कोहिमा - नागालँडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बुधवारी सुमारे ८० टक्के मतदान झाले. मतदान सुरू झाल्या झाल्या पहिल्या दोन तासांतच येथे नागरिकांनी उत्साह दाखवत २० टक्के मतदान केले होते. सुमारे २० वर्षांनंतर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले. सकाळी साडे सात वाजता येथील मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले.
नागालँडमध्ये तीन नगरपालिका आणि २२ नगर परिषदांसाठी तब्बल २० वर्षांनी मतदान होत असल्याने आजचा दिवस येथील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरला. यापूर्वी २००४मध्ये येथे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झाले होते. विशेष म्हणजे येथे पहिल्यांदाच निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली.
नागालँड येथे यापूर्वी अनेकदा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती, मात्र स्थानिक संस्थांनी आणि आदिवासी संघटनांनी महिला आरक्षणाबाबत काही आक्षेप नोंदविल्याने त्याचप्रमाणे मालमत्तेवरील कराच्या तरतुदींबाबत असलेल्या आक्षेपांमुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. यंदा मात्र कोणत्याही विरोधाशिवाय येथे निवडणुका होत आहेत.
त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
काही किरकोळ घटना वगळता येथील मतदान शांततेच्या वातावरणात पार पडल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकूण ११ राजकीय पक्षांचे ५२३ उमेदवार रिंगणात आहेत.एकूण ३.२३ कोटी मतदारांपैकी एक लाख १३ हजार ५२१ महिला मतदार आहेत.
येथील ४२० मतदान केंद्रांवर मतदान झाले असून ते ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर मतदान घेण्यात आले. येथील एकूण दहा जिल्ह्यातील २१४ वॉर्डांमध्ये मतदान झाले. येथे त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
‘ईपीएनपीओ’चा बहिष्कार
नागालँडमधील ईस्टर्न नागालँड पीपल्स आॅर्गनायझेशन (ईएनपीओ) या संघटनेने निवडणुकीवर बहिष्कार घातला. या संघटनेचा प्रभाव असलेल्या भागात १४ नगर परिषदा येत असून येथून ५९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, ‘ईपीएनपीओ’ने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले. ईपीएनपीओने मागील लोकसभा निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकला होता.
या प्रमुख पक्षांचा सहभाग
भाजप, काँग्रेस, नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ), एनडीपीपी, रायझिंग पीपल्स पार्टी, एलजेपी, आरपीआय (आठवले गट) संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, एनडीपीपी आणि एनपीपी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.