NEET Result : ‘नीट’च्या ‘टॉपर’ची संख्या घटली;न्यायालयाच्या आदेशानंतर ‘एनटीए’कडून सुधारित निकाल जाहीर

गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर वादग्रस्त ठरलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा अंतिम निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आज जाहीर केला. या निकालानुसार, या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्यांची संख्या घटून १७ झाली आहे.
NEET Result
NEET Resultsakal
Updated on

नवी दिल्ली : गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर वादग्रस्त ठरलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा अंतिम निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आज जाहीर केला. या निकालानुसार, या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्यांची संख्या घटून १७ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भौतिक शास्त्राबाबतच्या एका प्रश्‍नाबाबत दिलेल्या आदेशानंतर हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

‘नीट’च्या परीक्षेत भौतिक शास्त्रासंबंधीच्या एका प्रश्‍नाची दोन बरोबर उत्तरे होती. एक उत्तर जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे, तर दुसरे उत्तर नव्या अभ्यासक्रमाप्रमाणे बरोबर होते. त्यामुळे योग्य उत्तर कोणते हे निश्‍चित करून निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला दिले होते. त्यानुसार, या संस्थेने आज सुधारित निकाल जाहीर केला आहे. पूर्वी जाहीर केलेल्या निकालामध्ये ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते. त्यापैकी ४४ जणांना वादग्रस्त प्रश्‍नासाठी ‘एनटीए’ने पूर्ण गुण दिले होते.

काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात त्यांचा वेळ वाया गेला म्हणून अतिरिक्त गुण दिले होते. ते गुण कमी केल्याने सहा जण ‘टॉपर’च्या यादीतून कमी झाले. तरीही ६१ जणांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने टीका होऊन वाद न्यायालयात गेला होता. नव्या निकालानंतर आता फक्त १७ जणांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे दिसून आले आहे.

या परीक्षेत व्यापक प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, न्यायालयाने नुकताच निकाल देताना ही परीक्षा रद्द करण्यास नकार दिला होता. गैरप्रकार प्रकरणी मात्र ‘सीबीआय’कडून तपास सुरू आहे.

निकाल पाहण्यासाठी दोन संकेतस्थळे

‘नीट’ परीक्षेचा जाहीर झालेला सुधारित निकाल विद्यार्थ्यांना exams.nta.ac.in आणि neet.ntaonline.in या दोन संकेतस्थळांवर पाहता येईल, असे ‘एनटीए’कडून सांगण्यात आले आाहे. या निकालाची उत्तरतालिका (आन्सर की) ‘एनटीए’ने नुकतीच जारी केली होती. सुधारित निकालामुळे ऑल इंडिया रॅंकिंगचे गणित बदलणार आहे.

टॉपरमध्ये तिघे महाराष्ट्रातील

सुधारित निकालानुसार टॉपर ठरलेल्या १७ जणांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नेहा माने, पलांशा अग्रवाल आणि शुभन सेनगुप्ता यांना पैकीच्या पैकी, म्हणजे ७२० गुण मिळाले आहेत. यांच्याशिवाय मृदुल आनंद (दिल्ली), आर्यन यादव, आयुष नौग्रिया (उत्तर प्रदेश), माझीन मन्सूर (बिहार), गुन्मय गर्ग (पंजाब), अर्घ्यदीप दत्ता (प. बंगाल), पी. रजनीश (तमिळनाडू), श्रीनाद शर्मिल (केरळ), तेजस सिंह (चंडीगड) , देवांश जोशी, इराम काझी आदी विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. यंदाच्या नीट परीक्षेत एकूण २४ लाख ६ हजार ७९ विद्यार्थी बसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.