसंख्यमुळे चिंतेत भर पडलेली असताना आता केंद्र सरकारनेदेखील कडक पाउलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि ICMR ला परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मंकीपॉक्सग्रस्त देशांमध्ये प्रवासाचा इतिहास असलेल्या आणि या आजारीची लक्षणे असणाऱ्या प्रवाशांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यास सांगण्यात आले आहे.
यूके, यूएसए, पोर्तुगाल, स्पेन आणि यूके, यूएससह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्समध्ये सामान्यत: ताप, पुरळ आणि सुजलेल्या लिम्फ नोड्ससारखी लक्षणं मनुष्यामध्ये आढळून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच हा आजार सामान्यत: दोन ते चार आठवडे टिकणारा एक स्व-मर्यादित आजार असून, हा गंभीर देखील असू शकतो. अलिकडील काळात या आजारामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सुमारे 3-6 टक्के आहे. हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो, जखमा, शरीरातील द्रव, श्वसनाचे थेंब आणि बेडिंग यांसारख्या दूषित गोष्टींच्या संपर्कातून याची लागण होण्याचा धोका अधिक आहे.
फ्रान्स, बेल्जियम, जर्मनीत मंकीपॉक्सचा कहर
फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने शुक्रवारी मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे युरोपियन राष्ट्रे स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्ससह आफ्रिकेच्या काही भागांमध्येदेखील स्थानिक आजारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे. दरम्यान, वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
बेल्जियनमध्ये या विषाणुची दोन प्रकरणे समोर आली आहे. तर, स्पेनमध्ये आज 14 नवीन रूग्णांची भर पडल्याने मंकीपॉक्ची लागण झालेल्यांचीं संख्या आता 21 वर पोहोचली आहे. कॅनडामध्ये आतापर्यंत दोन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली असून, क्विबेक प्रांतातील अधिकारी 17 संशयित प्रकरणांची चौकशी करत आहेत. इटली आणि स्वीडनमध्ये प्रत्येकी एका मंकीपॉक्स प्रकरणाची नोंद झाली आहे. युकेमध्ये 6 मे पासून नऊ प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे.
मंकीपॉक्स आजार नेमका काय?
मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे. प्राण्यांमधून तो माणासामध्ये आला. देवी या आजाराच्या जवळ जाणारा हा आजार आहे. याची लागण झाली तर छोटी पुरळ अंगावर येतात. हा आजार शरीरात पसरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यावर सध्या कुठलंही ठराविक औषध उपलब्ध नाही. या रोगाची लागण झाल्यानंतर कांजण्यांप्रमाणे फोड येतात असे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
मंकीपॉक्सची लागण कशी होऊ शकते याबबात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एखाद्या व्यक्तिला याची लागण होऊ शकते. त्याचबरोबर शरीरातील द्रव, थुंकी किंवा मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी वापरल्यास हा आजार होण्याचा धोका संभवतो. समलिंगी लोकांना याचा जास्त धोका असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर लैंगिक संबंधातून देखील मंकीपॉक्स पसरु शकतो असं देखील तज्ज्ञ सांगतात. हा रोग मेंदू आणि पचनसंस्थेत पसरल्यास त्याचे वेगळे परिणाम दिसू शकतात. यामुळे डोळे जाण्याचे प्रकार देखील घडू शकतात असं देखील डॉक्टर सांगतात. (What Is MonkeyPox)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.