Jairam Ramesh : ‘एनसीईआरटी’तटस्थपणे काम करत नाही!

‘एनसीईआरटी’चे ध्येय हे पाठ्यपुस्तकांची निर्मिती आहे, एखाद्या राजकीय पक्षाचे धोरण अथवा पत्रक छापणे नाही, अशी खोचक टीका रमेश यांनी केली आहे.
MP Jairam Ramesh
MP Jairam Rameshsakal
Updated on

नवी दिल्ली - ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ही आता तटस्थपणे काम करणारी संस्था राहिलेली नसून, २०१४ पासून ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या एका संस्थेसारखी कार्य करत आहे.

यंदाच्या दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करून धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेवर आणि ती मानणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका करण्यात आली आहे,’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी ‘एक्स’च्या माध्यमातून केला. ‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांवरून त्यांनी ही टीका केली आहे.

‘एनसीईआरटी’चे ध्येय हे पाठ्यपुस्तकांची निर्मिती आहे, एखाद्या राजकीय पक्षाचे धोरण अथवा पत्रक छापणे नाही, अशी खोचक टीका रमेश यांनी केली आहे. ‘‘धर्मनिरपेक्षतेवर टीका करत ‘एनसीईआरटी’ने आपल्या देशाच्या राज्यघटनेचा अपमान केला आहे. राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख लोकशाहीच्या काही मूलभूत स्तंभांपैकी एक असा करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांत राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता हा भाग अत्यावश्‍यक असल्याचे म्हटले आहे.’’ असेही रमेश म्हणाले.

नावाचे स्मरण ठेवावे

‘एनसीईआरटी’ने स्वतःचे नाव नीट लक्षात घ्यावे, असे म्हणत रमेश म्हणाले की,‘‘एनसीईआरटीचे पूर्ण नाव हे नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असे असून, नागपूर आॅर नरेंद्र कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असे नाही.’

‘यंत्रणेला जातीयवादी बनवण्याचा प्रयत्न’

तिरुअनंतपुरम - अभ्यासक्रमातून बाबरी मशीद पाडल्याचे संदर्भ वगळल्याचे ‘एनसीईआरटी’ने समर्थन केल्यानंतर केरळचे मंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम. बी. राजेश यांनी टीका केली आहे. -‘सर्व सरकारी यंत्रणेला जातीयवादी बनवण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे आणि या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्‍यक आहे,’ असे आवाहन राजेश यांनी केले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नसूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे कट्टर जातीयवादी धोरण राबवतच असल्याचे हे ठळक उदाहरण आहे, असा आरोप राजेश यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.