National Navy Day: भारतीय नौदलाचा 'हा' इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

Indian Navy
Indian Navysakal
Updated on

भारतभूमीला ६ हजार वर्षांपूर्वीचा सागरी इतिहास आहे. सागरावर स्वार होत व्यापार क्षेत्रात त्या काळात पावले टाकल्याचे संदर्भ आढळतात. जल वाहतूक, जल व्यापार विस्तारत गेला, तशी सागरी सुरक्षेची गरजही ठळक होत गेली. यातून भारताचे सागरी विश्‍व विस्तारत गेले. मध्ययुगात विशेषतः चोल राजवंशाची सत्ता असताना नौदल मोहिमा राबवल्या गेल्या.

त्या काळात सागरी चाचेगिरी वाढत होती. चोल राजांनी ब्रह्मदेश, सुमात्रा, श्रीलंकेपर्यंत नौदल मोहिमा राबवल्या. चौदाव्या आणि पंधराव्या शतकात भारतात जहाज बांधणी तंत्रज्ञान विकसित झाले होते. त्या काळातही शंभर माणसे वाहून नेण्याची क्षमता असणारी जहाजे येथे बनवली जायची. त्यासाठी ‘कंपार्टमेंट सिस्टीम’ही येथे विकसित झाली होती.

Indian Navy
National Navy Day: देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाचे काम चालते कसे?

सागरी सामर्थ्याला आव्हाने

व्यापाराच्या निमित्ताने विविध देशांतील लोक जलमार्गाने भारताकडे येऊ लागले. ज्याच्याकडे सागरी सामर्थ्य, तो समुद्राचा राजा, अशी संकल्पना रुजू लागली. असा व्यापार अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा ठरू लागला. यातून सागरी सामर्थ्य वाढवण्याची आणि शह देण्याची स्पर्धा वाढली. भारताच्या सागरी सामर्थ्याला धक्का देण्याची सुरुवात पोर्तुगिजांनी केली. डच, इंग्रजही यात उतरले.

शिवाजी महाराजांचे आरमार

भारताच्या युद्धसज्ज, सामर्थ्यशाली आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते; पण त्या आधीही आणि समकाळात इतर सत्ताधीशांकडे आरमार साम्राज्य होतेच. त्या काळात पश्‍चिमेला मोगल व जंजिऱ्याच्या सिद्धीची एकत्र आरमार शक्ती होती. सिद्धीला शह देण्यासाठी दक्षिणेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचे आरमार बांधायला सुरुवात केली. कान्होजी आंग्रे आणि सिधोजी गुजर हे यात प्रमुख होते.

महाराजांनी कोकण ताब्यात घेतल्यानंतर स्वतंत्र आरमार निर्मितीवर प्रत्यक्ष काम सुरू होते. यासाठी आर्थिक चणचण होती. सुरतेच्या लुटीतून मिळालेले धन यासाठी कामाला आले. कल्याण, भिवंडी, पेण येथे युद्धनौका बांधणीचे काम केले जाऊ लागले. याच्याच जोडीने प्रशिक्षित सैन्यदल उभारणी, सुरक्षित बंदरांचा विकास केला गेला. सुरक्षेच्या दृष्टीने जलदुर्गांचे महत्त्व मोठे होते. त्यामुळे विजयदुर्गसह कोकणच्या किनारपट्टीवरील किल्ल्यांवर महाराजांनी विशेष लक्ष दिले. पोर्तुगिजांना वचक बसावा, यासाठी सिंधुदुर्गात जलदुर्गाची गरज होती. ती ओळखून १६६४ मध्ये मालवणजवळ मजबूत अशा सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी करण्यात आली.

Indian Navy
Indian Navy Day 2023: भारतीय नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबरला का साजरा केला जातो? जाणून घ्या

इंग्रजांचा सागरी प्रभाव

ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजांनी भारतभर पाय पसरायला सुरुवात केली. व्यापार हा त्यांचा मुख्य उद्देश होता. यात जल व्यापाराचा वाटा सर्वाधिक होता; मात्र सागरी चाचेगिरी व्यापारासाठी डोकेदुखी ठरायची. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने नौदल शाखा सुरू केली. पुढे १६८६ मधील या नौदलाला ‘बॉम्बे मरिन’, असे नाव देण्यात आले. पुढे हेही नाव बदलून ‘हर मॅजेस्टीज इंडियन मरिन’, असे नामकरण केले. १८९२ मध्ये पुन्हा ‘रॉयल इंडियन मरिन’, असे नवे नाव देण्यात आले. ५ सप्टेंबर १९१२ ला त्यांनी पहिले लढावू जहाजांचे सक्षम पथक बनवले. १९३४ मध्ये नौदल श्रेणीत सुधारणा करून याचे नामकरण ‘रॉयल इंडियन नेव्ही’, असे झाले. नौदल आकार घेऊ लागले.

रॉयल नेव्हीतील बंड

दुसऱ्या महायुद्धात रॉयल इंडियन नेव्हीने मोठी कामगिरी केली; मात्र या महायुद्धात ब्रिटिशांचे खूप मोठे नुकसान झाले होते. याच दरम्यान ‘रॉयल नेव्ही’मध्ये असंतोष डोके वर काढू लागले. यात भारतीयांना कमांडंटपेक्षा वरचा दर्जा दिला जात नसे. यामुळे यात भारतीयांना वरिष्ठ अधिकारी म्हणून अपवादानेच संधी मिळायची. १९४६ मध्ये ‘रॉयल नेव्ही’त बंड झाले. एकूण ७८ जहाजे, २० किनारी आस्थापना आणि २० हजार खलाशी संपात उतरले. याचे लोंढ देशभर पसरले. कम्युनिस्ट पक्षाने याला पाठिंबा दिला. या बंडाला भारतीय सैन्य व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळाला नसल्याने ते अयशस्वी झाले; मात्र ही घटना भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये महत्त्वाची ठरल्याचे अनेकजण सांगतात.

Indian Navy
Indian Navy Day : भारतीय नौदलाच्या सामर्थ्याची झलक! इंडियन नेव्हीने शेअर केले खास व्हिडिओ

भारतीय नौदलाची मुहूर्तमेढ

इंग्रजांच्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’त प्रामुख्याने इंग्रज अधिकारीच असायचे. स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलाला आकार देण्याची वेळ आली. कारण भारत-पाकिस्तान फाळणीत नौदल विभागले गेले होते. नौदल विभागातील २१ टक्के अधिकारी आणि ४७ टक्के खलाशी पाकिस्तानकडे गेले. त्यांनी ‘रॉयल पाकिस्तान नेव्ही’चा पर्याय स्वीकारला. पुढे भारताने काही इंग्रज अधिकाऱ्यांना कायम ठेवत स्वतंत्र नौदल आकारायला सुरुवात केली. त्या काळात ११ हजार जवान आणि ३२ जहाजे त्यांच्याकडे होती. २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर ‘रॉयल’, हे नाव वगळून ‘भारतीय नौदल’ अर्थात ‘इंडियन नेव्ही’ उदयाला आली.

नौदल दिन आणि कर्तबगारी

भारताचा नौदल दिवस ४ डिसेंबरला राबवण्यामागची कथाही खूप शौर्याने भारलेली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यावेळी अ‍ॅडमिरल सरदारीलाल मथरादास नंदा यांच्या नेतृत्त्वाखाली नौदलांनी पश्‍चिम आणि पूर्व पाकिस्तानची नाकाबंदी केली. ३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ ‘आयएनएस राजपूत,’ या विनाशिकेने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची ‘पीएनएस गाझी’ ही पाणबुडी बुडाली. ४ डिसेंबरला भारतीय नौदलांनी ‘ऑपरेशन ट्रायड’ यशस्वीरीत्या राबवले. भारताने पाकिस्तानला नमवले. नौदलाच्या इतिहासातील या सुवर्ण अध्यायाची आठवण म्हणून ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा होऊ लागला.

Indian Navy
Indian Navy Day 2022: भारतीय नेव्हीच्या हल्ल्यात 7 दिवस जळत होता कराची पोर्ट, वाचा नेव्ही डेचा इतिहास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.