अडवानींनी राजकीय हिंदुत्वाला पुढे नेत थेट सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. अनेक तरुण नेत्यांची फळी त्यांनी घडविली. याच विचारधारेला पुढे नेणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांचा ‘भारतरत्न’ने गौरव होतो आहे. शिष्याने गुरूंचा केलेला हा गौरव आहे.
अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा ही देशभरातल्या हिंदुत्व हितैषी जाणिवांचे प्रतीक आहे. ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ या घोषणा ८० च्या दशकात सुरू झाल्या अन् ९० च्या दशकात राष्ट्रीय राजकारणाचा प्रमुख स्वर बनल्या. बहुसंख्यांकावरील अन्यायाला राम मंदिराच्या निमित्ताने वाचा फुटली. बाबर मोठा की राम? या प्रश्नाभोवती रामजन्मभूमी चळवळ उभी केली गेली अन् ती भारतीयांनी यशस्वी करून दाखविली.
मंदिराची देखणी वास्तू या प्रवासातून मिळालेले नवनीत अन् संघ परिवाराचेही संचित आहे. या संपूर्ण प्रवासात हिंदू हिताचा चेहरा झालेले लालकृष्ण अडवानी मात्र अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला हजर नव्हते. सोमनाथच्या मंदिरातून २५ सप्टेंबर १९९० ला निघालेला त्यांचा रथ अद्याप भारतीयांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच लाखो नजरा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात ते तिथे कुठे आहेत? याचा शोध घेत होत्या.
या वयात थंडी सहन झाली नसती म्हणून ते तिथे गेले नाहीत, असेही सांगितले गेले. पण त्यामुळे अनेकांचे समाधान झाले नाही. ‘आमंत्रण देतो आहोत पण सोहळ्याला येऊ नका,’ असे संघ परिवारप्रणित चळवळीला वाटते आहे, अशा आशयाचे मजकूर काही माध्यमांत छापून आले होते. राजकीयदृष्ट्या जागृत झालेल्या हिंदू मतपेढीला मात्र ही लोणकढी थाप पटली नाही. राम मंदिराच्या राजकीय चळवळीचे नायक लालकृष्ण अडवानी हेच होते. त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती.
त्यातच या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेचच कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ हा सन्मान देण्यात आल्याने अडवानींच्या वाट्याला हा सर्वोच्च पुरस्कार येणार नाही असेच वाटू लागले. हिंदुत्वाची यशस्वी राजकीय मांडणी करणारा हा नेता जसा पंतप्रधान होऊ शकला नाही तसाच ‘भारतरत्न’चाही मानकरी होणार नाही असे वाटू लागले.
राजकीय वर्तुळात ही चर्चा रंगली असतानाच आज अडवानी यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाला. मोदींनी त्यांच्या गुरूंना दिलेली ही दक्षिणा आहे. ‘गुजरातेत दंगल झाली तेव्हा मोदी सरकार बरखास्त करा,’ असे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मत होते. त्यांच्या रोषापासून मोदींना कवचकुंडले दिली ती अडवानींनी. जनता मोदींच्या पाठीशी आहे, हे अडवानींना अचूक कळले होते.
खरे तर वाजपेयींच्या मागची ताकद असलेल्या अडवानींनी ८४ साली गांधीवादी समाजवादाची वाजपेयींची मोहीम केवळ २ खासदार निवडून आणत थांबली हे लक्षात घेत आक्रमक हिंदुत्ववादाची साथ घेतली. याच बळावर भाजपची खासदारसंख्या १९८९ साली ८५ अन् ९० साली १२० वर पोहोचली. याचे श्रेय अडवानींना जाते.
तरुण नेतृत्व तयार केले
नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन, वेंकय्या नायडू, सुषमा स्वराज, उमा भारती अशी तरुणांची फौज अडवाणींनी स्वत:च्या देखरेखीखाली तयार केली होती. भाजप परिवाराचे ते प्रमुख होते. आपल्या कडवट हिंदुत्वामुळे पंतप्रधानपद दुष्प्राप्य आहे.
या जाणिवेने १९९५ साली मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आणि जया जेटली यांना सोबत घेऊन त्यांनी अटलबिहारींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले अन् स्वत: लक्ष्मण होणे पसंत केले. या आणि अशा अनेक घटना स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणात लालकृष्ण अडवानी यांचे योगदान किती मोठे आहे? हे दाखवून देणाऱ्या आहेत.
सगळी दिशाच बदलली
भाजपच्या वाटचालीत त्याचा सिंहाचा वाटा आहे. अनेक वादळेही त्यांनी अंगावर घेतली. पाकिस्तान दौऱ्यावर गेलेले अडवानी अचानक सेक्युलर झाले अन् जिनांच्या कबरीला त्यांनी वंदन केले. या बदलात संघपरिवाराला विश्वासात घेतले गेले नसल्याने नाराजी पसरली. पण यामुळे त्यांचे हिंदुत्व काही कमी झाले नाही. ‘रग रग हिंदू मेरा परिचय’ म्हणणाऱ्या वाजपेयींना अडवाणींनी साथ दिली. ते त्यांचे साहाय्यक होते अन् सहकारीही.
भिवंडीत धार्मिक कारणामुळे दंगली झाल्या तेव्हा भिवंडीला भेट देऊन भावनिक झालेले अटलबिहारी वाजपेयी नंतर लगेचच भाषणात बोलून गेले ‘अब हिंदू मार नही खायेगा’. भाजपच्या राजकारणाची ही दिशा नंतर भारताच्या राजकारणाचीही दिशा ठरली.
हे यश अडवानींमुळेच
अडवानी यांना मिळालेला भारतरत्न हा सन्मान ‘बहुसंख्याक’वादी राजकारणाचा गौरव आहे. एकेकाळी कमालीची वादग्रस्त मानली जाणारी ही भूमिका देशाचा मुख्य राजकीय स्वर ठरावी यासाठी अडवानींनी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. एकेकाळी कशाबशा दोन जागा जिंकणारा हा पक्ष वाजपेयींच्या काळात आघाडीतून अन् मोदींच्या काळात स्वबळावर दोनदा सत्तेत आला अन् आता तो तिसऱ्यांदा विजयी होण्याचे स्वप्न पाहतो आहे. हे अडवानी यांनी रचलेल्या पायामुळेच शक्य झाले.
योगदान विसरू शकत नाही
हातांचे दोन्ही तळवे एकमेकांवर फिरवत एखादे मत मांडण्याची अडवानींची लकब फारच गाजली. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वत:चीच मोहीम अपयशी ठरली तेव्हा २००९ मध्ये त्यांच्यावर टीकाही झाली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरविण्याचे निश्चित झाले तेव्हा अडवानी रुसले होते. तेव्हा त्यांचे नाराज होणेही चर्चेचा विषय बनले. मोदी युग अवतरताच त्यांची रवानगी मार्गदर्शक मंडळात झाली पण तरीही अडवानींनी जे काम केले, ते अमीट होते. राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील त्यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही.
अमेरिका दौऱ्याची आठवण
उपपंतप्रधान असताना त्यांच्या समवेत पत्रकार म्हणून जाण्याचा योग आला. अमेरिकेत व्हाइट हाउसमध्ये तत्कालीन अध्यक्ष बुश यांनी अडवानी म्हणजे भारताचा परिचय असल्याचे काढलेले उद्गार अजूनही स्मरणात आहेत. त्यावेळी अडवानी हे त्या दौऱ्यात झालेले करार आम्हा पत्रकारांना समजावून सांगत असत. ब्रिटन नागरिकांची किती काळजी घेतो ते सांगत.
भौतिक प्रगती गरजेची आहेच हे ते आवर्जून सांगत. उपपंतप्रधान असल्याने प्रवासासाठी शासकीय विमान मिळते पण तो मान खरा वाजपेयींचा असल्याचे ते सांगत. हवाला डायरीतल्या उल्लेखाचा आरोप खोटा ठरेपर्यंत मी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले होते हे ते तळमळीने सांगत.
विचारधारेचे यश पाहिले
निवडणुकीचा खर्च सरकार करत नाही तोवर भारतातला भ्रष्टाचार दूर होणार नाही हे ते सांगत. जवळपास आठ दिवस आम्ही अडवानींसमवेत प्रवास करत होतो. अडवानी हे आहाराबाबत कमालीची काळजी घेतात. ते फारच कमी आणि कामापुरतेच खात असत. त्यांना संगीत ऐकणे व पुस्तके वाचायला आवडते.
त्यांच्या आत्मचरित्राचे नावही त्यांनी ‘माय कंट्री, माय लाइफ’ असे ठेवले. काळाचा महिमा अगाध असतो. जी विचारधारा जपली, वाढविली ती कालौघात यशस्वी झालेली अडवानींनी पाहिली. त्याच विचारधारेला पुढे नेणाऱ्या मोदी यांच्या काळात अडवानींचा ‘भारतरत्न’ने गौरव होतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.