अहमदाबाद : ‘‘मोरबी पूल तुटण्याच्या घटनेने गुजरातच्या नावाला काळिमा फासला गेला आहे. १३५ लोकांचा जीव गेलेल्या या दुर्घटनेबद्दल राज्य सरकारच्या वतीने अजूनपर्यंत एकानेही माफी मागितलेली नाही अन त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे. गुजरातच्या राज्यकारभाराची सूत्रे अहमदाबादहून नव्हे तर दिल्लीतून हलविली जात आहे. म्हणूनच सहा वर्षांत तीन मुख्यमंत्री राज्याने पाहिले,’’ अशी टीका काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजपवर केली.
काँग्रेसच्या प्रचारासाठी ते मंगळवारी अहमदाबाद येथे होते. पत्रकार परिषदेत बोलताना चिदंबरम म्हणाले, की माझ्या माहितीनुसार मोरबी पुलाच्या दुर्घटनेबद्दल कोणीही माफी मागितलेली नाही किंवा राजीनामाही दिलेला नाही. जर अशी दुर्घटना परदेशात घटली असती तर तेथे तातडीने राजीनामा घेण्यात आला असता. मोरबीच्या घटनेत जबाबदारीचा पूर्ण अभाव आहे. आगामी निवडणूक सहजपणे जिंकू, असे सरकारला वाटत असल्याने त्यांनी माफी मागितली नाही आणि या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्याची गरजही त्यांना वाटली नाही. भाजप अहंकाराच्या शिखरावर बसला असल्याने भाजप सरकार आणि त्यांच्या नेत्यांना त्याची जबाबदारी घेण्याची गरज वाटली नाही.
काँग्रेसला संधी द्या
गुजरातमधील जनतेने भाजप सरकारला हटवून काँग्रेसला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘‘सर्व परिपक्व संसदीय लोकशाहीत लोक सरकार बदलत असतात. काही वर्षांनी किंवा मुदतीनंतर सरकार बदललेच पाहिजे. केरळ, तामिळनाडूसारख्या राज्यांत आरोग्य, शिक्षण असा सामाजिक क्षेत्रांची प्रगती झाली, कारण प्रत्येक पाच किंवा दहा वर्षांनी तेथील सत्ताधारी बदलले आहेत. म्हणूनच तुमचे सरकार बदला, असे आवाहन करत आहे. लोकशाहीच्या अधिकाराचा वापर करा. संसदीय लोकशाही तत्त्वाची स्थापना करा,’’ असे चिदंबरम म्हणाले.
तपास यंत्रणा भाजपचे दास
केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असे वाटते का, यावर बोलताना या यंत्रणा भाजपचे दास आहेत, असा दावा त्यांनी केला. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ यांनी कारवाई केलेली ९५ टक्के प्रकरणे ही विरोधकांवरील आहेत. जर कोणी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याच्याविरोधातील सर्व प्रकरणे मिटविली जातात आणि त्यांच्यावरील कथित पापे धुतली जातात, असे चिदंबरम म्हणाले.
दुहेरी इंजिन सरकार ही वल्गना
‘दुहेरी इंजिन सरकारची बढाई वल्गना आहे. गुजरात ही एक बैलगाडी आहे, जी मातीच्या वाटेवरून चालताना लोकांचा मोठा समूह मागे टाकून जात आहे. या विशेषतः अनुसूचित जमाती, महिला, युवक आणि गरिबांचा समावेश आहे,’’ असा दावा चिदंबरम यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.