चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी
चौरीचौरा (उत्तर प्रदेश) : भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वळण देणाऱ्या चौरीचौरा येथील आंदोलनाच्या स्मृती जपणारे हुतात्मा स्मारक १०० वर्षांनंतरही दुर्लक्षित असल्याची खंत चौरीचौरा घटनेतील हुतात्म्यांच्या वारसांना आजही आहे. स्वातंत्र्यानंतर चौरीचौरामध्ये हुतात्मा स्मारक साकारण्यासाठी ५६ वर्षे लागणे आणि या इतिहासाकडे सरकारचे आणि देशवासीयांचेही झालेले दुर्लक्ष याबद्दलही त्यांच्या मनात नाराजी आहे.
चौरीचौराच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे एक कार्यक्रमही झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेच्या स्मृती जागविताना हुताम्यांना अभिवादन केले होते. या घटनेची साक्ष देणारी दोन स्मारके चौरीचौरा येथे आहेत.
आंदोलकांच्या संतापाचे बळी ठरलेल्या २३ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने उभारलेले शहीद स्मारक चौरीचौरा पोलिस ठाण्याच्या आवारात मागच्या बाजूला आहे. तर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मृतीस्थळ चौरीचौरा रेल्वेस्थानकाच्या पलिकडे उभारण्यात आले आहे.
स्मृतिस्तंभ, संदर्भ ग्रंथालय, फाशीची शिक्षा झालेल्या आंदोलकांचे अर्धपुतळे असलेले दालन आणि अभ्यासिका असे या हुतात्मा स्मारकाचे स्वरूप आहे. मात्र इथे हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि नमन करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याची खंत स्मारकाची देखभाल करणारे रविनारायण त्रिपाठी आणि लालबाबू यादव व्यक्त करतात.
रविनारायण त्रिपाठी यांचे पणजोबा लालबिहारी ऊर्फ मेबू यांना चौरीचौराच्या खटल्यात फाशीची शिक्षा, तर लालबाबू यादव यांचे पणजोबा दीप यादव यांना आठ वर्षांची शिक्षा झाली होती.
रविनारायण त्रिपाठी यांचे वडील रामनारायण त्रिपाठी यांनी चौरीचौराच्या हुतात्मा स्मारकाची कल्पना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली होती. त्यावेळी ८३ हजार रुपयांचा निधी इंदिरा गांधींनी या स्मारकाला दिला आणि १९८३ मध्ये स्मारकाचे भूमीपूजन केले.
तर १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले होते. पोलिस ठाण्यातील शहीद पोलिस स्मारक चौरीचौरा घटनेनंतर ब्रिटिश सरकारच्या कार्यकाळातच १९२३ मध्ये उभारण्यात आले होते, याकडे रविनारायण त्रिपाठी यांनी लक्ष वेधले.
विशेष म्हणजे या चौरीचौरा येथील घटनेतील सहभागी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची अतिशय दयनीय अवस्था आहे. आर्थिक लाभ गौणच पण हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना साधा सन्मानही मिळत नाही ही रविनारायण त्रिपाठी यांची खंत बोलकी आहे. १९९३ मध्ये मोतीलाल व्होरा हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना त्यांनी या वारसांना ८०० रुपये मानधन सुरू केले होते. या व्यतिरिक्त स्मारकाच्या देखभालीसाठी मिळणारे ९२०० रुपयांचे मासिक मानधन अतिशय तुटपुंजे आहे.
असा आहे इतिहास
ब्रिटिश राजवटीमध्ये महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनादरम्यान चौरीचौरा येथे विदेशी कपड्यांची होळी करणाऱ्या आंदोलकांवर चार फेब्रुवारी १९२२ पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यानंतर संतप्त जमावाने चौरीचौराचे पोलिस ठाणे पेटवून दिले होते. त्यात २३ पोलिस मृत्यूमुखी पडले होते. हे सर्व भारतीय होते.
या घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले होते. तर, ब्रिटिश सरकारने चौरीचौरामधील आंदोलकांना अटक केली होती. यात तत्कालीन सत्र न्यायालयाने २२८ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.
त्यावेळी बलियामध्ये राहणारे बाबा राघवदास यांनी केलेल्या आग्रहानंतर पंडित मदनमोहन मालवीय यांनी या आंदोलकांना वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात लढा दिला व २०९ जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेपासून वाचविले. मात्र १९ जणांना आग्रा येथे चार जुलै १९२३ ला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
कोण होते बाबा राघवदास?
पूर्वांचलचे गांधी म्हणून ओळखले जाणारे बाबा राघवदास हे मुळचे पुण्याचे. १८८६ मध्ये जन्म झालेले बाबा राघवदास (पूर्वाश्रमीचे राघवेंद्र) आध्यात्मिक गुरूच्या शोधात प्रयाग, काशी येथे गेले होते. मात्र गाजीपूर येथे त्यांना मौनीबाबा हे गुरू भेटले.
त्यानंतर बरहज (देवरिया) येथे त्यांनी आश्रम स्थापन केला होता. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींसोबत तर भूदान आंदोलनात आचार्य विनोबा भावेंसोबत त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या नावाने देवरियामध्ये महाविद्यालय तर गोरखपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयही आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.