नवी दिल्ली : देशात सध्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून दुसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. भारतात दोन लशींचे डोस दिले जात आहे. यामध्ये सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. आता व्हॅक्सिनच्या बाबत आणखी एक यश भारताला मिळू शकतं. कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या हैदराबादच्या भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु झाली आहे. या प्रोडक्टचं नाव बीबीव्ही 154 असं असून ही एक इंटरनेजल व्हॅक्सिन आहे. फेब्रुवारीमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने भारत बायोटेकला व्हॅक्सिनच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलसाठी मंजुरी दिली होती.
नेजल व्हॅक्सिनच्या ट्रायलची प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी दहा जणांची निवड केली असल्याचं समजते. तसंच आतापर्यंत दोघांना ही लस दिली असल्याचंही म्हटलं जात आहे. व्हॅक्सिन देण्यात आलेल्या दोन्ही व्यक्तींची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. भारत बायोटेकनेच याबाबतची माहिती दिली आहे. जर हे व्हॅक्सिन ट्रायलमध्ये यशस्वी झाले तर देशात लसीकरण प्रक्रिया आणखी सोपी होईल. सुईचा वापर यात होणार नाही. त्यामुळे व्हॅक्सिनसाठी प्रशिक्षित व्यक्तीची आवश्यकता भासणार नाही. लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल.
नेजल व्हॅक्सिनसाठी भारत बायोटेक आणि सेंट लुईच्या वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनने कराराची घोषणा सप्टेंबरमध्ये केली होती. याअंतर्गतं कंपनीला व्हॅक्सिनच्या वितरणाचे अधिकार मिळाले होते. दरम्यान, कंपनीला हे व्हॅक्सिन अमेरिका, जपान आणि युरोपात विकता येणार नाही.
कंपनीचे संस्थापक आणि सीएमडी कृष्णा एल्ला यांनी सांगितलं होतं की, व्हॅक्सिनचा सिंगल डोस देणं सोपं असेल. सिरिंज किंवा नीडलचा वापर होणार नसल्यानं खर्चही कमी होईल. ChAd-SARS-CoV-2-S चा इंटरनेजल इम्युनायजेशन नाकातच एक इम्यून रिस्पॉन्स तयार करेल. विशेष म्हणजे नाकच शरीरात व्हायरसला प्रवेश करण्याचं माध्यम आहे. अशा परिस्थितीत आजार, व्हायरस आणि प्रसारापासून सुरक्षा मिळेल. सध्या भारतात डीसीजीआयने सीरम आणि भारत बायोटेकला आपत्कालीन परिस्थितीत लस देण्याची परवानगी दिली आहे.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.