नुकत्याच झालेल्या NEET पेपर लीक प्रकरणामागील कथित सूत्रधार, अमित आनंद याने या सर्व प्रकरणात धक्कादायक कबुली दिल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, अमित आनंदने प्रत्यक्ष परीक्षेच्या एक दिवस अगोदर NEET ची प्रश्नपत्रिका फो़डल्याची कबुली दिली आहे. यासाठी त्याला 32 लाख रुपये मिळाले असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.
आरोपी अमित आनंदने पोलिसांना सांगितले की, तो परिक्षेच्या आदल्या रात्री उमेदवरांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पुरवायचा व त्यांना ते रात्रभर पाठ करायला लावायचा.
नीट पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार अमित आनंद याने कबुली देताना NEET परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर लीक केल्याचे सांगितले. परीक्षेच्या एक दिवस आधी उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे देण्यात आली. त्यांना रात्रभर उत्तरे पाठ करायला लावली. प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात उमेदवारांकडून 30 ते 32 लाख रुपये घेण्यात आले होते.
आरोपी अमित आनंदने त्याच्या कबुलीमध्ये म्हटले आहे की, पोलिसांना माझ्या फ्लॅटमधून NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे जळलेले अवशेष सापडले आहेत. यापूर्वीही आपण अनेक पेपर लीक केले असल्याची कबुलीही त्याने दिली आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथील शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात अमित आनंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने पेपरफुटीची कबुली दिली.
कबुलीजबाबाच्या प्रतीनुसार, पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार अमित हा मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र, तो सध्या पाटणा येथील एजी कॉलनीमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. या कबुलीजबाबात त्यांनी सांगितले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देल्या होत्या त्यांना तो कसा भेटला याबद्दलही सांगितले आहे.
4 जून रोजी NEET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याचे समोर आले होते. टॉपर्सची यादी पाहिल्यानंतर NEET परीक्षेत गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित झाला.
13 जून रोजी एनटीएने वाढीव गुण असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असा निर्णय घेतला, परंतु अद्यापही विद्यार्थ्यांचा संताप कमी झालेला नाही.
बिहार आणि गुजरातमधून आलेल्या पेपरफुटीच्या बातम्यांनी एनटीएच्या विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळेच विद्यार्थी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
दरम्यान बिहारच्या पाटण्यात याप्रकरणी 4 विद्यार्थ्यांसह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. पेपर फोडणाऱ्या या टोळीने मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.